नवी दिल्ली: हिरो इंडियन सुपर लिगच्या पाचव्या मोसमात बुधवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोज आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होत आहे. त्यावेळी जुने मित्र मैदानावर प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकतील. यात एक प्रशिक्षक आणि एका खेळाडूचा समावेश आहे.
प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल केंद्रस्थानी असतील. गेल्या मोसमात ते दिल्ली संघाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ केवळ आठव्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकला. ही कामगिरी निराशाजनक ठरली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीचा निरोप घेतला होता. मग त्यांना पुणे सिटीने आमंत्रित केले. आता याच पोर्तुगाल यांना सलामीच्या लढतीत स्थानिक संघाला काही सिद्ध करून दाखवावे लागेल. त्यासाठी विजयाने सुरवात करण्यावर त्यांचा भर असेल.
दिल्लीने पोर्तुगाल यांच्या जागी स्पेनच्याच जोसेप गोम्बाऊ यांना नियुक्त केले. त्यांनी क्लबच्या परदेशी खेळाडूंच्या ताफ्याची भक्कम फेररचना केली आहे. त्यास त्यांनी गुणी भारतीय तरुणांची जोड दिली आहे. गोम्बाऊ यांनी सांगितले की, प्रत्येकाचे लक्ष्य विजयाचे आहे आणि माझे वेगळे नाही. आम्हाला सुरवातीपासून आव्हान निर्माण करायचे आहे.
गोम्बाऊ यांनी चार देशबांधव करारबद्ध केले आहेत. यातील मार्कोस टेबार याचा करार सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. याचे कारण तो गेल्या मोसमात पुण्याकडे होता. आता तो दिल्लीत परतला असून त्याची दिल्लीतील ही दुसरी खेळी आहे. गेल्या मोसमात तो मध्य फळीत अद्वितीय सुत्रधार ठरला होता. आता हाच मार्कोस आपल्या आधीच्या संघाविरुद्ध फॉर्म कायम राखेल अशी गोम्बाऊ यांना आशा आहे.
गोम्बाऊ यांनी सांगितले की, मार्कोस हा एक फार चांगला खेळाडू आहे. आमच्या मोहिमेची बांधणी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याशिवाय तो एक चांगला तरुण आहे. तो सर्वांशी मित्रत्वाने वागतो. भारतीय खेळाडू त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. असा दिलदार खेळाडू संघासाठी फार मोलाचा ठरतो.
परदेशी खेळाडूंच्या कराराबाबत पुण्याकडे स्टार आहेत. पोर्तुगाल यांना आघाडी फळीत पर्यायांचे सुख असेल. ते म्हणाले की, माझ्यासाठी हे आणखी एक आव्हान आहे. मी दिल्लीचे आभार मानतो. तेथे मी खरोखरच आनंदात होतो, पण आता मी पुण्याशी करार केला आहे. पुणे संघाच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास आहे. आमच्याकडे फार चांगले खेळाडू आहेत. आम्ही कामगिरीत सुधारणा करायचा प्रयत्न करू. हे सोपे नसेल, पण माझा आमच्या विचारसरणीवर विश्वास आहे.
मार्सेलिनीयो आणि एमिलीयानो अल्फारो ही जोडी आघाडी फळीची धुरा सांभाळेल. ही जोडी भेदक खेळ करते आणि गेल्या मोसमात त्यांनी हे सिद्ध करून दाखविले होते. साहजिकच दिल्लीच्या बचाव फळीसमोर मोठेच आव्हान असेल. वेगवान विंगर्स आशिक कुरुनियान आणि निखील पुजारी दोन्ही बाजूला असल्यामुळे दिल्लीच्या बचावपटूंना प्रत्येक क्षणी दक्ष राहावे लागेल.
पुण्याचा संघ स्थिरावल्यासारखा वाटतो. हे संघ भक्कम बनला आहे. त्यामुळे पोर्तुगाल यांना सकारात्मक प्रारंभाची अपेक्षा असेल. दुसरीकडे दिल्ली संघातील तरुण खेळाडूंचा उदंड उत्साह आणि जोश गोम्बाऊ यांच्यासाठी मोलाचा असेल.
पोर्तुगाल आपल्या आधीच्या क्लबविरुद्ध काही सिद्ध करून दाखविणार की दिल्ली आपल्या आधीच्या मार्गदर्शकांवर मात करणार याची उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–माजी कर्णधार एमएस धोनीबरोबर घडला विलक्षण योगायोग
–विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी
–करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका