कोलकाता। दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने (एटलेटिको दी कोलकाता ) आज (3 फेब्रुवारी )हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात जमशेदपूर एफसीला 2-1 असे पराभूत केले आहे. या विजयासह एटीकेने आव्हान कायम राखले. स्पेनचा आक्रमक मध्यरक्षक मॅन्युएल लँझरॉत त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरले. पूर्वार्धात त्याने केलेले दोन गोल निर्णायक ठरले.
जमशेदपूरने आठ मिनीटे बाकी असताना मारीओ आर्क्वेसच्या गोलमुळे पिछाडी कमी केली, पण त्यानंतर सात मिनिटांच्या भरपाई वेळेसह त्यांना बरोबरी साधणारा गोल करता आला नाही. एटीकेने 14 सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून पाच बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. जमशेदपूरला 14 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. चार विजय व आठ बरोबरींसह त्यांचेही 20 गुण आहेत. या सामन्यापूर्वी एटीकेचा गोलफरक (11-12) असा उणे 1 होता. तो आता (13-13) असा शून्य झाला. जमशेदपूरचा गोलफरक (22-16) असा सहा झाला. त्यामुळे जमशेदपूरचे पाचवे, तर एटीकेचे सहावे स्थान कायम राहिले.
यजमान एटीकने वेगवान प्रारंभ केला. तिसऱ्याच मिनिटाला त्यांनी खाते उघडले. एदू गार्सियाने तिसऱ्या मिनिटाला जोरदार मुसंडी मारली. त्याला बॉक्सलगत जमशेदपूरने फाऊल केले. याचा फायदा घेत लँझरॉतने अचूक फटका मारला. जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
33व्या मिनिटाला एटीकेला फ्री-किक मिळाली. यावेळीही मध्यरक्षक गार्सियाने मुसंडी मारली. त्याला बॉक्सबाहेर डावीकडे पाडण्यात आले. ही फ्री-किक घेताना लँझरॉतने अफलातून फटका मारला. सुब्रतच्या हाताला लागून चेंडू नेटमध्ये गेला.
आठ मिनिटे बाकी असताना जमशेदपूरने पिछाडी कमी केली. कॉर्नरवर बिकाश जैरूने मारलेला क्रॉस चेंडू मारीओने अचूकपणे हेडिंग करीत प्रतिस्पर्धी गोलरक्षक अरींदमला चकविले. त्याच्या आधीच्याच मिनीटाला जैरूनेच निर्माण केलेल्या संधीवर बदली खेळाडू जेरी माहमिंगथांगा याने मारलेला चेंडू क्रॉसबारला लागला होता.
पूर्वार्धात आठव्या मिनिटाला जमशेदपूरच्या रॉबिन गुरुंग याने नेटच्या दिशेने सुमित पासी याला पास दिला. चेंडू थोपविण्यासाठी एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य पुढे सरसावला. तो चेंडू अडवू शकला नाही, पण अर्णब मोंडल याने चोख बचाव केला.
अकराव्या मिनिटाला जमशेदपूरच्या सर्जिओ सिदोंचा याने उजवीकडे मिळालेला कॉर्नर घेतला. त्याने पलिकडील बाजूला चांगला फटका मारला, पण एटीकेच्या प्रीतम कोटल याने हेडिंगवर चेंडू सुरक्षित स्थळी घालविला.
एटीकेला 16व्या मिनिटाला फ्री-किक मिळाली. ती लँझरॉतने घेतली. त्यावेळी सुब्रतचा अंदाज आधी चुकला होता, पण त्याने कसाबसा चेंडू अडविला. वीसाव्या मिनिटाला जमशेदपूरच्या मेमोने मध्य क्षेत्रातून उजवीकडे अप्रतिम चाल रचली. त्यावर फारुख चौधरीला संधी मिळाली, पण मोंडलने पुन्हा एकदा आपले अस्तित्व जाणवून देत चेंडू कॉर्नरसाठी बाहेर घालविला. त्यावर प्रतिक चौधरीला हेडिंगची संधी मिळाली, पण तो फिनिशिंग करू शकला नाही.
उत्तरार्धातही एटीकेने सकारात्मक खेळ केला. 48व्या मिनिटाला लँझरॉतने मध्य क्षेत्रातून मारलेल्या चेंडूपर्यंत एव्हर्टन सँटोस पोचण्यापूर्वीच सुब्रतने चपळाई दाखविली.
प्रोणय हलदरने 54व्या मिनिटाला लँझरॉतला पास दिला, पण हा फटका सुब्रतने आरामात अडविला. जमशेदपूरच्या मल्साव्मझुलाच्या पासवर सुमीत पासी अचूक फटका मारू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज
–युजवेंद्र चहलने हा पराक्रम करत केली कुंबळे, वॉर्न या दिग्गजांची बरोबरी
–बंड्या मारुती व गोल्फादेवी मुंबई शहरच्या दोन्ही संघ उजाळा क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत.