कोलकाताः केरळा ब्लास्टर्सने कट्टर प्रतिस्पर्धी आणि दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेला 2-0 असा धक्का देत हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमात शानदार विजयी सलामी दिली.
येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ब्लास्टर्सकडून दहा नंबरची जर्सी घालणारा स्लोव्हेनियाचा मॅटेज पॉप्लॅट्निक आणि सर्बियाचा स्लाविसा स्टोजानोविच यांनी गोल केले.
डेव्हिड जेम्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्लास्टर्सने दोन्ही गोल उत्तरार्धात नोंदविले, पण त्याआधी पूर्वार्धात चालींचा धडाका रचत त्यांनी मानसिक लढाई जिंकली होती. ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंह याने आयएसएल पदार्पणात क्लीन-शीट राखत विजयात मोलाचे योगदान दिले.
77व्या मिनिटाला स्टोजानोविचने चपळाईने हालचाली करीत डाव्या पायाने फटका मारला. त्यावेळी एटीकेच्या गेर्सन व्हिएराने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण दक्ष पॉप्लॅट््निकने प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकविच अफलातून हेडिंग केले. मग चार मिनिटे बाकी असतान स्टोजानोविचने गोल नोंदविण्याचा पराक्रम केला.
हालीचरण नर्झारी याने ही चाल रचली. स्टोजानोविचने चेंडूवर व्यवस्थित ताबा मिळवित नेटच्या उजव्या कोपऱ्यात फटका मारला. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
पूर्वार्धात ब्लास्टर्सने पहिली संधी निर्माण केली. चौथ्या मिनिटाला लालरुथ्थाराने डाव्या बाजूने डाव्या पायाने मॅटेज पॉप्लॅट्निकच्या दिशेने चेंडू मारला, पण मॅटेजचा हेडिंगचा प्रयत्न चुकला.
सहाव्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या साहल अब्दुल समदने मॅटेजच्या दिशेने चेंडू मारला. मॅटेजचा फटका एटीकेच्या जॉन जॉन्सन याने ब्लॉक केला, पण अचूकतेअभावी चेंडू ब्लास्टर्सच्या हालीचरण नर्झारीकडे गेला. त्याने चेंडू मारला, पण एटीकेच्या मॅन्युएल लँझरॉतला फाऊल करण्यात आले.
नवव्या मिनिटाला लालरुथ्थाराने डावीकडून घोडदौड करीत मॅटेजला पास दिला, पण जॉन्सनने एटीकेचे क्षेत्र सुरक्षित राखले. 12व्या मिनिटाला सेट-प्लेवर मॅटेजने नेमांजा लॅकीच-पेसिचला पास दिला. नेमांजाने सुंदर किक मारत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला चकविले, पण दक्ष सेना राल्टेने चेंडू हेडींगकरवी बाजूला घालविला.
16व्या मिनिटाला एटीकेच्या बलवंत सिंगचा प्रयत्न ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंगने अपयशी ठरविला. 19व्या मिनिटाला लालरुथ्थाराने निर्माण केलेल्या संधीचा सैमीनलेन डुंगलला फायदा उठविता आला नाही. 20व्या मिनिटाला यंदाच्या मोसमातील पहिले यलो कार्ड एटीकेच्या अल मैमौनी नौसैरला दाखविण्यात आले. त्याने मॅटेजला पाठीमागून ओढले.
एटीकेला पहिला प्रयत्न नोंदविण्यासाठी 26व्या मिनिटापर्यंत प्रतिक्षा करावी लागली, पण एव्हर्टन सँटोसने घोडदौड करीत मारलेला क्रॉसबारवरून बाहेर गेला. 33व्या मिनिटाला समदचा जोरदार पटका भट्टाचार्यने अडविला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती.
निकाल
एटीके 0 पराभूत विरुद्ध केरळा ब्लास्टर्स 2
(मॅटेज पॉप्लॅट्निक 77, स्लाविसा स्टोजानोविच 86)