पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटी आणि एटीके यांच्यात येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर 2-2 अशी बरोबरी झाली. पूर्वार्धातील 1-1 अशी बरोबरीची कोंडी उत्तरार्धात सुटू शकली नाही. रॉबिन सिंगने 76व्या मिनिटाला पुणे सिटीला बरोबरी साधून दिली.
जॉन जॉन्सनच्या स्वयंगोलमुळे पुणे सिटीचे खाते उघडले होते. जयेश राणेने एटीकेला बरोबरी साधून दिली. त्यानंतर एदू गार्सियाच्या पेनल्टीवरील गोलमुळे एटीकेला आघाडी मिळाली होती. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. एटीकेचे सहावे, तर पुण्याचे सातवे स्थान कायम राहिले. एटीकेने 15 सामन्यांतून पाच विजय, सहा बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह 21 गुण मिळविले आहे. पुण्याच्या खात्यात 14 सामन्यांतून चार विजय, तीन बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह 15 गुण आहेत. एटीकेसाठी बाद फेरीच्यादृष्टिने बरोबरीचा निकाल प्रतिकूल ठरू शकतो.
पुण्याच्या रॉबिन सिंगने 17व्या मिनिटाला उजीवकडून मार्को स्टॅन्कविचला उजवीकडून मध्यभागी पास दिला. मार्कोने मारलेला चेंडू जॉन जॉन्सनच्या पायाला लागल्यामुळे एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याचा अंदाज चुकला. तो डावीकडे वळला, तर चेंडू उजवीकडून नेटच्या वरील कोपऱ्यात गेला. त्यामुळे स्वयंगोल झाला.
एटीकेने सहा मिनिटांत बरोबरी साधली. जॉन्सनने एव्हर्टन सँटोसला सुंदर पास दिला. सँटसने अंदाज घेत जयेशला डावीकडे हेरले आणि चेंडू त्या दिशेने मारला. जयेशने चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू पुण्याचा गोलरक्षक कमलजीत सिंग याला झेप टाकूनही अडविता आला नाही.
उत्तरार्धात 60व्या मिनिटाला हवेतून आलेला चेंडू हेडिंगने रोखण्याच्या प्रयत्नात पुणे सिटीच्या दिएगो कार्लोसने केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला. परिणामी पंच आधम महंमद तुमाह मखाद््मेह यांनी एटीकेला पेनल्टी बहाल केली. त्यावरून पुण्याच्या खेळाडूंनी थोडा वाद घातला, पण पंचांचा निर्णय कायम राहिला. गार्सियाने डावीकडून फटका मारला. अंदाज चुकून कमलजीत विरुद्ध बाजूला गेला आणि गोल झाला. पुण्याला रॉबिनने 76व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. त्याने कॉर्नरनंतर उडी घेत अफलातून हेडींग करीत गोल नोंदविला.
पहिल्याच मिनिटाला पुण्याला फ्री किक मिळाली. प्रोणय हलदरने मार्सेलीनियोला बॉक्सबाहेर पाडले. मार्कोने डावीकडून मिळालेल्या फ्री किकवर मारलेला चेंडू थोडक्यात नेटवरून गेला. सहाव्या मिनिटाला दिएगो कार्लोसने बॉक्सबाहेरून मारलेला चेंडू गेर्सन व्हिएराला लागून बाहेर गेला. त्यामुळे डावीकडे मिळालेला कॉर्नर मार्सेलीनियोने घेतला. त्याचवेळी रॉबीन सिंगने बॉक्समध्ये अर्णब मोंडलला फाऊल केले. त्यामुळे हा कॉर्नर वाया गेला.
नवव्या मिनिटाला एटीकेच्या हलदरने बॉक्सबाहेरून लांब फटका मारला, पण चेंडू कमलजीतच्या फार जवळ होता. कमलजीतने दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडविला.
दहाव्या मिनिटाला एटीकेच्या गेर्सन व्हिएराने पुण्याच्या इयन ह्युमला कोपराने धडक दिली. चेंडूवर ताबा मिळविण्यावरून त्यांच्यात झुंज झाली होती. पुढच्याच मिनिटाला एटीकेच्या एदू गार्सियाचा प्रयत्न थोडक्यात कमी पडला. बॉक्सबाहेरून त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला.
मार्सेलीनियोने 28व्या मिनिटाला आगेकूच केली. त्याने फटका ताकदवान मारला, पण अचूकतेअभावी तो अडविणे अरींदमला सोपे गेले. हलदरने 33व्या मिनिटाला लांबून प्रयत्न केला, पण चेंडू थेट कमलजीतकडे गेला.
निकाल ः
एफसी पुणे सिटी ः 2 (जॉन जॉन्सन 17-स्वयंगोल, रॉबिन सिंग 76)
बरोबरी विरुद्ध एटीके ः 2 (जयेश राणे 23, एदू गार्सिया 61-पेनल्टी)