दिल्ली। दिल्ली डायनॅमोज आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात आज (२३ ऑक्टोबर) येथील नेहरू स्टेडियमवर हिरो इंडियन सुपर लीगचा सामना होत आहे. चांगल्या कामगिरीतील अडथळे दूर करून पहिला विजय मिळविण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानावर उतणार आहे.
यजमान दिल्लीने केरळा ब्लास्टर्सविरुद्ध अंतिम टप्यात गोल करून एक गुण कमावला. अँड्रीया क्लाऊडेरोविच याच्यामुळे त्यांना थोडीफार कमाई करता आली. सलामीच्या सामन्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध सुद्धा त्यांना अखेरच्या क्षणी गोल पत्करावा लागला होता. प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांच्यामते आतापर्यंत दोन गुणांपेक्षा जास्त कमाई व्हायला हवी होती.
“आमचा संघ नवा आहे. आम्ही नव्या शैलीचा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही अशी गोष्ट आहे की जी एका दिवसात घडू शकत नाही. आम्ही दोनपेक्षा जास्त गुणांच्या योग्यतेचे आहोत, कारण तिन्ही सामन्यांत आम्हाला जिंकण्याची संधी होती”, असे गोम्बाऊ म्हणाले.
लालियनझुला छांगटे आणि रोमिओ फर्नांडीस यांनी आपल्या दर्जाची झलक सादर केली असली तरी नेटसमोरील समन्वयाचा अभाव चिंताजनक आहे. असंख्य संधी निर्माण करूनही केवळ तीन गोल खात्यात जमा असणे हीच दिल्लीची खरी समस्या आहे.
गोम्बाऊ म्हणाले की, “आम्ही चांगला फुटबॉल खेळतो आहोत हे महत्त्वाचे आहे. आम्ही संधी निर्माण करीत आहोत. त्याचे गोलमध्ये रुपांतर होईल तेव्हा आम्ही जिंकू. आम्ही जिंकू अशी माझी आशा आहे.”
दिल्लीला प्रभावी मध्यरक्षक मार्कोस टेबार याच्याशिवाय खेळावे लागेल. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे.
यंदा मार्चमध्ये विजेतेपद जिंकलेल्या संघाच्या तुलनेत नव्या मोसमात चेन्नईयीनचा संघ अगदीच सामान्य भासत आहेत. धनपाल गणेश जायबंदी आहे. त्याच्या गैरहजेरीत अनिरुध थापा व जर्मनप्रीत सिंग यांच्यासह एकाही मध्यरक्षकाला स्थिती नियंत्रणात ठेवता आलेली नाही.
चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, “आम्ही आतापर्यंत चांगली सुरवात का करू शकलेलो नाही याची कारणे तुम्हाला सहज मिळू शकतील, पण खेळाडूंनी तिन्ही सामन्यांत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आमच्या दृष्टिकोनाविषयी मला कसलीच समस्या वाटत नाही. आम्हाला बचावातील चुकांचा फटका बसला इतकेच झाले. या चुका मोठ्या होत्या, ज्या मागील मोसमात 18 सामन्यांत आम्ही क्वचितच केल्या.”
चेन्नईयीन हा आतापर्यंत तिन्ही सामने हरलेला एकमेव संघ आहे. लवकरच ठसा उमटविण्यासाठी संघाला प्रेरीत करणे ग्रेगरी यांच्यासाठी गरजेचे आहे, अन्यथा हा संघ प्रारंभीच शर्यतीत पिछाडीवर पडेल. पहिल्या तीन लढतींप्रमाणेच दिल्लीविरुद्ध खेळणेही सोपे नसेल.
इंग्लंडचे ग्रेगरी म्हणाले की, “दिल्लीविरुद्ध खडतर लढत असल्याची आम्हाला कल्पना आहे. रेने मिहेलीच आणि बिक्रमजीत सिंग असे आमचे गेल्या मोसमातील काही खेळाडू त्यांच्याकडे आहेत. या दोघांनी गेल्या वर्षी आमच्याकडून सुवर्णपदक जिंकले होते. आम्ही खडतर लढतीची अपेक्षा ठेवली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: बेंगळुरूचा पुण्यावर दणदणीत विजय
–दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक