गोवा | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) चेन्नईयीन एफसीने चौथ्या मोसमात महत्त्वपूर्ण विजय नोंदविताना एफसी गोवा संघावर एकमेव गोलने मात केली. इनिगो कॅल्डेरॉन याने दुसऱ्या सत्रात केलेला गोल निर्णायक ठरला.
बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या दोन संघांमध्ये फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर झालेला सामना चुरशीने खेळला गेला. 52व्या मिनिटाला चेन्नईच्या ग्रेगरी नेल्सनने डावीकडून नेटच्यादिशेने डाव्या पायाने अप्रतिम फटका मारला. गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याने चेंडू थोपविला, पण रिबाऊंडवर जेजे लालपेखलुआ याने चपळाई दाखवित डाव्या पायाने चेंडू मारला. हा चेंडू कॅल्डेरॉनच्या पायाला लागून नेटमध्ये गेला.
चेन्नईने 15 सामन्यांत आठवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे 27 गुण झाले. एक क्रमांक प्रगती करीत त्यांनी जमशेदपूर एफसीला (25) मागे टाकले. बेंगळुरू एफसी (33) आघाडीवर असून पुणे सिटी (28) दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोव्याला 14 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. सहा विजय व दोन बरोबरींसह त्यांचे 20 गुण व सहावे स्थान कायम राहिले. आपल्यापुढे असलेल्या पाच संघांच्या तुलनेत एक सामना कमी असणे ही गोव्याची जमेची बाजू असेल.
पिछाडीवर पडल्यानंतर गोव्याला काही चांगल्या संधी मिळाल्या. 66व्या मिनिटाला एदू बेदियाने डावीकडून घोडदौड करीत चेंडू मारला, पण तो बाहेर गेला. 70व्या मिनिटाला ह्युगो बौमौसने फेरॅन कोरोमीनासला पास दिला. त्यावेळी कोरोमीनासने धुर्तपणे फटका मारला, पण चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग याने जास्त दक्षता घेतली आणि चेंडू अडविला.
नऊ मिनिटे बाकी असताना प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये वादविवाद झाला. चेन्नईच्या ग्रेगरी नेल्सनने गोव्याच्या एदू बेदीयाला पाडले. त्यानंतर फ्री-किक घेताना जेजे लालपेखलुआ याने बाचाबाची केली. त्याला मॅन्युएल लँझारोटेने प्रत्यूत्तर दिले. त्यामुळे लँझारोटेला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. मग रेने मिहेलीच याने रागच्या भरात चेंडू लाथाडला. त्यामुळे त्याला सुद्धा कार्ड दाखविण्यात आले.
त्याआधी पुर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. चेन्नईने सुरवात सकारात्मक केली. तिसऱ्याच मिनिटाला ग्रेगरी नेल्सनने डावीकडून फ्रान्सिस्को फर्नांडीसच्या दिशेने चेंडू मारला. फ्रान्सिस्कोने उडी घेत हेडींग केले, पण ब्रुनो पिन्हैरोने चेंडू ब्लॉक केला. हीच अॅक्शन पुढे सुरु राहिली. इनिगो कॅल्डेरॉनने बॉक्समध्ये चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण त्याने मारलेला चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.
सातव्या मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसने चांगली आगेकूच केली होती. फेरॅन कोरोमीनासला पास देण्याची त्याला चांगली संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू धावत येणाऱ्या कोरोमीनास याच्या डोक्यावरून गेला. 24व्या मिनिटाला मॅन्युएल लँझारोटेने घेतलेल्या फ्री-किकवर एदू बेदीयाने आक्रमक फटका मारला, पण चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग याने अचूक बचाव करीत चेंडूवर ताबा मिळविला. दोन मिनिटांनी जेरी लालरीनझुला याला चेंडू मिळाला. तेव्हा त्याची नेटकडे पाठ होती. त्याने इनिगो कॅल्डेरॉनला पास दिला. कॅल्डेरॉनने मारलेला चेंडू नेटच्या उजवीकडून थोडक्यात बाहेर गेला.
37व्या मिनिटाला चेन्नईच्या बिक्रमजीत सिंगने उजवीकडून घोडदौड करीत चेंडू मारला. तो गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याने थोपविला, पण चेंडू उडून जेजे लालपेखलुआ याच्यापाशी गेला. जेजेने ताकदवान फटका मारला, पण नवीनने यावेळी सुद्धा विलक्षण चपळाईने बचाव केला.