कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये प्रत्येकी दोन वेळच्या विजेत्या अटलेटीको दी कोलकाता (एटीके) आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील लढत रंगतदार ठरली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीकेने 2-1 अशा विजयासह गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
एटीकेने पहिल्या तेरा मिनिटांत दोन गोल नोंदविले. चार मिनिटांत चेन्नईयीनने खाते उघडले. त्यामुळे आणखी चुरशीची अपेक्षा होती. दोन्ही संघांनी प्रयत्न भरपूर केले सुद्धा, पण त्यांना फिनीशिंग साधता आले नाही.
एटीकेचा पाच सामन्यांतील हा दुसरा विजय असून एक बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण झाले. एफसी गोवा आणि बेंगळुरू एफसी यांचेही प्रत्येकी सात गुण आहेत, पण सरस गोलफरकानुसार गोवा (10-3, 7) दुसऱ्या, बेंगळुरू (6-2, 4) तिसऱ्या, तर एटीके (5-6, उणे 1) चौथ्या क्रमांकावर आहे. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आठ गुणांसह आघाडीवर आहे. चेन्नईयीनला पाच सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीचा एकमेव गुण त्यांच्या खात्यात जमा असून गतविजेता संघ शेवटून दुसऱ्या नवव्या क्रमांकावर आहे.
दोन्ही संघांना गुणतक्त्यातील स्थान उंचावण्याची गरज असल्यामुळे त्यांचा प्रारंभ सकारात्मक होता. पहिल्याच मिनिटाला चेन्नईयीनच्या रफाएल आगुस्तोने डावीकडे बॉक्सबाहेरून नेटच्या दिशेने मारलेला चेंडू उंच आणि स्वैर होता. एटीकेने पहिलाच प्रयत्न सत्कारणी लावला. चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंगने गोलकीक मारल्यानंतर चेंडू मध्य रेषेच्या दिशेने गेला. गेर्सन व्हिएराने हेडींगवर चेंडू कालूच्या दिशेने मारला. त्यावेळी कालूला दोन सेंटरबॅक दूर असल्यामुळे भरपूर संधी होती. त्याने करणजीतला चकवित चेंडू नेटमध्ये मारला.
सहाव्या मिनिटाला कार्लोसने डावीकडून जेरी लालरीनझुलाकडून बॉक्समध्ये चेंडू मिळताच डाव्या पायाने मारलेला फटका एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने झेपावत हाताच्या बोटांनी क्रॉसबारवरून घालविला. 11व्या मिनिटाला लँझरॉतच्या अप्रतिम हेडिंगनंतर चेंडू मिळताच कालूने जोरदार घोडदौड करीत चेंडू मारला, पण तो थेट करणजीतकडे गेला. दोन मिनिटांनी लँझरॉतने स्थिर चेंडूवरील कौशल्य प्रदर्शित करीत आगेकूच केली आणि जॉन्सनसाठी संधी निर्माण केली. जॉन्सनने अचूक टायमिंग साधत उडी घेतली आणि चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात तळामध्ये मारला.
चेन्नईयीनने चढाया सुरु ठेवल्या. 17व्या मिनिटाला उजवीकडून फ्रान्सिस्को फर्नांडीसने उजवीकडून ताकदवान क्रॉस पास दिला. त्यावर कार्लोसने हेडिंग तेवढ्याच सफाईने करीत झेप घेतलेल्या अरिंदमला चकविले. एटीकेने मग प्रतिआक्रमण रचले. लँझरॉतचा यात पुढाकार होता. त्याने उजवीकडून केलेला प्रयत्न करणजीतने चेंडू अडवित फोल ठरविला.
30व्या मिनिटाला लँझरॉतने ऐबोर्लांग खोंगजीला अप्रतिम पास दिला. त्याने मारलेला चेंडू नेटसमोर गेला आणि कोमल थातलने प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा मध्यरक्षक थोई सिंगने बचाव चोख केला. 36व्या मिनिटाला अँड्रीया ओरलँडीने सहा यार्डावर अनिरुध थापाच्या दिशेने चेंडू मारला, पण थापा किकच मारू शकला नाही.
41व्या मिनिटाला लँझरॉतने फ्री किकवर प्रतिस्पर्ध्याचा अंदाज चुकवित चेंडू उंच मारण्याऐवजी बलवंत सिंगला मैदानालगत पास दिला. बलवंतने अवघड कोनातून मारलेला अप्रतिम फटका करणजीतने तेवढ्याच चपळाईने अडविला.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी सुरवातीला प्रयत्न केले, पण त्यास फिनीशिंगची जोड मिळू शकली नाही. 52व्या मिनिटाला इसाक वनमाल्साव्मा याने फ्री किकवर मारलेला चेंडू एटीकेच्या बचाव फळीने ब्लॉक केला. बलवंतने लाल्डीनलिना रंथलेई याला पाडल्यामुळे चेन्नईयीनला ही फ्री किक मिळाली होती.
56व्या मिनिटाला जॉन्सनच्या ढिलाईमुळे कार्लोसला संधी मिळाली, पण उजवीकडून त्याने मारलेला फटका थोडक्यात बाहेरून गेला. चार मिनिटांनी इसाकने डावीकडून दिलेल्या पासवरही त्याचे हेडिंग अचूक झाले नाही.
चेन्नईयीनच्या अँड्रीया ओरलँडीने 67व्या मिनिटाला डावीकडून चाल रचत नेटसमोर चेंडू आणला, पण त्याने पास द्यावा अशा स्थितीत एकही सहकारी नव्हता. 79व्या मिनिटाला अरिंदमने रेंथलेईच्या चालीवर ग्रेगरी नेल्सन याने मारलेला फटका डावीकडे झेपावत चपळाईने अडवला. 84व्या मिनिटाला जयेश राणेच्या पासवर कालूचा प्रयत्न फसला.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच
–या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान