बाद फेरीसाठी या दोन संघांमध्ये थेट चुरस होती. गोव्याला बरोबरी चालु शकली असती, तर जमशेदपूरला निर्णायक विजय अनिवार्य होता, पण अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याला घोडचुकीमुळे सातव्याच मिनिटाला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. मध्यंतरास गोव्याकडे एका गोलची आघाडी होती. फेरॅन कोरोमीनासने दोन, तर मॅन्युएल लँझारोटेने एक गोल केला.
सातव्याच मिनिटाला सामन्यातील निर्णायक क्षण आला. मॅन्युएल लँझारोटे याने चेंडूवर ताबा मिळविला होता. त्याचवेळी कोरोमीनास नेटच्या दिशेने जोरदार घोडदौड करीत असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने लांबवर पास दिला. कोरोमीनासचा धोका ओळखून जमशेदपूरचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल पुढे सरसावला. पेनल्टी क्षेत्राबाहेर उडी घेत त्याने चेंडू हाताने अडविला. पंचांनी हे स्पष्टपणे पाहिले. त्यामुळे त्यांनी सुब्रतला लाल कार्ड दाखविले. या निर्णयावर सुब्रत नाराज होता, पण त्याला मैदान सोडावे लागले. परिणामी संजीबन घोष याच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी देण्यात आली, तर एक खेळाडू कमी करण्यासाठी बिकाश जैरू याचा बळी देणे जमशेदपुरचे मुख्य प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांना भाग पडले.
जमशेदपूरचा एक खेळाडू कमी झाल्यामुळे एरवी आक्रमक खेळ करणाऱ्या गोव्याचे पारडे आणखी जड झाले. 29व्या मिनिटाला त्यांनी खाते उघडले. उजव्या बाजूने ह्युगो बौमौस याने चाल रचत सेरीटॉन फर्नांडीसला पास दिला. सेरीटॉनने चेंडूवर ताबा मिळवित पेनल्टी क्षेत्रात घोडदौड केली आणि पलीकडील बाजूला चेंडू मारला. हा चेंडू अडविण्यासाठी जमशेदपूरच्या टिरीने घसरत केलेला प्रयत्न अपयशी ठरला. त्याचवेळी घोषला परिस्थितीचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे जमशेदपूरच्या मोकळ्या पडलेल्या नेटमध्ये कोरोमीनासने चेंडू मारला. कोरोमीनास याचा हा मोसमातील 17वा गोल ठरला.
उत्तरार्धात गोव्याची सुरवात आक्रमक होती. 51व्या मिनिटाला लँझारोटने उंच मारलेला चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या बचाव फळीवरून पुढे गेला. कोरोमीनासने कौशल्य पणाला लावत त्यावर नियंत्रण मिळवित अप्रतिम फटका मारला. 18 मिनिटांनी मग कोरोमीनासने डावीकडून चाल रचत दिलेल्या पासचे लँझारोटेने सोने केले.
75व्या मिनिटाला गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याने पेनल्टी क्षेत्राबाहेर चेंडू डाव्या दंडाने ढकलला. त्यामुळे त्याला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. गोव्याने लक्ष्मीकांत कट्टीमनी याला पाचारण करताना प्रोणय हल्दरला बाहेर पाठवून एक खेळाडू कमी केला. आता दोन्ही संघांचे प्रत्येकी दहा खेळाडू मैदानावर होते, पण याचा फायदा घेणे जमशेदपूरच्या आवाक्याबाहेरचे ठरले.
निकाल :
जमशेदपूर एफसी : 0 पराभूत विरुद्ध एफसी गोवा : 3
(फेरॅन कोरोमीनास 29, 51, मॅन्युएल लँझारोटे 69)
—–
उपांत्य फेरी