चेन्नई : हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात शनिवारी चेन्नईयीन एफसीने येथील नेहरू स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीला 1-0 असे हरविले. दुसऱ्या सत्रात रेने मिहेलीच याने पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला. चेन्नईने साखळीची विजयाने सांगता करीत गुणतक्त्यात दुसरा क्रमांक मिळविला.
चेन्नईने 18 सामन्यांत नववा विजय मिळविला असून पाच बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 32 गुण झाले. त्यांनी एफसी पुणे सिटीला (30) मागे टाकले. चेन्नईची बाद फेरीतील आगेकूच यापूर्वीच नक्की झाली होती. मुंबईला 18 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. सात विजय व दोन बरोरींसह 23 गुण मिळवून त्यांचे सातवे स्थान कायम राहिले.
65व्या मिनिटाला मुंबईच्या मेहराजुद्दीन वडू याने पेनल्टी क्षेत्रात चेन्नईचा कर्णधार जेमी गॅव्हीलन याला पाडले. त्यामुळे चेन्नईला पेनल्टी बहाल करण्यात आली. ती घेताना मिहेलीचने बराच वेळ खर्च केला. मुंबईचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य आधी झेप टाकेल म्हणून त्याने सुरवातीला फटकाच मारला नाही. अखेर त्याने फटका मारला. अरिंदमने अंदाज बरोबर घेत डाव्या हाताने चेंडू अडवायचा प्रयत्न केला, पण चेंडू नेटमध्ये गेला.
अंतिम टप्यात मुंबईचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. उजवीकडून अचीले एमाना याने हेडींगवर लिओ कोस्टाला पास दिला. लिओने मारलेल्या चेंडूला बलवंत सिंगने नेटची दिशा दिली होती, पण लिओ चेंडू मिळाला तेव्हा ऑफसाईड होता.
पुर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. सहाव्या मिनिटाला चेन्नईला कॉर्नर मिळाला. गॅव्हीलनने त्यावर पेनल्टी क्षेत्रात चेंडू छान मारला, पण मुंबईने बचाव केला. त्यानंतर चेंडू पेनल्टी क्षेत्राबाहेरील चेन्नईच्या बिक्रमजीत सिंग याच्याकडे गेला. त्याने प्रयत्न केला, पण फटका स्वैर असल्यामुळे चेंडू बाहेर गेला.
आठव्या मिनिटाला चेन्नईने आणखी एक प्रयत्न केला. ज्यूड नौरोहने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. मुंबईच्या बचाव फळीच्या ढिलाईनंतर अखेर अरींदम भट्टाचार्यने चपळाईने चेंडू अडविला.
13व्या मिनिटाला मुंबईच्या झकीर मुंडाम्पारा याने पेनल्टी क्षेत्राबाहेरून नेटच्या दिशेने मारलेला चेंडू चेन्नईचा गोलरक्षक पवन कुमार याने अडविला.
17व्या मिनिटाला चेन्नईच्या जेमी गॅव्हीलन याने उजव्या बाजूने डाव्या पायाने मारलेला चेंडू अरिंदमने थोपविला. चेंडू मिहेलीच याच्यापाशी पडला. त्यावेळी मिहेलीचला चांगली संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू बाहेर गेला.
निकाल :
चेन्नईयीन एफसी : 1 (रेने मिहेलीच 67-पेनल्टी)
विजयी विरुद्ध मुंबई सिटी एफसी : 0