जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (१ नोव्हेंबर) येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सामना होणार. गोव्याचा स्टार स्ट्रायकर फेरन कोरोमिनस (कोरो) या लढतीसाठी रेड कार्डमुळे निलंबीत आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत गोव्याची कामगिरी कशी होणार याची चर्चा सुरु आहे.
स्पेनच्या कोरोने मागील मोसमात गोल्डन बुटचा बहुमान मिळविला. यंदा सुद्धा चार सामन्यांतून सहा गोल करीत तो संयुक्त आघाडीवर आहे. एफसी पुणे सिटीविरुद्ध ४-२ अशा विजयात त्याने दोन गोल केले, पण त्याला अंतिम टप्यात रेड कार्ड मिळाले. गेल्या मोसमात चेन्नईयीन एफसीविरुद्ध पदार्पण केल्यापासून तो आयएसएल सामन्यात प्रथमच खेळत नसेल.
गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, मैदानावर आम्हाला सांघिक प्रयत्न करावे लागतील आणि अपेक्षित निकाल साधावा लागेल.
जमशेदपूरचे प्रशिक्षक सेझार फरांडो यांच्या मते सुद्धा गोव्याच्या संघात केवळ कोरोशिवाय खुप काही आहे. ते म्हणाले की, कोरो चांगला खेळाडू आहे. गोवा चांगला संघ आहे. कोरोसाठी माझी वेगळी अशी काही योजना नव्हती. गोव्याविरुद्ध संघ म्हणून मी तयारी करीत आहे. आम्ही संघ म्हणून खेळलो तर जिंकू शकू. मी केवळ माझ्या संघाचा विचार करीत आहे.
जमशेदपूरने मुंबई सिटीवरील विजयासह मोहिमेची सुरवात धडाक्यात केली. त्यानंतर मात्र त्यांना बेंगळुरू एफसी, एटीके, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि केरळा ब्लास्टर्स अशा चार सामन्यांत सलग बरोबरी साधावी लागली. ब्लास्टर्सविरुद्ध त्यांची बरोबरीची मालिका खंडित होण्याची चिन्हे होती, पण डेव्हिड जेम्स यांच्या मार्गदर्शनाखालील प्रतिस्पर्ध्याने उत्तरार्धात दोन गोल केले. त्यामुळे जमशेदपूरच्या निर्णायक विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
फरांडो यांनी पुढे सांगितले की, मी माझ्या संघाविषयी आनंदात आहे. ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीदरम्यान मात्र मी संतापलो, याचे कारण आम्ही काही घोडचूका केल्या. एटीकेविरुद्ध आम्ही तीन, तर नॉर्थइस्टविरुद्धही एक चूक केली. मागील सामन्यात ब्लास्टर्सने पेनल्टी दवडली. त्यांच्या पहिल्या गोलच्यावेळी आमचे सहा खेळाडू पेनल्टी बॉक्समध्ये होते. त्यानंतरही आम्ही गोल रोखू शकलो नाहीत.
त्या धक्यानंतरही फरांडो हे स्टार स्ट्रायकर टीम कॅहील याने खाते उघडल्यामुळे आनंदात आहेत. स्पेनच्या फरांडो यांचा संघ लिगमध्ये अद्याप अपराजित असलेल्या चार संघांमध्ये आहे. आता धडाकेबाज खेळ करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याशी त्यांची गाठ पडत आहे.
गोव्याने आपल्या मोहिमेची सुरवात नॉर्थइस्टविरुद्ध बरोबरीने केली. त्यानंतर गोव्याने सलग तीन दणदणीत विजय मिळविले. लॉबेरा यांचे खेळाडू गोलचा धडाका लावत लक्ष वेधून घेत आहेत. चार सामन्यांत त्यांच्या खात्यात तब्बल १४ गोल जमा आहेत. लॉबेरा यांनी सांगितले की, जमशेदपूरविरुद्धचा सामना फार अवघड असेल. त्यांचा संघ चुरशीने खेळतो. मला स्पेनचे फरांडो माहित आहेत. मला त्यांची प्रशिक्षणाची शैली माहित आहे. त्यामुळे मी फार चुरशीच्या आणि खडतर सामन्याची अपेक्षा ठेवली आहे.
गेल्या मोसमात गोव्याने दोन्ही लढतींत जमशेदपूरपेक्षा सरस कामगिरी केली. आता स्टार स्ट्रायकरच्या अनुपस्थितीत गोवा वर्चस्व कायम राखणार का याची प्रतिक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय
–भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा