चेन्नई | चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येथील नेहरू स्टेडियमवर चेन्नईने दुसऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्याच्या सामन्यात एफसी गोवा संघाला 3-0 असे गारद केले. पुर्वार्धातील पहिल्या जेमतेम अर्ध्या तासात दोन गोल करीत चेन्नईने विजयाचा पाया रचला. गोव्याच्या बचाव फळीतील उणीवांचा पुरेपूर फायदा उठवित चेन्नईने भक्कम खेळ केला.
चेन्नईचा हुकमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याला घरच्या मैदानावर फॉर्म गवसला. त्याने दोन गोलांसह विजयाच मोलाचा वाटा उचलला. संघाचे खाते उघडतानाच त्याने अखेरच्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोलही केला. पुर्वार्धात धनपाल गणेश याने एका गोलची भर घातली. चेन्नईसाठी गोलरक्षक करणजीत सिंग याचा चपळ आणि चोख बचाव सुद्धा महत्त्वाचा ठरला. चेन्नईची येत्या शनिवारी (दिनांक 17 मार्च) बेंगळुरू एफसी संघाविरुद्ध बेंगळुरूमधील श्री कांतिरवा स्टेडियमवर अंतिम लढत होईल.
साखळी टप्याच्या गुणतक्त्यात बेंगळुरूने अव्वल, तर चेन्नईने दुसरा क्रमांक मिळविला होता. आता या दोन संघांमध्येच दाक्षिणात्य डर्बीचा निर्णायक मुकाबला होईल. गोव्याने साखळीत सर्वाधिक तब्बल 42 गोल केले होते, त्याचवेळी दुसरीकडे प्रमुख संघांमध्ये बचाव कमकुवत असल्यामुळे त्यांच्यावर सर्वाधिक 28 गोल झाले होते. गोव्याने बाद फेरी गाठताना धडाकेबाज खेळाच्या जोरावर सलग तीन विजय मिळविले होते, पण घरच्या मैदानावर उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात गोव्याला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. चेन्नईने अवे गोल नोंदविण्याची बहुमोल कामगिरी सुद्धा केली. त्यामुळे गोव्यावर दडपण होते. आक्रमक खेळाच्या जोरावर सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा जॉन ग्रेगरी यांच्या चेन्नईला चकविण्याची अपेक्षा होती, पण अर्ध्या तासात दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर गोव्याच्या फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे या जोडीला प्रतिआक्रमण रचता आले नाही.
दोन्ही संघांनी आक्रमक सुरवात केल्यामुळे खेळ वेगवान झाला. चेन्नईची मदार जेजेवर होती. त्याची एक संधी हुकली होती, पण 26व्या मिनिटाला त्याने दर्जा प्रदर्शित केला. ग्रेगरी नेल्सन याने डावीकडून अप्रतिम चाल रचली. त्याने पास दिला त्यावेळी जेजेला मार्किंग नव्हते. याचा फायदा घेत जेजेने गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकविले.
तीन मिनिटांनी गोव्याला पुन्हा ढिसाळ बचावाचा फटका बसला. फ्री-किकवर नेल्सनने डावीकडून चेंडू अप्रतिम मारला. त्याने नेटच्या पलिकडील बाजूच्या दिेशेने किक मारला. याचा अचूक अंदाज घेत गणेशने उंच उडी घेत अचूक हेडिंग केला. वास्तविक तेव्हा चिंगलेनसाना सिंग याने गोव्यासाठी बचाव नीट करायला हवा होता. त्याने उडी घेत हेडिंग केले सुद्धा, पण तो चकला.
सामन्याची सुरवात जोरदार झाली. जेजे लालपेखलुआ, रॅफेल आगुस्टो, चिंगलेनसाना, सर्जीओ ज्यूस्ट अशा खेळाडूंमध्ये धुमश्चक्री झाली. पाचव्या मिनिटाला गोव्याने पहिले आक्रमण केले. मंदार राव देसाई याने नारायण दासला पास दिला. नारायणने पुन्हा मंदारकडे चेंडू सोपविला. मंदारने नेटच्या दिशेने फटका मारला. चेन्नईच्या जेरी लालरीनझुलाने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून स्वयंगोलची चुक थोडक्यात टळली. 11व्या मिनिटाला चेन्नईला गोलरक्षक करणजीत सिंगने तारले. ह्युगो बौमौसने डावीकडून चाल रचली. त्याने मंदारकडे चेंडू मारला. मंदारने मारलेला चेंडू करणजीतने तोल साधत अडविला.
निकाल :
उपांत्य फेरी ः दुसरा टप्पा ः
चेन्नईयीन एफसी : 3 (जेजे लालपेखलुआ 26, 90 धनपाल गणेश 29) विजयी विरुद्ध एफसी गोवा : 0
पहिला टप्पा ः चेन्नईयीन : 1 बरोबरी विरुद्ध गोवा : 1
अॅग्रीगेट ः चेन्नईयीन : 4 विजयी विरुद्ध गोवा : 1