एफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये मोहिमेला सुरवात चांगली केली आहे. आज (24 ऑक्टोबर) फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर मुंबईविरुद्ध फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल.
दोन सामन्यांतून चार गुण मिळविलेला गोवा सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. पहिल्या सामन्यात गोव्याला नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागल्याने निराशा झाली. त्यानंतर मात्र त्यांनी चेन्नईयीन एफसीविरुद्ध 3-1 असा जबरदस्त विजय मिळविला.
धडाकेबाज प्लेमेकर मॅन्यूएल लँझरॉत अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) संघाकडे गेला तरी त्याच्या गैरहजेरीत गोव्याच्या आक्रमणावर परिणाम झालेला नाही. दोन सामन्यांतून पाच गोल करीत गोव्याने आक्रमणातील भेदकता दाखवून दिली आहे.
गेल्या मोसमात गोल्डन बूट पटकावलेल्या फेरॅन कोरोमीनास याचा धडाका कायम आहे. त्याच्या खात्यात आताच दोन सामन्यांत तीन गोल जमा आहेत.
लॉबेरा यांनी सांगितले की, “आम्ही नेहमीच आक्रमक शैलीचा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करतो आणि सामना जिंकण्याची कल्पना असते. हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिस्पर्ध्याचे गोल होऊ नयेत म्हणून आक्रमण कमी करणार का असा प्रश्न तुम्ही विचारणार असाल तर उत्तर नाही असेच असेल. आमची कल्पना सोपी आहे. मागील वर्षाप्रमाणेच आक्रमक खेळ करायचा आमचा प्रयत्न आहे.”
बचाव फळीत मौर्ताडा फॉल याच्या रुपाने अप्रतिम भर पडली आहे. सेनेगलच्या या खेळाडूकडे बचाव फळीकडून चेंडू आणण्याची क्षमता आहे. चिंगलेनसाना सिंग याने बचावात्मक क्षमता उंचावली आहे.
दुसरीकडे मुंबई मागील सामन्यातील विजयाच्या बळावर येथे दाखल झाले आहेत. मोसमातील पहिल्या महाराष्ट्र डर्बीत त्यांनी एफसी पुणे सिटीवर 2-0 असा प्रभावी विजय मिळविला.
जोर्गे कोस्टा यांच्या संघाची सुरवात अडखळती झाली. घरच्या मैदानावर त्यांना जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले, तर त्यानंतर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
कोस्टा म्हणाले की,” गोव्याचा संघ फार चांगला आहे. त्यांचे प्रशिक्षकही फार चांगले आहेत. मैदानावर त्यांना काय करायचे आहे हे समजणे सोपे आहे. मी वैयक्तिक खेळाडूंबद्दल बोलणार नाही, पण आमच्यासाठी हा सामना नक्कीच अवघड असेल. आम्हाला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो, पण कसा खेळ करायचा हे आम्हाला माहित आहे.”
पुण्याविरुद्ध सेनेगलचा स्ट्रायकर मोडोऊ सौगौ याने खाते उघडल्यामुळे कोस्टा यांना आनंद झाला असेल. ब्राझीलच्या रफाएल बॅस्तोस याला अडखळत्या सुरवातीनंतर थोडा फॉर्म गवसल्यामुळे सुद्धा ते आनंदात असतील.
बॅस्तोसला झगडावे लागल्यामुळे सुरवातीला मुंबईच्या आक्रमणात भेदकता नव्हती, पण पुण्याविरुद्ध पेनल्टीवर गोल केल्यामुळे त्याला फॉर्म गवसला. अरनॉल्ड इसोको या काँगोच्या खेळाडूला करारबद्ध करणे सुद्धा प्रेरणादायी ठरले आहे. महाराष्ट्र डर्बीत तो सामनावीर ठरला. त्याद्वारे त्याने आपली क्षमता दाखवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट
–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट