सामना गोलशून्य बरोबरीत सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असताना बेंगळुरूने ही कामगिरी केली. कर्णधार सुनील छेत्री याने 82व्या मिनिटाला मैदान सोडले. त्याच्याऐवजी अल्वीन जॉर्ज बदली केळाडू म्हणून मैदानावर उतरला. कर्णधारपदाची सुत्रे डिमास डेल्गाडो याच्याकडे सोपविण्यात आली. यानंतर एक नव्हे तर दोन गोल करीत बेंगळुरूने आपल्या संघातील वैविध्यपूर्ण क्षमता प्रदर्शित केली, तसेच बाद फेरीत प्रवेश करताना धडाकेबाज फॉर्म सुद्धा कायम राखला.
बेंगळुरूने 18 सामन्यांत 13वा विजय मिळविला असून एक बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 40 गुण झाले. गुणतक्त्यातील अव्वल स्थानावर त्यांनी थाटातच शिक्कामोर्तब केले. ब्लास्टर्सला 18 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. सहा विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह 25 गुणांसह त्यांचे सातवे स्थान कायम राहिले. ब्लास्टर्सच्या आशा या लढतीपूर्वीच संपल्यात जमा होत्या. त्यांना अशक्यप्राय संधीसाठी मोठ्या विजयाचा चमत्कार घडविण्याची गरज होती, पण सुमारे 26 हजार प्रेक्षकांना ते एका गोलचा सुद्धा दिलासा देऊ शकले नाहीत.
बेंगळुरूने सकारात्मक सुरवात केली. अकराव्या मिनिटाला निशू कुमारच्या पासवर संतुलन साधत सुनील छेत्रीने 30 यार्डावरून डाव्या पायाने फटका मारला, पण चेंडू प्रमाणापेक्षा जास्त भिरभिरत डावीकडील गोलपोस्टच्या पलिकडून बाहेर गेला. त्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचुब्का याने सुटकेचा निश्वास टाकला.
दोन मिनिटांनी ब्लास्टर्सला संधी मिळाली होती. डावीकडून जॅकीचंद सिंगने आगेकूच केली आणि त्याने मिलन सिंगच्या दिशेने चेंडू मारला. मिलनने किक मारायचा प्रयत्न केला, पण अचूकतेअभावी चेंडू हुकला. त्यामुळे ब्लास्टर्सची पहिली संधी वाया गेली.
23व्या मिनिटाला बोईथांग हाओकीपने उजवीकडून घोडदौड केली. मध्य रेषेवरून त्याने निशूच्या दिशेने चेंडू मारला, पण निशूला पेनल्टी क्षेत्रात असूनही अचूक फटका मारता आला नाही. 25व्या मिनिटाला ब्लास्टर्सला धक्का बसला. हुकमी खेळाडू जॅकीचंदला जांघेचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याच्याऐवजी के. प्रशांत मैदानावर उतरला.
33व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा कर्णधार संदेश झिंगन याने दिलेल्या अप्रतिम पासवर प्रशांतचे हेडींग चुकले. दोन मिनिटांनी ब्लास्टर्सची आणखी एक संधी हुकली. सी. के. विनीतने उजवीकडून आगेकूच केली, पण बेंगळुरूच्या बचाव फळीने आपले क्षेत्र सुरक्षित राखले. 43व्या मिनिटाला हाओकीपने मारलेला चेंडू रॅचुब्काने सहज अडविला.
पुर्वार्धाच्या भरपाई वेळेत छेत्रीने निशूला पेनल्टी क्षेत्रात पास दिला. निशूला रोखण्यासाठी रॅचुब्का पुढे सरसावला. यात दोघांची धडक झाली. दोघांना वेदनाशमक उपचार घ्यावे लागले, पण सुदैवाने दोघांचीही दुखापत गंभीर नव्हती. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती.
दुसऱ्या सत्रात पहिली संधी ब्लास्टर्सने मिळविली. मध्य रेषेपाशी त्यांनी फ्री-किक मिळविली. मिलनने ती घेत पेनल्टी क्षेत्रात चेंडू मारला. बेंगळुरूच्या खेळाडूने हेंडीग केले, पण चेंडू अराटा इझुमी याच्या जवळ पडला. अराटाने फटका मारला, पण बेंगळुरूच्या एका खेळाडूला लागून चेंडू थेट गोलरक्षक गुरप्रीत सिंग याच्याकडे गेला.
62व्या मिनिटाला टोन डॉवलने डावीकडून चाल रचली. त्याने धावत येणारा कर्णधार छेत्री याला पास दिला. छेत्रीने डाव्या पायाने मारलेला फटका मात्र स्वैर होता. 75व्या मिनिटाला टोनीनेच डावीकडून अप्रतिम पास दिल्यानंतर उदांता सिंगने हेडींग केले, पण ते स्वैर होते. चेंडू काहीसा मागे असला तरी उदांता याच्यासारख्या दर्जेदार खेळाडूने ही संधी साधायला हवी होती.
निकाल :
बेंगळुरू एफसी : 2 (मिकू, उदांता सिंग- दोन्ही गोल भरपाई वेळेत)
विजयी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स एफसी : 0