गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात बेंगळुरू एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी या पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांमध्ये आज (5 डिसेंबर) बरोबरी झाली. उत्तरार्धात 64व्या मिनिटाला फेडेरिको गॅलेगो याने नॉर्थइस्टचे खाते उघडले होते. बेंगळुरूला भरपाई वेळेत चेंचो गील्टशेन याच्या गोलने तारले. त्यामुळे बेंगळुरूने एक गुण खेचून आणला, तर नॉर्थइस्टची विजयाची संधी हुकली. मुख्य म्हणजे बेंगळुरूची अपराजित मालिका कायम राहिली.
बेंगळूरने नऊ सामन्यांत दुसरीच बरोबरी साधली असून सात विजयांसह त्यांचे 23 गुण झाले. त्यांची आघाडी कायम राहिली आहे. नॉर्थइस्टने 10 सामन्यांत चौथी बरोबरी साधताना पाच विजय व एक पराभव अशा कामगिरीसह 19 गुण मिळविले. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले.
नॉर्थइस्टने 64व्या मिनिटाला परिणामकारक गोल केला. बार्थोलोम्यू ओगबेचे याने बॉक्समध्ये फेडेरीको गॅलेगोला पास दिला. गॅलेगोला मार्किंग नव्हते. त्याने बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याला रोखत फटका मारला. प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने चेंडू हाताने थोपविला, पण तो नेटमध्ये जाण्यापासून त्याला रोखता आले नाही.
बेंगळूरने पिछाडीनंतर प्रयत्न सुरु ठेवले. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास डावीकडून किन लुईसने दिलेल्या चेंडूवर सुनील छेत्रीने हेडिंग केले. हा चेंडू चेंचो याच्या दिशेने गेला. त्याने उडी घेत नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमारच्या डावीकडून चेंडू नेटमध्ये मारला.
दोन्ही संघांची सुरवात सावध होती. त्यामुळे प्रामुख्याने मध्य फळीत खेळ झाला. 11व्या मिनिटाला गोलरक्षक पवन कुमारची ढिलाई नॉर्थइस्टला सुदैवाने भोवली नाही. मिस्लाव कोर्मोस्की याच्याकडून चेंडू मिळाल्यानंतर त्याने अकारण वेळ दवडला. तोपर्यंत धुर्त छेत्रीने चपळाई दाखवित त्याच्या पायाजवळील चेंडू मारला, पण थोडी जास्त ताकद लावल्यामुळे चेंडू बाहेर गेला.
दोन मिनिटांनी नॉर्थइस्टला कॉर्नर मिळाला. त्यावर फेडेरिको गॅलेगोने मारलेल्या फटक्यावर ओगबेचे याने हेडिंग केले. त्याने नेटच्यादिशेने केलेला प्रयत्न गुरप्रीतने चपळाईने अपयशी ठरविला. वास्तविक त्यावेळी ओगबेचेला बेंगळुरूच्या एका खेळाडूने थोडा धक्का मारला होता, पण पंचांच्या नजरेतून हे सुटले.
बेंगळुरूच्या एरीक पार्टालूने 20व्या मिनिटाला मध्य फळीतून आगेकूच करीत फटका मारला, पण तो स्वैर होता. अर्ध्या तासाच्या टप्यास बेंगळुरूचा चेंडूवर जास्त ताबा होता, पण नॉर्थइस्टचा प्रयत्न सरस ठरला होता. 30व्या मिनिटाला गॅलेगोने बेंगळूरूच्या बचाव फळीवरून ओगबेचेला लॉब दिला. तेव्हा ओगबेचे चेंडूपर्यंत धावण्याचे टायमिंग साधू शकला नाही. त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला.
पुढील मिनिटास प्रोवात लाक्राने उजवीकडून ओगबेचेला पास दिला. तेव्हा ऑफसाईड असल्याचे वाटल्यामुळे ओगबेचेने पाठलाग केला नाही, पण लाईनमनकडून कोणताच इशारा झाला नाही. तोपर्यंत बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याने बॅकपासद्वारे गुरप्रीतला चेंडू देण्याचा प्रयत्न केला. ओगबेचेने हालचाल करीत फटका मारला, पण तोच ऑफसाईडचा इशारा झाला.
ओगबेचेने 39व्या मिनिटाला धाडसी प्रयत्न केला. मध्य फळीत कौशल्य प्रदर्शित करीत त्याने चेंडूवर ताबा मिळवित रॉलीन बोर्जेसला पास दिला. बोर्जेसने लांबून केलेला प्रयत्न मात्र स्वैर ठरला.
उत्तरार्धाच्या प्रारंभी नॉर्थइस्टने सकारात्मक खेळ कायम ठेवला. ओगबेचे याचा यात पुढाकार होता. 54व्या मिनिटाला त्याने जुआनन याला दोन वेळा चकविले होते, पण अखेरीस जुआनन याने तोल सावरत ब्लॉकिंग केले. दोन मिनिटांनी छेत्रीने पार्तालू याला पास दिला होता. त्यावेळी पार्तालूने मारलेला ताकदवान फटका पवनने डावीकडे झेपावत थोपविला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: तीन वेळच्या जगज्जेत्या नेदरलँड्सचा पराभव करत जर्मनीने मिळवला सलग दुसरा विजय
–आॅस्ट्रेलिया-भारत: जाणून घ्या, अॅडलेड कसोटीबद्दल सर्वकाही…
–असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास…