मुंबई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने आज (6 डिसेंबर) गतविजेत्या चेन्नईयीन एफसी वर 2-0 अशी मात केली. याबरोबरच मुंबईने सलग सहा सामन्यांत अपराजित मालिका राखत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. या निकालामुळे चेन्नईयीनच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
मुंबई सिटीने दोन क्रमांक झेप घेत चार वरून दुसरे स्थान गाठले. मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या सहा सामन्यांत पाच विजय आणि एक बरोबरी अशी त्यांनी कामगिरी केली आहे. जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाची कामगिरी आतापर्यंत सर्वोत्तम ठरली आहे.
मुंबईने दोन्ही सत्रांत प्रत्येकी एक गोल केला. पुर्वार्धात रेनीयर फर्नांडिसने खात उघडले, तर उत्तरार्धात मोडोऊ सौगौ याने भर घातली. चेन्नईयीनच्या काही चाली फोल ठरवित मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने विजयात मोलाचा वाटा उचलला.
मुंबईने दहा सामन्यांत सहावा विजय मिळविला असून दोन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. मुंबईने एफसी गोवा (9 सामन्यांतून 17) आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (10 सामन्यांतून 19) यांना मागे टाकले.
बेंगळुरू एफसी 9 सामन्यांतून सर्वाधिक 23 गुणांसह आघाडीवर आहे. चेन्नईयीनला 11 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह पाच गुण होऊन त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
चौथ्या क्रमांकावरील गोव्याचे 17 गुण चेन्नईयीनपेक्षा दुप्पटीने जास्त आहेत. याशिवाय पाचव्या क्रमांकावरील जमशेदपूरचेही 16, सहाव्या क्रमांकावरील तर एटीकेचे 15 गुण आहेत. अशावेळी चेन्नईयीनच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
खाते उघडण्याची शर्यत अपेक्षेप्रमाणे मुंबईने जिंकली. 27व्या मिनिटाला रफाएल बॅस्तोस याने उडवीकडून वेगवान मुसंडी मारली. त्याने रेनीयर फर्नांडिस याला पास दिला. रेनीयर याने तेव्हा धावत योग्य समन्वय साधला होता. चेंडूचा वेग काहीसा कमी झाल्यानंतर त्याने मैदानावर तो योग्य स्थळी जाऊ दिला आणि मग चेन्नईयीनचा गोलरक्षक संजीबन घोष याच्या उजव्या बाजूला शानदार फटका मारला. संजीबनला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही.
दुसऱ्या सत्रात बॅस्तोस यानेच 55व्या मिनिटाला रचलेली चार फिनिशींगमुळे यशस्वी ठरली. त्याने मध्य क्षेत्रातून मुसंडी मारली. चेन्नईयीनच्या बचाव क्षेत्रापर्यंत तो धडकला. त्याने मारलेला फटका एली साबीया याच्या पायाला लागल्यामुळे ब्लॉक झाला, पण हा चेंडू थेट मोडोऊ याच्या डोक्याच्या दिशेने गेला. मोडोऊ याने मग उरलेले काम चोखपणे पार पाडले. संजीबनला त्याने कोणतीही संधी दिली नाही.
मुंबईने सुरवात सकारात्मक केली. पाचव्या मिनिटास त्यांना कॉर्नर मिळाला. पाऊलो मॅचादो याने अरनॉल्ड इसोको याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण साबिया याने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही. दहाव्या मिनिटाला मोडोऊ याने डावीकडे बॅस्तोसला पास दिला. बॉक्समधून बॅस्तोसने संधी असूनही थेट संजीबनकडे फटका मारला. 16व्या मिनिटाला मुंबईचा आणखी एक प्रयत्न झाला. अरनॉल्ड इसोको याने थेट प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: शेवटच्या सत्रात गोल करत न्यूझीलंडने स्पेनला रोखले बरोबरीत
–धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण
–चेतेश्वर पुजारा-राहुल द्रविड बाबतीत घडला बाप योगायोग!