लॉर्ड्स येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकत सर्वांची मने जिंकली. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकण्यापासून १७ धावा दूर राहिला. उत्कृष्ट लयीमध्ये दिसत असलेला रोहित अचानक बाद झाल्याने भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, रोहित बाद होण्यापूर्वी झालेल्या एका घटनेची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
रोहितची शानदार अर्धशतकी खेळी
नॉटिंघम कसोटीच्या दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात जबाबदारीने खेळ केला. विदेशातील आपल्या पहिल्या कसोटी शतकाकडे आगेकूच करत असलेल्या रोहितला अनुभवी जेम्स अँडरसनने रोखले. आपल्या दुसऱ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात अँडरसनने अप्रतिम चेंडू टाकत रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितने १४५ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची अप्रतिम खेळी केली. यामध्ये ११ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. रोहितने हे शतक पूर्ण केले असते तर तो लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय फलंदाज ठरला असता.
या घटनेची सुरू झाली चर्चा
रोहित अँडरसनविरुद्ध ज्याप्रकारे चकला त्याबाबत आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. रोहित बाद होण्याच्या आधीच्या षटकात दुसरा भारतीय सलामीवीर केएल राहुल याने मैदानी पंचांकडे खराब प्रकाशाबाबत तक्रार केलेली. मात्र, पंचांनी त्याची दखल घेतली नाही व सामना सुरू ठेवला. त्यामुळे, रोहित बाद झाला त्यावेळी पुरेसा प्रकाश नव्हता का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
राहुलसोबत केली विक्रमी भागीदारी
लॉर्ड्स कसोटीत रोहितचे शतक हुकले असले तरी, त्याचे अर्धशतक देखील खूप महत्वाचे आहे. लॉर्ड्सवर रोहित शर्माने स्विंग चेंडूंचा चांगला सामना केला आणि केएल राहुलसोबत शतकी भागीदारी केली. रोहितने केएल राहुलसोबत १२६ धावांची सलामी दिली. या भागीदारीचे वैशिष्ट्य म्हणजे १९८० नंतर प्रथमच भारताला इंग्लंडमध्ये शतकी सलामी मिळाली. या ८३ धावा रोहितच्या परदेशी भूमीवरील सर्वोच्च धावा ठरल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ