मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने आज ( २७ ऑक्टोबर) दिल्ली डायनॅमोज एफसीचा २-० असा पराभव केला. पहिल्या सत्रात मोडोऊ सौगौ, तर दुसऱ्या सत्रात अरनॉल्ड इसोको यांनी गोल केले. उत्तरार्धात रफाएल बॅस्तोस याने पेनल्टी दवडूनही मुंबईने विजय मिळविला. एफसी गोवा संघाविरुद्ध पाच गोलांनी गारद झालेल्या मुंबईने घरच्या मैदानावरील या विजयासह पाचवे स्थान गाठले.
या निकालामुळे गुणतक्त्यामधील चुरस कमालीची वाढली. दोन ते पाच अशा क्रमांकांवरील तब्बल चार संघांचे प्रत्येकी सात गुण झाले आहेत. मुंबईचा हा पाच सामन्यांतील दुसरा विजय असून एक बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण झाले. मुंबईने गुणतक्त्यात दोन क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले.
नॉर्थइस्ट युनायटेड एफसी सर्वाधिक आठ गुणांसह आघाडीवर आहे. एफसी गोवा (गोलफरक ७), बेंगळूरू एफसी (गोलफरक ४) व एटीके (गोलफरक उणे १) यांचे प्रत्येकी सात गुण आहेत. सरस गोलफरकानुसार हे संघ अनुक्रमे दोन ते चार या क्रमांकांवर आहेत. मुंबईचा गोलफरक उणे तीन आहे.
या निकालामुळे दिल्लीची पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. पाच सामन्यांत त्यांना दुसरा पराभव पत्करावा लागला. तीन बरोबरीसह तीन गुण मिळवून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
अर्ध्या तासाच्या ठोक्याला मुंबईने खाते उघडले. अरनॉल्ड इसोको याने चेंडू मिळताच मैदानालगत फटका मारला. दिल्लीच्या मार्टी क्रेस्पीला वेळीच हालचाल करता आली नाही. याशिवाय राणा घरामी हा सुद्धा मार्किंग करू शकला नाही. याचा फायदा घेत सौगौ याने मैदानावर घसरत दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याला चकविले.
दुसऱ्या सत्रात ७७व्या मिनिटाला अरनॉल्डने बॅस्तोस याची प्रतिआक्रमणावरील चाल यशस्वी ठरविली. मार्टी क्रेस्पी याला दाद लागू न देता अरनॉल्डने आगेकूच केली. पुढे सरसावलेल्या फ्रान्सिस्कोचा अंदाज चुकवित त्याने चेंडू मोकळ्या नेटमध्ये मारला.
दुसऱ्या सत्रात ५०व्या मिनिटाला दिल्लीच्या घरामीने मुंबईच्या इसोको याला बॉक्समध्ये रोखत पाडले. त्यामुळे राणाला यलो कार्ड दाखवित पंच सी. रामास्वामी श्रीकृष्ण यांनी मुंबईला पेनल्टी बहाल केली. त्यांचा हा निर्णय कठोर असल्याची प्रतिक्रिया उमटली. दिल्लीच्या सुदैवाने ब्राझीलच्या रफाएल बॅस्तोस याने ढिसाळ फटका मारत चेंडू बाहेर घालविला. त्यावेळी डोरोन्सोरोचा अंदाज चुकला होता, पण चेंडूच बाहेर गेल्यामुळे मुंबईची दुसऱ्या गोलची सुवर्णसंधी हुकली.
दिल्लीने चौथ्या मिनिटाला पहिला प्रयत्न केला. लालियनझुला छांगटे याने डावीकडून नेटच्या दिशेने क्रॉस शॉट मारला. मुंबईच्या ल्युचियन गोऐन याने हेडिंगने चेंडू बाहेर घालविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॉक्समध्ये रोमिए फर्नांडीसपाशी गेला. रोमिओने फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारवरून गेला. १२व्या मिनिटाला अँड्रीया क्लाऊडेरोविच याने आणखी एक प्रयत्न केला. डावीकडून घोडदौड करीत त्याने मारलेला चांगला फटका मुंबईचा गोलरक्षक रवी कुमार याने अडविला.
मुंबईच्या अरनॉल्ड इसोको याने १७व्या मिनिटाला उजवीकडून आगेकूच केली, पण पुरेशी जागा असूनही त्याने टायमिंग साधले नाही. त्यामुळे तो ऑफसाईडच्या सापळ्यात अडकला. २०व्या मिनिटला रोमिओने उजवीकडून प्रयत्न केला, पण रवीने उडी घेत चेंडूवर ताबा मिळविला. सहा मिनिटांनी रोमिओने डावीकडून मारलेला चेंडू ल्युचीयन याने ब्लॉक केला. रिबाऊंडवर रोमिओला पुन्हा संधी मिळाली. त्याने छांगटेला क्रॉस पास दिला, पण छांगटेचा फटका स्वैर होता.
दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या छांगटे याचा अँड्रीया क्लाऊडेरोविच याला पास देण्याचा प्रयत्न मुंबईच्या शुभाशिष बोस याने हाणून पाडला. ५८व्या मिनिटाला बॅस्तोस याची चाल राणाने फोल ठरविली. पुढच्याच मिनिटाला क्लाऊडेरोविच याने डावीकडून मारलेल्या चेंडूवर रवी कुमार चकला, पण त्याच्या सुदैवाने चेंडू क्रॉसबारला लागून बाहेर गेला.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो
–Video: खेळाडू परतले, पंच मात्र निर्णय देण्यासाठी भरपावसात मैदानातच
–या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान