---Advertisement---

ISL 2018: घरच्या मैदानावर मोहिमेला गती देण्याचे एटीकेवर दडपण

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 7:00 AM
---Advertisement---

कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर गुरुवारी दोन वेळचा विजेता एटीके नॉर्थइस्ट युनायटेड एफसीच्या आव्हानाला सामोरे जात आहे. पहिल्या लढतीमधील निराशाजनक पराभवातून सावरत या लढतीत तीन गुण मिळवून मोहिमेला गती देण्याचे आव्हान यजमान संघावर असेल.

एटीकेला कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सने सलामीलाच हरविले. एटीकेचा संघ किमान कागदावर तरी भक्कम आहे. प्रारंभीच त्यांची कामगिरी धडाकेबाज होईल अशी अपेक्षा होती, पण त्यांना सुरवातीलाच पिछाडीवर पडावे लागले. नव्या रुपातील या संघात समन्वयाचा अभाव दिसून आला. नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नव्या पद्धतीशी खेळाडू जुळवून घेत असल्याचे दिसून आले.

एटीकेची सुत्रे स्टीव कॉपेल यांनी स्विकारली आहेत. त्याआधी ते ब्लास्टर्स आणि गेल्या मोसमात जमशेदपूर एफसीकडे होते. त्यांच्या संघांनी आयएसएलमध्ये नेहमीच संथ प्रारंभ केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी सांगितले की, आमची शैली म्हणजे संघातील वैयक्तिक खेळाडूंची छाप आहे. आम्ही मोसमपूर्व तयारी सुरु केली तेव्हा लीग सहा आठवड्यांवर येऊन ठेपली होती. आमच्या काही खेळाडूंना दुखापती झाल्या होत्या. संघ अजूनही तयारी करतो आहे. आम्ही लवकर स्थिरावू अशी मला आशा आहे, पण त्यासाठी वेळ लागेल. म्हणूनच मी हे पुन्हा सांगेन की स्वरुपात सातत्य कायम असलेल्या संघांना आयएसएलमध्ये ही बाब फायद्याची ठरेल.

नव्या मोसमात लय गवसण्यासाठी कॉपेल यांच्या संघाला काही सामने खेळावे लागतात असे साधारण चित्र आहे. गेल्या दोन्ही क्लबमध्ये त्यांचा मोसमातील पहिला विजय तीन सामने झाल्यानंतर नोंदविला गेला. या पार्श्वभूमीवर एटीकेला अद्याप चिंता वाटत नसेल. कॉपेल पुढे म्हणाले की, पहिल्या सामन्यात आम्ही चेंडूवरील ताबा सहज गमावला. त्यातून फार उष्ण हवामान होते. अशावेळी तुमचा चेंडूवर ताबा नसेल तर तुम्हाला आणखी प्रयास पडतात. नॉर्थइस्टविरुद्ध या बाबतीत सरस कामगिरी होईल अशी मला आशा आहे. आम्हाला चेंडूवर जास्त ताबा ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला आगेकूच करण्याची आणि आक्रमक चाल रचण्याची जास्त क्षमता निर्माण करता येईल.

नॉर्थइस्टचा सुद्धा हा मोसमातील दुसरा सामना आहे. त्यांच्या बचाव फळीत समस्या असून त्यावर मार्ग काढणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. गोलरक्षक टी. पी. रेहेनेश हा दडपणाखाली जाणवला. दुसरीकडे बचाव फळी विस्कळीत झाली होती. या संघाने एफसी गोवाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली.

नॉर्थइस्टचे प्रशिक्षक इएल्को शॅट्टोरी यांनी सांगितले की, दुसरा सामना सारखाच असणार नाही. तीन-चार सामने असे झाले तर ते सोपे ठरते. मी एटीकेचा मागील सामना अर्थातच पाहिला आहे. मी काही नोंदी केल्या आहेत. त्यानुसार कुठे फायदा उठवायचा याचे डावपेच आखले आहेत, पण हा सामना खडतर असेल.

शॅट्टोरी यांनी नॉर्थइस्ट संघ बचावात्मक धोरण अवलंबिण्यास आणि प्रतिस्पर्ध्याला चेंडूवर ताबा घेऊ देण्यास तयार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांचा स्टार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यासमोर एटीकेच्या जॉन जॉन्सन-गेर्सन व्हिएरा या जोडीसमोर कसोटी लागेल. ही झुंज उत्कंठावर्धक ठरेल.

नेदरलँड््सचे शॅट्टोरी म्हणाले की, पहिल्या सामन्यानंतर आम्हाला केवळ चार दिवसांची विश्रांती मिळेल. दमट हवामानामुळे पुन्हा ताजेतवाने होणे आणखी कष्टप्रद ठरते. आमच्यासाठी हे आव्हान असेल. आम्हाला आणखी संघटित खेळ करावा लागेल. चांगला निकाल साधू शकू अशी मला आशा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment