भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील रनमशीन अशी ओळख असणाऱ्या वसीम जाफरने काल इराणी कप स्पर्धेत नाबाद शतकी खेळी केली. आज हीच शतकी खेळी पूढे नेत या अव्वल दर्जाच्या खेळाडूने आणखी एक खास विक्रम केला.
आज जेव्हा हा खेळाडू १७४ धावांवर पोहचला तेव्हा त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ हजार धावांचा टप्पा पार केला. जाफरने ही कामगिरी २४२ प्रथम श्रेणी सामन्यात केली असुन ३९७ डावात फलंदाजी करताना त्याने ५०.२८च्या सरासरीने १८००६ धावा केल्या आहेत. त्यात ५३ शतके आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३१४ ही जाफरची सर्वौच्च खेळी आहे.
जेव्हा त्याने १८ हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा तो अशी कामगिरी करणारा ६वा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापुर्वी सुनील गावसकर (२५८३४), सचिन तेंडूलकर (२५३९६), राहूल द्रविड (२३७९४), व्हीव्हीएस लक्ष्मण (१९७३०) आणि विजय हजारे (१८७४०) यांंनी अशी कामगिरी केली आहे.
इराणी ट्राॅफीचा थरार नागपूर येथील जामठावरील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर सुरू आहे. यात दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्र अखेरीस विदर्भाने १२६ षटकांत ४०७ धावा केल्या आहेत. त्यात जाफर नाबाद १७८ तर गणेश सतीश ८१ धावांवर खेळत आहेत.





