बेंगळुरू | बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांनी हिरो इंडियन सुपर लिगच्या अंतिम फेरीत योगायोगाने प्रवेश केलेला नाही. योजनाबद्ध संघबांधणी, संघनिवड आणि पूर्वीपासून ज्यांचा खेळ माहित अशा खेळाडूंवर कायम ठेवलेला विश्वास अशा गोष्टी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत.
या दोन संघांनी सर्वाधिक सातत्य दाखवित जवळपास पूर्ण मोसमात पहिल्या चार क्रमांकांमध्ये किंवा त्याच्या आसपास स्थान राखले. साखळीत त्यांनी पहिले दोन क्रमांक मिळविले.
दक्षिणेतील या दोन संघांनी खेळआडूंच्या निवडप्रक्रियेत सारख्याच दृष्टिकोनाचा अवलंब केला. दोन्ही संघांचे स्वरुप सारखे होते. खेळाडूंची ड्राफ्ट पद्धतीने निवड करीत त्यांनी संघ बनविले.
क्लब संस्कृती आणि खेळाची शैली ठाऊक असलेल्या खेळाडूंना आणण्यासाठी या क्लबच्या व्यवस्थापनाने नियोजनबद्ध प्रयत्न केले. आधीच्या मोसमातील कामगिरीमुळे संधी देण्यावरही त्यांचा कटाक्ष होता. या धोरणाला चांगली फळे मिळाली.
बेंगळुरूने 11 खेळाडू कायम ठेवले, तर चेन्नईयीनने 10 खेळाडूंना पुन्हा करारबद्ध केले. 2015 मध्ये चेन्नईकडून खेळलेल्या मैल्सन आल्वेसचा विचार केल्यास चेननईचा हा आकडा सुद्धा 11 होतो.
बेंगळुरू एफसीने सुनील छेत्री आणि उदाता सिंग यांच्यासह निशू कुमार आणि मल्सावामझुला यांना कायम ठेवले. ड्राफ्टच्यावेली खाब्रा, लेनी रॉड्रीग्ज, लालथुआमाविया राल्टे आणि अल्विन जॉर्ज असे खेळाडू मिळविण्यावर त्यांचा भर होता.
परदेशी खेळाडूंच्या बाबतीतही असेच महणता येईल. सेंटर-बॅक जॉन जॉन्सन आणि जुआनन यांच्या अस्तित्वाला याचे श्रेय द्यावे लागेल. बेंगळुरूच्या स्थापनेपासून जॉन्सन संघात आहे, तर जुआनन 2016 मध्ये अल्बर्ट रोका यांच्या बरोबर आला.
रोका हे स्वतः मागील मोसमापासून पुढे पदावर कायम राहिले. आधी मार्गदर्शन केलेले बहुसंख्य खेळाडू असल्यामुळे त्यांना फायदा झाला. छेत्री, उदांता, खाब्रा व लेनी हे रोका यांच्या संघातील महत्त्वाचे घटक होते. खेळाडू कायम राहिल्यामुळे रोका आपल्या शैलीचा खेळ भक्कमपणे रुजवू शकले.
चेन्नईयीन एफसीने सुद्धा अशाच धोरणाचा अवलंब केला. जेजे लालपेखलुआ, करणजीत सिंग, अनिरुद्ध थापा, जेरी लालरीनझुला आणि बाओरिंगदाओ बोडो यांना कायम ठेवण्यात आले. धनपाल गणेश, धनचंद्र सिंग, थोई सिंग आणि पवन कुमार हे आधीच्या वर्षांत चेन्नईकडे होते. त्यांना स्थानिक खेळाडूंच्या ड्राफ्टदरम्यान निवडण्यात आले.
सातत्याच्या या आघाडीवर ब्राझीलचा मध्यरक्षक रॅफेल आगुस्टो याचा समावेश होता, जो 2016 पासून संघाचा भाग राहिला आहे.
जॉन ग्रेगरी संघासाठी नवे होते, पण त्यांनी खेळाडूंच्या गुणांचा पटकन अंदाज घेतला आणि त्यांच्यात संघभावना निर्माण केली. मोसमातील हे चेन्नईचे वैशिष्ट्य ठरले आहे. शनिवारी बेंगळुरूच्या आव्हानाला सामोरे जाताना यावरच चेन्नईची मदार असेल.