चेन्नई। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीच्या जेतेपद राखण्याच्या आशांना धक्का बसला आहे. नेहरू स्टेडियवर चेन्नईयीनला आज (29 नोव्हेंबर) केरळा ब्लास्टर्सशी गोलशून्य बरोबरी साधावी लागली. अथक चाली रचूनही फिनिशींगअभावी चेन्नईयीनची निराशा झाली, तर दाक्षिणात्य डर्बीत ब्लास्टर्सला लक्षवेधी प्रयत्न फार कमी करता आले. त्यामुळे डर्बीची लढत 13 हजार 17 प्रेक्षकांसाठी निराशेची ठरली.
चेन्नईयीनने नऊ सामन्यांत दुसरीच बरोबरी साधली. त्यांच्या खात्यात एक विजय जमा आहे. त्यांना सहा पराभव पत्करावे लागले आहेत. चेन्नईयीनचे पाच गुण झाले. त्यांनी नऊवरन एक क्रमांक प्रगती करीत आठवे स्थान गाठले. एफसी पुणे सिटीचेही पाच गुण आहेत, पण चेन्नईयीनचा उणे 6 (10-16) गोलफरक पुण्याच्या उणे 11 (8.19) पेक्षा सरस ठरला. ब्लास्टर्सला नऊ सामन्यांत पाचवी बरोबरी पत्करावी लागली. त्यांच्या खात्यात एकमेव विजय जमा आहे. त्यांचे तीन पराभव झाले आहेत. आठ गुणांसह त्यांचे सातवे स्थान कायम राहिले.
तिसऱ्या मिनिटाला चेन्नईयीनला संधी होती. रफाएल आगुस्तोने उजवीकडून अप्रतिम चाल रचली. त्याने सहा यार्ड बॉक्समध्ये इसाक वनमाल्साव्मा याला पास दिला. त्यावेळी नेट मोकळे असूनही इसाकने स्वैर फटका मारला. सहाव्या मिनिटाला चेन्नईयीनने आणखी एक प्रयत्न केला. इसाकने उजवीकडून पलिकडील बाजूस अँड्रीया ओरलँडीला क्रॉस पास दिला. ओरलँडीला हेडिंगमध्ये मात्र अचूकता साधता आली नाही आणि चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक धीरज सिंग याच्याकडे गेला.
वीसाव्या मिनिटाला ओरलँडीने डावीकडून बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याच्या पासवर जेजे लालपेखलुआ याने डाव्या पायाने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला. 30व्या मिनिटाला फ्री किकवर ओरलँडीने डावीकडून मारलेला चेंडू एली साबिया याच्यादिशेने गेला. साबियाने हेडिंगवर निर्माण केलेल्या संधीतून थोई सिंगने फटका मारला, पण धीरजने डावीकडे झेपावत चपळाईने बचाव केला.
33व्या मिनिटाला थोई आणि जेजे यांनी चाल रचली. जेजेने थोईला पुन्हा पास दिला. थोई मात्र थेट नेटच्या दिशेने फटका मारू शकला नाही आणि स्वैर फटक्यामुळे चेंडू पुन्हा बाहेर गेला.
दुसऱ्या सत्रात आगुस्तोने 48व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला. त्याने बॉक्समध्ये प्रवेश करीत नेटच्या दिशने मैदानालगत फटका मारला, त्यावेळी जेजेला चेंडू मिळू शकला नाही. 55व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या केझीरॉन किझीटो याने साहल अब्दुल समाद याला चांगला पास दिला. समादने डाव्या पायाने फटका मारला, पण प्रतिस्पर्धी गोलरक्षक संजीबन घोषने ब्लास्टर्सच्या पहिल्या लक्षवेधी प्रयत्नाला दाद लागू दिली नाही.
59व्या मिनिटाला निकोला क्रॅमरेविच याला जांघेचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्याऐवजी सैमीनलेन डुंगल मैदानावर उतरला. 66व्या मिनिटाला जेरी लालरीनझुला याने मारलेला क्रॉस शॉट धीरजने पंच लगावत थोपविला. हा चेंडू जवळ येताच ओरलँडीने फटका मारला. त्यावेळी चेंडू नेटच्या दिशेने जात होता, पण हालीचरण नर्झारीने झेपात चेंडू ब्लॉक केला.
चेन्नईयीनला 71व्या मिनिटाला पुन्हा संधी मिळाली. आगुस्तोने थोईला उजवीकडून पास दिला. थोईने बॉक्समध्ये मुसंडी मारत जेजेला पास दिला, जेजेने ओरलँडीच्या दिशेने चेंडू मारला, पण अखेरीस फिनिशींगअभावी चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.
ब्लास्टर्सला 80व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली होती. डुंगलने उडवीकडून आगेकूच करीत बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने घोषला चकविले होते, पण अचूकतेअभावी तो गोल करू शकला नाही. पुढच्याच मिनिटाला बदली खेळाडू संदेश झिंगनच्या फटक्यावर घोषने चेंडू पंच केला. नर्झारीने चपळाईने डुंगलकडे चेंडू घालविला, पण डुंगल पुन्हा अचूकता दाखवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: फ्रान्सवर न्यूझीलंड ठरला भारी
–२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम
–पुढील महिन्यात होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी झाली टीम इंडियाची घोषणा