युवा भारतीय क्रिकेटपटू ईशान किशन ‘बुची बाबू ट्रॉफी’मध्ये शानदार कामगिरी करत आहे. 2024 टी20 विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर झारखंडच्या या कर्णधारानं जोरदार कमबॅक केला. बुची बाबू ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्यानं आपली फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या जोरावर झारखंडला मध्य प्रदेशविरुद्ध 2 गडी राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यात ईशान किशननं अवघ्या 107 चेंडूत 114 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर झारखंडला पहिल्या डावात 64 धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात झारखंडचा संघ अडचणीत आला होता. संघासमोर विजयासाठी 174 धावांचं छोटेखानी लक्ष्य होतं, पण पटापट विकेट पडल्या.
येथून सामना रोमहर्षक बनला. झारखंडला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या आणि त्यांच्या दोन विकेट शिल्लक होत्या. पण ईशान किशनवर अजिबात दडपण नव्हतं. त्यानं दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिल. ईशानच्या या खेळीत दिग्गज एमएस धोनीची झलक स्पष्ट दिसली. विशेष म्हणजे, धोनी देखील मूळचा झारखंडचा आहे.
ईशान किशननं गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावर भारतीय संघाची साथ सोडली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. तो रणजी ट्रॉफीमध्येही खेळला नव्हता, ज्यामुळे त्याचा केंद्रीय करारही रद्द करण्यात आला. किशनची आयपीएलमधील कामगिरीही चांगली नव्हती. मात्र आता त्यानं पुनरागमनाची तयारी केल्याचं दिसून येत असून तो पुन्हा टीम इंडियात परतण्यासाठी सज्ज आहे.
बुच्ची बाबू ट्रॉफीमध्ये खेळल्यानंतर आता ईशान किशन दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ड संघाकडून खेळणार आहे. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार असून श्रेयस अय्यरकडे भारत ड संघाचं नेतृत्व आहे.
हेही वाचा –
WTC टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी…पाकिस्तानची हालत खराब, जाणून घ्या सर्व 9 संघांची स्थिती
बाप तसा लेक! राहुल द्रविडच्या मुलाचा फलंदाजीत कहर; जोरदार षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल
16 वर्षांच्या चमकदार कारकिर्दीतील विराट कोहलीचे 5 मोठे विक्रम, अनेक दिग्गजांना सोडलं मागे