अहमदाबाद। भारताने गुरुवारी (२५ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठीही खास होता. त्याचा हा १०० वा कसोटी सामना होता. त्यात त्याने षटकार मारत हा सामना आणखी खास केला.
इशांतचा कारकिर्दितील पहिला षटकार
या सामन्यात गुरुवारी इशांतने भारताच्या पहिल्या डावात १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १० धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार ठोकला. हा षटकार त्याने डावाच्या ५१ व्या षटकात जॅक लीचच्या गोलंदाजीवर मिड ऑफच्या दिशेने ठोकला.
हा षटकार इशांतचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिलाच षटकार ठरला. इशांतने त्याच्या कारकिर्दीत १०० कसोटी, ८० वनडे आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. पण या दरम्यान त्याने तब्बल २६७७ चेंडू खेळल्यानंतर पहिल्यांदा षटकार मारला.
@BCCI @ICC @ImIshant 1st international six by Ishant Sharma 👌100 test + 80 odi pic.twitter.com/mXMHlik7yM
— Anuj Kumar 🇮🇳 (@anujkashyapp) February 25, 2021
इशांतचा १०० वा सामना
इशांत हा १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा ११ वा खेळाडू ठरला. तसेच दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. कपिल देव यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १३१ सामने खेळले. इशांतने त्याच्या या १०० व्या कसोटीत १ विकेट घेतली. विशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडच्या एकूण २० विकेट्सपैकी १९ विकेट्स भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. त्यामुळे या सामन्यात विकेट मिळणारा इशांत एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
इशांतची कारकिर्द
इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या १०० कसोटी सामन्यात ३०३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने ११ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कारनामा केला आहे. याशिवाय इशांतने ८० वनडे सामने खेळताना ११५ विकेट्स आणि १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
षटकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रोहितचे विराटने ‘असे’ केले अभिनंदन, पाहा व्हिडिओ
“पहिल्या डावात जर आम्ही २५० धावा केल्या असत्या तर…”, इंग्लिश कर्णधाराने सांगितले पराभवाचे कारण
विराट कोहलीने ‘कॅप्टनकूल’ धोनीला तर टाकले मागे आता निशाण्यावर पाँटिंग आणि स्मिथचे विक्रम