---Advertisement---

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

On: रविवार, नोव्हेंबर 4, 2018 7:30 AM
---Advertisement---

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (4 नोव्हेंबर) येथील नेहरू स्टेडियमवर फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर एफसीचे आव्हान दिल्ली डायनामोज संघासमोर असेल. दिल्लीच्या संघाला नशीब पालटण्याची आज अपेक्षा असेल.

दिल्लीला सहा सामन्यांत तीन बरोबरी आणि तेवढेच पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना पहिला विजय संपादन करण्याची आशा आहे.  दिल्लीचा हा घरच्या मैदानावरील पाचवा सामना आहे.

गोम्बाऊ म्हणाले की, “जोपर्यंत आकडेवारीनुसार संधी आहे तोपर्यंत आम्ही पहिल्या चार संघांत स्थान मिळवून बाद फेरी गाठण्यासाठी संघर्ष करू. आम्हाला संघाच्या स्वरुपात वैविध्य आणावे लागेल. आम्ही केवळ सहा गुणांनी मागे आहोत. याचा अर्थ दोन सामने जिंकले तर आम्ही पुढे जाऊ. परिस्थिती आवाक्याबाहेर नक्कीच गेलेली नाही आणि आम्हाला कसून संघर्ष करावा लागेल.”

रेने मिहेलीच आणि अॅड्रीया कॅर्मोना यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तब्येत खराब झाल्याने ते दोघे मागील सामना खेळू शकले नव्हते. आता ते सज्ज झाल्यामुळे गोम्बाऊ यांना दिलासा मिळाला आहे. अर्थात हे दोघे अंतिम संघात आले तरी जमशेदपूरचा धडाका रोखणे यजमान संघासाठी सोपे नसेल. जमशेदपूरने मागील सामन्यात एफसी गोवा संघाचा 4-1 असा धुव्वा उडविला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.

गोम्बाऊ यांनी सांगितले की, “जमशेदपूरचा संघ फार चांगला आहे. त्यांनी नुकतेच गोव्यासारख्या उत्तम संघाला हरविले आहे. ते चांगला फुटबॉल खेळतात. सामना जिंकण्यासाठी ते सुरवातीपासून दमदार दृष्टिकोन प्रदर्शित करतात. आम्ही निर्णायक विजयासह तीन गुण जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक सामना वेगळा असतो. जमशेदपूरला हरवू शकू अशी मला आशा आहे.”

गोव्यावरील सनसनाटी विजयानंतर जमशेदपूरचा संघ वेगळ्याच उंचीवर गेला आहे. फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल. प्रशिक्षक सेझार फरांडो यांनी खेळाडूंना आळीपाळीने संधी देण्याचे धोरण राबविताना मागेपुढे पाहिलेले नाही. सामने वेगाने असले तरी खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे त्यांना त्यामुळेच शक्य झाले आहे.

फरांडो यांनी सांगितले की, “आम्ही बदल करतो, कारण मला माझे सगळे खेळाडू प्रेरीत हवे आहेत. ते प्रेरीत असतील तर मी कोणत्याही खेळाडूला पाचारण करू शकतो आणि त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. सलग चार सामने खेळायचे असतात तेव्हा संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज असते. हे नाणेफेकीसारखे असते, कधी तुम्ही जिंकता, तर कधी हरता.”

स्पेनचे फरांडो प्रतिस्पर्ध्याविरुद्ध प्रतीआक्रमण रचण्यास आढेवेढे घेत नाहीत. त्यांनी मध्य फळीत परदेशी खेळाडूंना घेतले आणि धडाकेबाज खेळाचे डावपेच लढवित विजय साकार केला. फरांडो म्हणाले की, “दिल्लीचा संघ या घडीला फार धोकादायक आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आणि चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांना जिंकायचे आहे आणि त्यामुळे सामना चुरशीचा होईल.”

मायकेल सुसैराज याने चांगला फॉर्म दाखविला आहे. चेन्नई सिटी एफसीकडून त्याला घेण्यासाठी मोजलेली ट्रान्स्फर फी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न तो करीत आहे. भारताच्या या स्ट्रायकरने आतापर्यंत तीन गोल केले आहेत. बचावपटूंना चकविण्याची क्षमता दिल्लीसाठी आव्हानात्मक ठरू शकेल. जमशेदपूरचा संघ अपराजित मालिका कायम राखू शकणार का की दिल्ली तीन गुण मिळविणार याची उत्सुकता या लढतीत असेल. त्यामुळे रविवारी प्रेक्षकांना रंगतदार लढत पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी

बापरे! १९ वर्षीय गोलंदाजाने घेतल्या एकाच डावात १० विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment