दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यातील लढतीपूर्वी शब्दयुद्ध पेटले. दिल्लीचा संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. हेच आपल्याकडे सुत्रे असली असती तर पहिल्या तीनमध्ये क्रमांक नक्की मिळवून दिला असता असा दावा नॉर्थइस्टचे प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांनी केला. आज (३० ऑक्टोबर) येथील नेहरू स्टेडियमवर हे दोन संघ आमनेसामने येत आहेत.
दिल्लीचे पाच सामन्यांतून तीन गुण आहेत. दिल्लीला अद्याप एकाही सामन्यात निर्णायक विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे शात्तोरी यांना दिल्लीच्या कामगिरीविषयी शेरेबाजी करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही.
शात्तोरी म्हणाले की, “हा सामना फार अवघड असेल. दिल्लीचा संघ गुणतक्त्यात इतक्या खाली असल्याचे मला आश्चर्य वाटते. माझ्याकडे हा संघ असला असता तर आम्ही पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असलो असतो असे म्हणण्याचे धाडस मी करेन. हे विधान उद्धटपणाचे ठरते याची मला कल्पना आहे.”
शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थइस्टने चार सामन्यांतून आठ गुण मिळविले आहेत. दोन विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह एफसी गोवानंतर त्यांचे दुसरे स्थान आहे. शात्तोरी यांचे वक्तव्य दिल्लीचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना पसंत पडले नाही. त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, नॉर्थइस्टच्या प्रशिक्षकांनी माझ्या नव्हे तर त्यांच्या संघावर लक्ष केंद्रित करावे. त्यांनी असे शेरे मारण्याची गरज नाही.
नॉर्थइस्टने मोसमात दुसऱ्या क्रमांकाची सुरवात करण्यामध्ये स्ट्रार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे आणि आक्रमक मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगो यांच्यातील समन्वय बहुमोल ठरला आहे. ओगबेचेने पाच गोल नोंदविले आहेत, तर गॅलेगोने सर्वाधिक तीन अॅसिस्ट केले आहेत. या जोडीचे भेदक आक्रमण परतावून लावण्याचे फार मोठे आव्हान दिल्लीच्या बचाव फळीसमोर असेल.
रॉलीन बोर्जेस आणि ज्योस लेऊडो ही जोडी मध्य फळीत फार प्रभावी ठरली आहे. केंद्रीय बचावपटू मिस्लाव कोमोर्स्की याची उणीव त्यांच्यासाठी चिंतेची बाब असेल. त्याला जमशेदपूर एफसीविरुद्ध लाल कार्डला सामोरे जावे लागले. दिल्लीची आक्रमण फळी झगडत आहे. कोमोर्स्कीच्या गैरहजेरीचा फायदा उठविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, पण त्यासाठी त्यांना आक्रमणाची धार वाढवावी लागेल.
गोम्बाऊ यांनी सांगितले की, मुंबईत आम्ही २० शॉट मारले, पण केवळ सहा गोलच्या दिशेने होते. आम्ही १९ क्रॉस पासेस, ४०० हून जास्त पासेस, ५५५ टचेस, ५८ टक्के चेंडूवर ताबा अशी आकडेवारी साध्य केली. सारे काही होत आहे, पण गोल करणे सर्वांत महत्त्वाचे असते. आमच्याकडे आत्मविश्वासाची उणीव आहे, कारण आम्ही अनेक संधी निर्माण केल्या, पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करू शकलो नाही. त्यामुळे संघावर परिणाम झाला. उद्या आम्ही भक्कम खेळ करू अशी आशा आहे.
नेदरलँड्सच्या शात्तोरी यांचा दावा फोल ठरविण्यासाठी त्यांच्या नॉर्थइस्ट संघाला हरवून दाखविण्याचा गोम्बाऊ यांचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: जमशेदपूरविरुद्ध ब्लास्टर्सने मिळवला एक गुण
–कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा