गोवा: हिरो इंडियन सुपर लिगच्या इतिहासात काही संघांनी आकर्षक आणि आक्रमक खेळ केला आहे. गेल्या मोसमात चेन्नईयीन एफसीने एलॅनो ब्लुमर, स्टीव्हन मेंडोझा यांच्यासह, तर दिल्ली डायनॅमोजने मार्सेलिनियोसह धडाका दाखविला.
व्हाईट पेले अशी उपाधी लाभलेल्या झिको यांच्या मार्गदर्शनाखाली 2015 मध्ये एफसी गोवा संघाने प्रभाव पाडला. अशी काही उदाहरणे असली तरी यंदा सर्जिओ लॉबेरा यांच्या एफसी गोवा संघाचा दर्जा वेगळ्याच पातळीचा आहे. या संघाने सामन्यागणिक 2.33 गोलांची सरासरी राखली आहे.
पहिल्या नऊ सामन्यांत गोव्याने 22 गोलांचा पाऊस पाडला. त्यानंतर त्यांच्या फॉर्मला अनाकलनीय अशी उतरती कळा लागली. मग त्यांनी वेळीच सावरत शेवटच्या तीन सामन्यांत 12 गोल करताना एकच पत्करला.
याविषयी आणखी स्पष्ट चित्र उभे करायचे झाले तर एक आकडेवारी लक्षात घ्यावी लागेल. गेल्या मोसमात दिल्लीने सर्वाधिक 27 गोल 14 सामन्यांत केले होते.
स्पेनचे लॉबेरा हे ला मॅसिया अर्थात बार्सिलोनच्या युवा अॅकॅडमीचे प्रशिक्षक होते. आपली कार्यपद्धती गोव्यामध्ये छान चालली असल्याचे पाहून ते स्वाभाविकच आनंदित झाले आहेत. ते म्हणाले की, गोलांची ही सरासरी आनंददायक आहे.
आम्ही ज्या पद्धतीचा फुटबॉल प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत ती शैली आनंददायक असल्याचे दिसून येते. येथे आगमन झाले तेव्हा आक्रमक आणि भेदक शैलीचा फुटबॉल खेळण्याची स्पष्ट भुमिका मांडली.
आम्ही गोल केल्यामुळे घडामोडी योग्य मार्गाने घडत असल्याचे दिसून येते. आमचा संघ गोल करण्याच्या क्षमतेचा असल्याचेही स्पष्ट होते.
याचे बहुतांश श्रेय फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोेटे यांच्या अतुलनीय फॉर्मला द्यावे लागेल यात शंकाच नाही. या जोडीने मिळून तब्बल 30 गोल केले आहेत. यानंतरही हा संघ केवळ या दोघांवरच अवलंबून आहे असे नाही.
लॉबेरा यांनी सांगितले की, या लिगमध्ये कोणत्याही दोन खेळाडूंवर एखाद्या संघाचे दैव अवलंबून असू शकेल असे वाटत नाही. स्कोअरशीटवर नावे जास्त झळकण्याची शक्यता असलेले खेळाडू नेहमीच असतात. त्यांच्याकडे अशी क्षमता असणे चांगलेच ठरते, पण शेवटी हा सांघिक प्रयत्नांचा परिणाम असतो.
मोसमापूर्वी लॉबेरा यांनी बार्सिलोनाच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला होता. याच क्लबने त्यांना घडविले आणि आक्रमक खेळ करण्याचा पाया निर्माण केला. लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आव्हानाचा निर्धाराने सामना केला.
गोव्याचा खेळ मात्र केवळ आक्रमणापुरताच नसून मध्य क्षेत्रावरील नियंत्रण तितकेच महत्त्वाचे ठरले. सामन्यागणिक पासेसची सर्वाधिक सरासरी, सर्वाधिक शॉट आणि सर्वाधिक टचेस (चेंडूला स्पर्श) यात गोवा आघाडीवर राहिला.
एकवेळ प्रतिस्पर्ध्याचे गोल झाले तरी चालतील, पण निसटत्या निकालावर समाधान मानायचे नाही अशी लॉबेरा यांची भूमिका असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
त्यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या चाहत्यांना दणदणीत शैलीचा फुटबॉल दाखवायचा आहे. सुंदर खेळ झालेले सामने पाहून त्यांच्या भावना उचंबळून याव्यात असे आम्हाला वाटते.
आपल्या संघाला कसेबसे गुण मिळाले अशी त्यांची भावना पंचांची दिर्घ शिट्टी वाजल्यानंतर व्हायला नको. त्याऐवजी आपल्या संघाने चांगल्या खेळाने आनंद दिला असे चाहत्यांना वाटले पाहिजे. चांगला खेळ केवळ चाहतेच नव्हे तर लीगसाठी सुद्धा चांगला ठरतो. मैदानावरून घरी जाताना चाहत्यांनी 90 मिनिटांच्या खेळाचा आनंद लुटलेला असला पाहिजे.
दणदणीत शैलीच्या फुटबॉलमुळे प्रतिस्पर्ध्याचे गोल होण्याचा धोका असतो. याची नकारात्मक बाजू म्हणजे लॉबेरा यांच्या संघाविरुद्ध 28 गोल झाले आहेत आणि पहिल्या सहा संघांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.
क्लीन शीट राखण्याची गरज असल्याची लॉबेरा यांना जाणीव आहे, पण जोपर्यंत आपला संघ प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गोल करतो आहे तोपर्यंत लॉबेरा आनंदात असतील.