---Advertisement---

युएईत ईशानचा बोलबाला! रोहित-सूर्याला मागे टाकत केला नवा पराक्रम

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 10:22 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२१) मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान शारजा येथे सामना खेळला गेला. अतिशय निरस झालेल्या या सामन्यात मुंबईने राजस्थानला ८ आठ गडी व ७० चेंडू राखून पराभूत करत, गुणतालिकेत पाचव्या स्थानावर उडी घेतली. मुंबईच्या विजयाचा नायक युवा यष्टीरक्षक ईशान किशन ठरला. त्याने एक धुवाधार नाबाद अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने युएईच्या मैदानांवर एक मोठा विक्रम केला.

ईशानची आक्रमक फलंदाजी
दिल्ली विरूद्धच्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन याची बॅट चांगलीच आग ओकत होती. त्याने अवघ्या २५ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार व तीन गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने मुंबईला विजयी केले.

युएईच्या मैदानांवर ईशानचा बोलबाला
ईशानने या अर्धशतकासह युएईच्या मैदानांवरील आपले पाचवे अर्धशतक झळकावले. मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. ईशानसह क्विंटन डी कॉकने अबुधाबी, शारजा व दुबईच्या मैदानांवर आयपीएल खेळताना मुंबईसाठी पाच अर्धशतके लगावली आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी या मैदानांवर प्रत्येकी चार अर्धशतके ठोकली आहेत.

मुंबईची प्ले ऑफची आशा जिवंत
प्ले ऑफची जागा पटकावण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघांना विजय हवा होता. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कुल्टर नाईल, निशाम व जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या डावाची वाताहात केली. त्यांनी निर्धारित २० षटकात राजस्थानचा डाव केवळ ९० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, मुंबईसाठी रोहित शर्माने २२ व ईशान किशनने नाबाद ५० धावांची खेळी करत संघाला तब्बल ८ गडी व ७० चेंडू राखून विजय मिळवून दिला. मुंबईचा अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---