गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाने फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमच्या होमग्राऊंडवर आज (24 ऑक्टोबर) दमदार प्रारंभ केला. एफसी मुंबई सिटीचा 5-0 असा धुव्वा उडवित यजमान संघाने गोवेकरांना आनंदाची पर्वणी दिली.
मागील मोसमात 20 सामन्यांत 18 गोलसह गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने पेनल्टीवर खाते उघडले. त्याने मोसमातील चौथा गोल नोंदविला.
उत्तरार्धात जॅकीचंद सिंग, एदू बेदिया यांनी सहा मिनिटांच्या अंतराने दोन गोलांची भर घातली. मग बदली खेळाडू मिग्युएल फर्नांडेझने दोन गोलांचा धडाका लावत मुंबईला जमिनदोस्त केले.
आठ मिनिटे बाकी असताना गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी कोरो याच्याऐवजी मिग्युएल याला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविले होते. कोरो मैदानाबाहेर गेल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असे मानणाऱ्या मुंबईला त्याने जेरीस आणले.
गोव्याचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे. त्यांनी सात गुणांसह आघाडी घेतली. बेंगळुरू एफसीचे सुद्धा सात गुण आहेत. बेंगळुरूचा गोलफरक 4 (6-2), तर गोव्याचा 7 (10-3) असा सरस आहे.
मुंबईसाठी सुरवात धक्कादायक झाली. कोरोला बॉक्समध्ये चेंडू मिळाला. त्यावेळी तो गोलसाठी प्रयत्न करणार तोच सौविक चक्रवर्तीने त्याला पाडले. पंचांना हे व्यवस्थित दिसले. त्यामुळे सौविकला यलो कार्ड देतानाच त्यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. कोरोने थेट ताकदवान फटका मारत मुंबईचा गोलरक्षक अमररिंद सिंग याला चकविले.
दुसऱ्या सत्रात एकूण 55व्या मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसने उजवीकडून जॅकीचंदला पास दिला. त्यावेळी सौविकला जॅकीचंदची नाकेबंदी करता आली नाही. याचा फायदा घेत जॅकीचंदने गोल नोंदविला. 61व्या मिनिटाला कोरोच्या पासवर बेदियाने लक्ष्य साधले. सहा मिनिटे बाकी असताना मानवीर सिंगने चेंडूवर ताबा मिळवित मिग्युएल याला पास दिला. मग मिग्युएलने अमरिंदरला कोणतीही संधी दिली नाही. अखेरच्या मिनिटाला मिग्युएलने अहमद जाहौहची चाल सत्कारणी लावली.
गोव्याने घरच्या मैदानावर नेहमीच्या जोशात आक्रमक सुरवात केली. दुसऱ्याच मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसने उजवीकडून आगेकूच केली, पण मुंबईच्या मिलान सिंगने त्याला रोखले. चौथ्या मिनिटाला मुंबईने प्रयत्न केला. पाऊलो मॅचादो याने उजवीकडून फ्री किक घेतली. हा चेंडू पलीकडील बाजूला शुभाशिष बोस याच्यापाशी पडला. त्याने प्रयत्न केला, पण तो अचूक फटका मारू शकला नाही.
14व्या मिनिटाला मुंबईला आणखी एक फ्री किक मिळाली. 30 यार्ड अंतरावरून मॅचादो याने मारलेला फटका गोव्याच्या खेळाडूंनी ब्लॉक केला. पुढच्याच मिनिटाला अरनॉल्ड इसोको याने दिलेल्या पासवर ल्युचीयन गोऐन याने हेडिंग केल्यानंतर चेंडू नेटवरून गेला.
गोव्याला 21व्या मिनिटाला सुमारे 25 यार्डावरून फ्री किक मिळाली. एदू बेदियाने बॉक्सच्या दिशेने चेंडू मारला, पण तो मुंबईच्या खेळाडूंच्या भिंतीला लागला. दुसऱ्या प्रयत्नांत संधी साधण्याचा गोव्याचा प्रयत्न मुंबईने फोल ठरविला. 22व्या मिनिटाला ह्युगो बौमौस याने उजवीकडून पास दिल्यानंतर सेरीटॉनने स्वैर फटका मारला. 24व्या मिनिटाला मुंबईला संधी होती. शुभाशिषने रफाएल बॅस्तोसला पास दिला, पण बॅस्तोसने डाव्या पायाने मारलेला फटका स्वैर होता.
25व्या मिनिटाला जॅकीचंद सिंगला उजवीकडून ह्युगोने पास दिला. जॅकीचंदने उजव्या पायाने फटका मारला, पण अमरिंदरने तो चपळाईने अडविला.
दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला ह्युगोने अहमद जाहौह याच्या साथीत चाल रचली, पण मुंबईच्या बचाव फळीने चेंडू रोखला. ह्युगोचा दुसरा प्रयत्न थेट अमरिंदरकडे चेंडू गेल्यामुळे अपयशी ठरला. 51व्या मिनिटाला गोव्याच्या लेनी रॉड्रीग्ज याच्या ढीलाईमुळे बॅस्तोसला संधी मिळाली होती, पण मैदानावर घसरत प्रयत्न करूनही तो चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही.
64व्या मिनिटाला मुंबईने सुवर्णसंधी दवडली. अरनॉल्डने डावीकडे मॅचादोला पास दिला. मॅचादोने गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकविण्याच्या प्रयत्नात अकारण वेळ दवडला आणि अखेरीस त्याचा फटका बाहेर गेला.
महत्त्वाच्या बातम्या:
–७२ तासातच विराट कोहलीने मो़डला रोहित शर्माचा विक्रम
–जेव्हा बॉल बॉय घेतो विराटचा अप्रतिम झेल