बेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील पहिल्या सुपर संडेला गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला एकमेव गोलने धक्का देत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने धडाक्यात मोहिमेला सुरवात केली. मिकूने 41व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.
गेल्या मोसमात येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यात चेन्नईयीनची सरशी झाली होती. त्यामुळे बेंगळुरूसाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यांनी दाक्षिणात्य डर्बीमधील ही लक्षवेधी लढत जिंकून तीन गुण वसूल केले. कार्लेस कुआद्रात या नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि 20 हजार 786 प्रेक्षकांच्या साक्षीने बेंगळुरूने हा विजय साकारला.
बेंगळुरूने पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटे बाकी असताना संधी साधली. मध्यरक्षक झिस्को हर्नांडेझने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित उजवीकडील मिकूला पास दिला. मिकूने अचूक पासचा फायदा उठवित वेगाने घोडदौड करीत चेंडू थोडा पुढे जाऊ दिला. मग अचूक टायमिंग साधत त्याने नेटच्या वरच्या भागात फटका मारत अफलातून गोल केला. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग निरुत्तर झाला.
मिकूने व्हेनेझुएलाचे विश्वकरंडक पात्रता तसेच कोपा अमेरिका स्पर्धांत प्रतिनिधीत्व केले आहे. त्याला स्पॅनिश (ला लिगा) व स्कॉटीश या लिगचाही अनुभव आहे. हिरो आयएसएलमध्ये बेंगळुरूने गेल्या मोसमात पदार्पण केले. त्यात मिकूने 20 सामन्यांत सर्वाधिक 15 गोल नोंदविले होते. एकूण स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत तो एफसी गोवा संघाच्या फेरॅन कोरोमीनास (18 गोल) याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.
घरच्या मैदानावर पहिला प्रयत्न बेंगळुरूने नोंदविला. तिसऱ्या मिनिटाला राहुल भेकेने उजवीकडून थ्रो-इन केले. हा चेंडू एरीक पार्तालू याच्यापाशी पडला. त्याने डाव्या पायाने नेटच्या दिशेने फटका मारला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने व्यवस्थित अंदाज घेत चेंडू अडविला. सहाव्या मिनिटाला बेंगळुरूच्या जुआननशी चेंडूवर ताबा मिळविण्यावरून झुंज होऊन त्यात चेन्नईयीनचा रफाएल आगुस्टो जायबंदी झाला, पण सुदैवाने त्याला फारसे लागले नाही.
दहाव्या मिनिटाला चेन्नईयीनच्या इनिगो कॅल्डेरॉनने उजवीकडून फ्रान्सिस्को फर्नांडीसच्या पासवर मारलेला चेंडू पार्तालूने हेडींगकरवी बाजूला घालविला. 16व्या मिनिटाला चेन्नईयीनकडून कॉर्नर वाया गेला. उजव्या बाजूला सहा यार्डवरून ग्रेगरी नेल्सन याने छान चेंडू मारला होता, आगुस्टो हेडिंगसाठी योग्य स्थिती साधू शकला नाही. त्यामुळे हेडिंग स्वैर झाले.
बेंगळुरूनेही मग चढाया सुरु केल्या. त्यांचा प्रमुख खेळाडू मिकू याने चाल रचत उदांताकडे चेंडू सोपविला. उजवीकडून उदांताने पुन्हा मिकूला पास द्यायचा प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा बचावपटू जेरी लालरीनझुलाने चपळाईने चेंडू बाहेर घालविला.
19व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआच्या ढिलाईमुळे चेन्नईयीनची सुवर्णसंधी हुकली. ग्रेगरीने अप्रतिम पास देत जेजेकडे चेंडू सोपविला. त्यावेळी बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने पुढे सरसावत जेजेवर दडपण आणले. त्याला हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात जेजेने घाई केली, पण त्याचा फटका बाहेर गेला.
वास्तविक तेव्हा जेजेने जर्मनप्रीतसिंग याला पास द्यायला हवा होता. 34व्या मिनिटाला चेन्नईयीनला जेजेमुळेच पुन्हा हताश व्हावे लागले.
बेंगळुरूच्या भेकेने बॅकपास देताना चूक केली. त्यामुळे जेजे चेंडूवर ताबा मिळवू शकला, पण प्रमाणाबाहेर ताकद लावल्यामुळे त्याचा तोल गेला. त्यामुळे गुरप्रीतला चकविण्याऐवजी त्याने मारलेला चेंडू नेटपासून दूर गेला.
दोन मिनिटांनी जर्मनप्रीतने उजवीकडून मारलेला चेंडू गुरप्रीतने आरामात अडविला. 39व्या मिनिटाला नेल्सनने डावीकडून फ्री कीकवर मारलेला चेंडू गुरप्रीतने पंच करीत दूर घालविला.
तोपर्यंत चेन्नईयीनने चेंडूवरील ताब्याचे सरस प्रमाण राखले होते. मिकूच्या गोलमुळे मात्र चेन्नईयीनला धक्का बसला.
उत्तरार्धात चेन्नईयीनने काही चांगले प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. 49व्या मिनिटाला नेल्सनने उजवीकडून फ्री कीकवर मारलेला चेंडू गुरप्रीतने पंच केला. कॅल्डेरॉनपाशी चेंडू गेला. त्याने हेडिंग करीत मैल्सन अल्वेसला संधी दिली. मैल्सनने टाचेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण तो टायमिंग साधू शकला नाही. त्यामुळ गुरप्रीतने चेंडू आरमात अडविला.
59व्या मिनिटाला बेंगळुरूने सेट-पीसवर प्रयत्न केला. हर्नांडेझने कर्णधार सुनील छेत्री याच्या दिशेने चेंडू मारला, पण छेत्री चेंडूला अचूक दिशा देऊ शकला नाही.
निकाल: बेंगळुरू एफसी: 1 (मिकू 41) विजयी विरुद्ध चेन्नईयीन एफसी: 0