गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न सलग चार वर्षे केला आहे, पण त्यांना यश आलेले नाही. दोन वेळा ते या उद्दीष्टाच्या नजिक आले होते.
आता पाचव्या मोसमाला प्रारंभ करताना येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर हा संघ एफसी गोवाविरुद्ध सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानावर उतरेल. गेल्या मोसमात धडाकेबाज खेळ केलेल्या गोव्याला नॉर्थइस्टविरुद्ध दोन प्रयत्नांत एकही विजय मिळविता आला नाही. त्यामुळे नॉर्थइस्टला प्रथमच हरविण्याचा गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांचा प्रयत्न राहील.
मागील मोसमातील कामगिरी जमेची बाब असली तरी नॉर्थइस्ट युनायटेडसाठी हे आव्हान सोपे नसेल. एफसी गोवा संघातील सातत्य कायम आहे. याचे कारणलॉबेरा यांनी सलग दुसऱ्या मोसमासाठी प्रशिक्षकपदाची सुत्रे स्विकारली आहेत.
दुसरीकडे यजमान संघ एलेको शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. शात्तोरीयांच्याकडे मुख्य पद सोपविण्यात आले आहे. मागील मोसमात जोओ डी डेयूस यांनी निरोप घेतल्यानंतर नेदरलँड्सच्या शात्तोरी यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनपाचारण करण्यात आले होते.
नॉर्थइस्टचा चेहरामोहराच आता बदलून गेला आहे. पीएसजीचा माजी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे हा नव्या करारबद्ध खेळाडूंपैकी प्रमुख आहे. नायजेरियाचा हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आघाडी फळीत प्रतिस्पर्ध्यासाठी धोकादायक ठरण्याची अपेक्षा आहे.
गोलसमोरील परिणामकारक खेळ सुधारण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल. क्रोएशियाची मॅटो ग्रजिच आणि मिस्लाव कोमोर्स्की ही जोडी बचावाची मदार सांभाळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे रॉलीन बोर्जेस मध्य फळीचा आधारस्तंभ असेल.
शात्तोरी यांनी सांगितले की, गेल्या मोसमात आम्ही गोव्याविरुद्ध दोन वेळा खेळलो. यात एक विजय आणि एक बरोबरी अशी कामगिरी झाली. दोन्ही वेळा आम्हाला गोव्याच्या संघात काही त्रुटी आढळल्या होत्या. यावेळी सुद्धा असा फायदा उठविण्याची आम्हाला आशा आहे. असे असले तरी आमचा संघ तुलनेने नवा आहे हे आम्हाला लक्षात ठेवावे लागेल. माझ्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यास खेळाडूंना थोडा वेळ लागेल. दुसरीकडे गोवा संघ बराचसा स्थिरावलेला आहे.
गेल्या मोसमातील लढती नॉर्थइस्टसाठी उत्साहवर्धक ठरल्या. गुवाहाटीत त्यांनी 2-1 अशी बाजी मारली, तर गोव्यात परतीच्या लढतीत 2-2 अशी बरोबरी साधली.
गोव्याचे मागील मोसमातील बहुतेक प्रमुख खेळाडू कायम आहेत. गतमोसमात सर्वाधिक गोल केलेला फेरॅन कोरोमीनास आघाडी फळीत असेल. त्याला मिग्युएल पॅलान्का आणि ह्युगो बौमौस यांची साथ मिळण्याची अपेक्षा आहे. मध्य फळीत अहमद जाहौह मुख्य सुत्रधार असेल. मोरोक्कोच्या या खेळाडूला साथ देण्यास लेनी रॉड्रीग्ज आणि कंपनी आतूर असेल.
मागील मोसमात गोव्याची बचाव क्षेत्रातील कामगिरी चर्चेचा विषय ठरली होती. बचाव ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. भक्कम आक्रमणामुळे अनेक वेळा हा संघ तरला होता. यावेळी मात्र लॉबेरा बचाव भक्कम व्हावा म्हणून प्रयत्नशील राहतील. त्याचवेळी आक्रमणात तडजोड न करण्यावरही त्यांचे लक्ष राहील.
लॉबेरा यांनी सांगितले की, आम्ही यंदा आमच्या बचावावर नक्कीच मेहनत करू. बचाव सुधारण्यासाठी आम्हाला आक्रमणातील क्षमता किंचीत कमी करावी लागेल हे खरे आहे, पण मागील मोसमात अनेक विक्रम मोडलेला संघ आमच्याकडे आहे. आक्रमक खेळ करेल अशाच संघाची आम्ही बांधणी केली आहे. सामना 1-0 पेक्षा 5-2 अशा फरकाने जिंकण्यास माझी नेहमीच पसंती राहिली आहे.
गोवा त्यांच्या शैलीला साजेसा चेंडूवर ताबा राखण्याचा खेळ करेल. त्यामुळे प्रतिआक्रमणाद्वारे त्यांना धक्का देण्याचे नॉर्थइस्ट युनायटेडचे डावपेच राहतील, पण हा पवित्रा किती परिणामकारक ठरेल हे पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळची लढत उत्कंठावर्धक आणि रंगतदार ठरण्याची अपेक्षा आहे.