गोवा । हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात एफसी गोवा संघाने सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक आणि आक्रमक खेळ केला. यामुळे गोवेकर फुटबॉलप्रेमींचे या खेळावरील प्रेम पुन्हा जागृत झाले. 2015च्या मोसमातील अंतिम सामन्याच्या कटु आठवणी आणि 2016 मधील निराशाजनक कामगिरी त्यांच्या विस्मरणात गेली आहे.
एफसी गोवा अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला आणि सर्वोच्च प्रतिष्ठेच्या करंडकासाठी बेंगळुरू एफसीविरुद्ध खेळण्याचा अधिकार त्यांनी गमावला, पण त्यांनी गोवेकर फुटबॉलप्रेमींची मने नक्कीच जिंकली. गोवा जिंकला असता तर बेंगळुरू विरुद्ध गोवा अशी स्वप्नवत फायनल रंगली असती. याचे कारण दोन्ही संघांना चेंडूवर ताबा ठेवणे आणि आक्रमण करणे आवडते. ते धडाकेबाज शैलीने खेळतात.
गोवेकरांच्या जीवनशैलीचा फुटबॉल हा अविभाज्य घटक आहे यात कोणतीच शंका नाही. 2014 मध्ये आयएसएलला प्रारंभ झाल्यापासून एफसी गोवा संघाला निष्ठावान प्रेक्षक लाभले आहेत याचे आश्चर्य वाटण्याचे म्हणूनच काहीच कारण नाही. गोव्याला या लीगमध्ये आतापर्यंत संमिश्र यश मिळाले आहे.
पहिल्या वर्षी त्यांनी उपांत्य फेरी गाठली, तर 2015 मध्ये ब्राझीलचे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू झिको यांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली त्यांचे जेतेपद अगदी थोडक्यात हुकले. स्टीव्हन मेंडोझामुळे प्रेरीत झालेल्या चेन्नईयीन एफसीने बाजी मारत गोवेकरांचे घरच्या मैदानावर अंतिम सामना जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले.
2016चा मोसम मात्र एफसी गोवा संघासाठी धक्कादायक ठरला. त्यात गोवा साखळीत तळाला फेकला गेला. त्यामुळे त्यांच्या निष्ठावान चाहत्यांची घोर निराशा झाली. त्यानंतर या खराब कामगिरीमुळे झिको यांनी गोव्याचा निरोप घेतला. ज्या झिको यांना गोव्यात आदराचे स्थान प्राप्त झाले त्यांना अशा प्रकारे जावे लागणे निराशाजनक ठरले.
2017-18चा मोसम गोव्यासाठी महत्त्वाचा होता आणि लॉबेरा यांनी गोवेकरांचे फुटबॉलवरील प्रेम पुन्हा निर्माण होण्यास चालना दिली. गोव्याला पहिले आयएसएल विजेतेपद मिळवून देण्यात ते अपयशी ठरले, पण चार वर्षांत तीन वेळा उपांत्य फेरी ही कामगिरी नक्कीच लहान नाही.
लॉबेरा यांनी सांगितले की, मी गोव्यात पहिल्यांदा आलो तेव्हा आक्रमक आणि भेदक शैलीचा खेळ करायचा असल्याचा संदेश सर्वप्रथम दिला. आम्ही केलेले गोल पाहता ही पद्धत चालत असल्याचे दिसून येते.
लॉबेरा यांच्या संघाने साखळीत 18 सामन्यांत सर्वाधिक 42 गोल केले. यात फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे या स्पेनच्या जोडीने 30 गोलची आश्चर्यकारक कामगिरी नोंदविली.
गोव्याने नेहमीच आक्रमक खेळ केला आहे. 2015च्या मोसमात झिको यांच्या मार्गदर्शनाखाली
गोव्याने साखळी टप्याच्या 14 सामन्यांत सर्वाधिक 29 गोल नोंदविले. 2014 मध्ये त्यांचे 21 गोल दुसऱ्या क्रमांकाचे होते. 2016 मध्ये तळात राहूनही त्यांचे आक्रमण पाचव्या क्रमांकाचे होते.
वास्तविक झिको यांनी एकदा म्हटले होते की आमची आक्रमक शैली गोव्याचे प्रतिनिधीत्व करते. यंदा लॉबेरा यांनी या शैलीला वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला. त्यामुळे फातोर्डा-मडगावमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम बहुतेक सामन्यांच्यावेळी खचाखच भरलेले होते.