धमाकेदार अर्धशतकासह मुंबईचा ‘एकहजारी मनसबदार’ बनला ईशान

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान शारजा येथे खेळला गेला. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी उभय संघांना या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुंबईने राजस्थानला ८ आठ गडी राखून पराभव करत, गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. या सामन्यात मुंबईसाठी नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या ईशान किशनने यादरम्यान एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
ईशान बनला एक हजारी मनसबदार
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बाकावर बसावे लागल्यानंतर यष्टीरक्षक ईशान किशनने या सामन्यातून मुंबईच्या संघात पुनरागमन केले. त्याने आपली पहिली धाव घेताच मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये एक हजार धावा करण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा दहावा फलंदाज बनला. ईशानने २०१८ पासून आतापर्यंत मुंबईसाठी ४४ सामने खेळताना ४० डावात २९.९७ च्या सरासरीने १०४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३३ असा अफलातून राहिला.
मुंबईचा एकतर्फी विजय
सर्व चाहत्यांना हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र, चाहत्यांचा पुरता भ्रमनिरास झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. नॅथन कुल्टर नाईल याने चार तर, हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या जिमी निशाम याने तीन बळी मिळवून राजस्थानचा डाव अवघ्या ९० धावांवर रोखला.
राजस्थानने ठेवलेल्या ९१ धावांच्या आव्हानासमोर कर्णधार रोहित शर्माने १३ चेंडूत २२ धावा करून संघाला वेगवान सुरुवात दिली. दुसरा सलामीवीर ईशान किशनने २५ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला ७० चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला. चार बळी घेणाऱ्या कुल्टर नाईल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.