जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (29 ऑक्टोबर) जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसी आणि केरळा ब्लास्टर्स या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ अपराजित आहेत, पण त्यांच्या खात्यात एकच विजय जमा आहे. जमशेदपूरचे प्रशिक्षक सेझार फरांडो यांच्या मते आता प्रत्येक लढत अंतिम सामन्याइतकी महत्त्वाची असेल.
जमशेदपूरने सलामीला मुंबई सिटी एफसीवर विजय मिळविला. त्यानंतर त्यांचे सलग तीन सामने बरोबरीत सुटले. ब्लास्टर्सने सलामीला एटीकेला (अटलेटिको दी कोलकाता) हरविले. त्यानंतर त्यांनी दोन बरोबरी साधल्या आहेत.
जमशेदपूरचा संघ चेंडूवर ताबा ठेवतो. त्यांनी वर्चस्व राखले असले तरी संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले आहे. याशिवाय शूटींगमधील अचूकतेच्या अभावाचा त्यांना फटका बसला आहे. त्यांचा स्टार स्ट्रायकर टीम कॅहील अद्याप पूर्ण सामना खेळण्याइतपत तंदुरुस्त नाही. ही फरांडो यांच्यासाठी एक समस्या ठरली आहे. ब्लास्टर्सविरुद्ध तो बदली खेळाडू म्हणून उतरेल आणि त्याने आघाडी फळीत प्रेरणादायी खेळ करावा अशी संघाला अपेक्षा आहे.
जमशेदपूरने बचावाच्या बाबतीत चांगली कामगिरी बजावली आहे. टिरी याने ही सुत्रे समर्थपणे सांभाळली आहेत. मारीओ आर्क्वेस आणि मेमो मध्य क्षेत्रात वर्चस्व राखण्याचा आणि फरांडो यांच्या संघासाठी पाया रचण्याचा प्रयत्न करतील.
तरुण खेळाडू मोबाशीर रेहमान हा अद्याप जायबंदी आहे आणि फरांडो यांना त्याच्याशिवाय योजना आखावी लागेल.
फरांडो यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय लीगमध्ये 38 सामने असतात, पण या लीगमध्ये 18 सामने आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना अंतिम सामन्यासारखा असेल. माझ्या दृष्टिने उद्याचा सामना फायनलच असेल.”
ब्लास्टर्सचे आतापर्यंत केवळ तीन सामने झाले आहेत, पण सलामीला एटीकेवरील 2-0 अशा विजयानंतर त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांचा आताचा प्रतिस्पर्धी जमशेदपूरप्रमाणेच त्यांना नंतरच्या लढतींत ढिसाळ खेळाचा आणि अंतिम क्षणी गोल पत्करण्याचा फटका बसला.
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांना स्ट्रायकर्सकडून जास्त गोलांची, संघाने पूर्ण 90 मिनिटे एकाग्रता राखण्याची अपेक्षा आहे. जेम्स यांनी यंदाच्या मोसमात परदेशी खेळाडूंचा पूर्ण कोटा एकदाही वापरलेला नाही. त्याऐवजी त्यांनी महंमद रकीप, साहल अब्दुल समाद अशा तरुणांना संधी दिली आहे. त्यांनी चांगला खेळ केला असून जेम्स यांना जमशेदपूरविरुद्धही उत्साहवर्धक खेळाची अपेक्षा आहे.
अनास एडाथोडीका तीन सामन्यांच्या निलंबनानंतर उपलब्ध आहे आणि जेम्स यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. ते म्हणाले की, “माझ्या बाजूला बेंचवर बसणारा अनास अखेर खेळण्यास उपलब्ध आहे. त्यामुळे संघनिवडीत सर्वस्वी वेगळ्या दृष्टिकोनाचा अवलंब करता येईल. त्यामुळे संपूर्ण संघ आणखी चुरशीने खेळू शकतो. प्रशिक्षक म्हणून प्रत्येक खेळाडूने संघातील स्थानासाठी संघर्ष करायला हवा अशी तुमची अपेक्षा असते.”
ब्लास्टर्सविरुद्ध जमशेदपूर चेंडूवर ताबा राखतील. ब्लास्टर्स त्यांच्या प्रशिक्षकांना अपेक्षित अशा थेट खेळास पसंती देईल. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरेल
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: गोव्याची विजयाची हॅट्ट्रीक
–Video: शतक साजरे करणाऱ्या रहाणेला या कारणामुळे सुरेश रैनाने थांबवले
–सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज