आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal challengers bengluru) ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्याच दिवशी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात, आरसीबीने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व 11 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याच वेळी, आरसीबी फ्रँचायझीसह इतर अनेक पक्षांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विराट कोहलीविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
सामाजिक कार्यकर्ते एचएम वेंकटेश यांनी क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. वेंकटेश यांनी आरोप केला की विराटने ‘आयपीएल’च्या माध्यमातून जुगाराला प्रोत्साहन दिले आहे. यासोबतच मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत विराटचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, पोलिसांनी सांगितले की एचएम वेंकटेश यांच्या तक्रारीची समीक्षा केली जाईल, परंतु विराट कोहलीविरुद्ध स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘अॅरेस्ट कोहली’ हा विषय ट्रेंड होऊ लागला.
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाळे यांचे नाव आहे, तसेच इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित 3 जणांचा समावेश आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) विरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला होता, हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की केएससीएचे सचिव ए शंकर आणि ईएस जयराम यांनी चेंगराचेंगरी प्रकरणात नैतिक जबाबदारी असल्याचे सांगून आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे.






