बेंगळुरू | बेंगळुरू एफसीचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्यासाठी यंदाचा हिरो इंडियन सुपर लीगचा मोसम लक्षवेधी ठरला आहे. युरोपमधील साखळीचा अनुभव घेऊन मायदेशी परतलेला गुरप्रीत आता आयएसएलमधील सहभाग संस्मरणीय ठरवू शकेल. तो कारकिर्दीतील पहिल्या लीग विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे.
गुरप्रीत आतापर्यंत कोणत्याही अव्वल श्रेणी साखळीत 18 सामने खेळलेला नव्हता. अशावेळी आयएसएलमधील त्याची कामगिरी पाहता नॉर्वेमधील साखळीच्या अनुभवामुळे त्याने कौशल्यात किती प्रगती साध्य केली आहे हे स्पष्ट होते.
गुरप्रीत पूर्वी ईस्ट बंगालकडून दोन वेळा आय-लीग उपविजेता ठरला. आता या 26 वर्षीय गोलरक्षकाचा आणि त्याच्या संघाचा फॉर्म बघता त्याची विजेतेपदाची प्रतिक्षा लवकरच संपण्याची अपेक्षा आहे.
भारताचा हा अव्वल गोलरक्षक म्हणाला की, मी अद्याप विजेता ठरलेलो नाही. त्यामुळे जल्लोषाची नेमकी भावना काय असते हे मला ठाऊक नाही. आम्ही जिंकलो तर ते उत्तमच ठरेल, पण आम्ही एकावेळी एका सामन्याचा विचार करीत आहोत. या घडीला सुद्धा असेच लक्ष्य आहे.
बेंगळुरूसाठी पदार्पणात आयएसएल विजेतेपद मिळविण्याची आकांक्षा साध्य करण्यात गुरप्रीतची कामगिरी अनन्यसाधारण महत्त्वाची असेल. गुरप्रीत जबरदस्त फॉर्मात आहे. उपांत्य फेरीत त्याने पुण्याचा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील बहुमोल गोल (अवे गोल) रोखण्यात प्रारंभीच चपळाई दाखविली. साहजिकच गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे.
नॉर्वेतील स्टॅबाएक एफसीकडून खेळताना कमावलेला अनुभव त्याच्यासाठी फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे. तो राखीव संघाच्या साखळीत नियमितपणे दर आठवड्याला खेळला. प्रत्यक्ष स्पर्धात्मक सामन्यातील सहभागाचा कालावधी त्याचा आत्मविश्वास कमालीचा उंचावण्यात निर्णायक ठरला.
या लिगमध्ये गोलरक्षकांचा प्रभाव पडला. त्यातही गुरप्रीतची कामगिरी कितीतरी सरस ठरली. जमशेदपूर एफसीचा सुब्रत पॉल, चेन्नईयीन एफसीचा करणजीत सिंग आणि मुंबई सिटी एफसीचा अमरिंदर सिंग यांनी आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले, पण गुरप्रीतइतका प्रभावी कुणीच ठरला नाही.
गुरप्रीतच्या नेटसमोरील भक्कम अस्तित्वामुळे बेंगळुरूचा बचाव लिगमध्ये सर्वोत्तम ठरला आहे. बेंगळुरूविरुद्ध 20 सामन्यांत केवळ 17 गोल झाले आहेत. यात गुरप्रीत 18 सामने खेळला. सात वेळा त्याने क्लीन शिट राखली. भुवनेश्वरमध्ये त्याने जमशेदपूरचे आक्रमण एकहाती रोखले.
आता शनिवारी अंतिम सामन्यात चेन्नईयीन एफसीविरुद्ध अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास तो प्रयत्नशील असेल. यात तो यशस्वी ठरला तर त्याच्या खात्यात पहिले लीग विजेतेपद जमा झालेले असेल.