धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) होणार आहे. मात्र, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन या सामन्यातून बाहेर झाला आहे. याबद्दल रविवारी (२८ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने माहिती दिली आहे.
इशान किशनला धरमशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान फलंदाजी करताना लहिरू कुमाराने टाकलेला बाउंसर चेंडू डोक्याला लागला होता. त्यामुळे त्याला धरमशालातील स्थानिक रुग्णालयात शनिवारी रात्री तपासणीसाठी नेण्यात आले होते. यावेळी त्याच्याबरोबर भारतीय संघाचे डॉक्टरही होते.
रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली, तसेच त्याचे सीटी स्कॅनही करण्यात आले. त्याच्या सीटी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. पण सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या कन्कशनच्या लक्षणांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर झाला आहे (Ishan Kishan ruled out of 3rd T20I).
NEWS – Ishan Kishan ruled out of 3rd T20I.
More details here – https://t.co/QVWZ4CFCv5 @Paytm #INDvSL pic.twitter.com/CN1a2GVLQa
— BCCI (@BCCI) February 27, 2022
दरम्यान, आता तिसऱ्या सामन्यात इशानऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात मयंक अगरवालला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. खरंतर इशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ८९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला डोक्याला चेंडू लागला. त्यानंतर त्याची लय बिघडल्याचे दिसले. तो डोक्याला चेंडू लागल्यानंतर फलंदाजी करत होता, मात्र त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकून खेळता आले नाही. तो १६ धावा करून बाद झाला.
भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडीवर
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकला असल्याने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यापूर्वी भारताने लखनऊ येथे झालेला पहिला टी२० सामना ६२ धावांनी जिंकला होता. आता तिसरा टी२० सामना जिंकून भारताला श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी असणार आहे, तर श्रीलंका प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने या सामन्यात खेळण्यासाठी उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहच्या गोलंदाजी दुसरं -तिसरं कोणी नाही, तर रोहितनेच बजावली मोठी भूमीका; ‘अशी’ केली मदत
कैफची रोहितला मिडास राजाची उपमा, म्हणाला, ‘त्याला हँडशेक करताना सावध, ज्याला हात लावतोय…’
हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय






