---Advertisement---

मुंबई-ओडिशा यांच्यात शैलीचाही सामना

On: गुरूवार, ऑक्टोबर 31, 2019 5:25 PM
---Advertisement---

मुंबई। सहाव्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर मोसमातील पहिली लढत होत आहे. त्यात मुंबई सिटी एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यात वेगवेगळ्या शैलीचाही सामना असेल.

मुंबईने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सलग दोन सामने खेळत मोसमाची सुरवात केली. केरला ब्लास्टर्स एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्याविरुद्ध ते खेळले. कोचीमध्ये तीन, तर चेन्नईत एक गुण अशी कामगिरी त्यांनी केली.

प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील लढतींमध्ये संमिश्र यश आल्यानंतर ओडिशाविरुद्ध मुंबईला जास्त संधी वाटत असेल. ओडिशाने अटीतटीचे दोन सामने गमावले असून मोसमातील पहिल्या विजयाची त्यांची प्रतिक्षा कायम आहे.

दोन्ही संघांचे प्रशिक्षक हे सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळे लढतही उत्कंठावर्धक ठरेल.

जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा संघ बचाव करीत दडपणाला सामोरा जातो. प्रतिआक्रमण रचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चेंडूवर ताबा ठेवणाऱ्या खेळावर कोस्टा फारसा भर देत नाहीत, तर ओडिशाचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ हे चेंडूवरील वर्चस्वासाठी आग्रही असतात.

पहिल्या दोन्ही सामन्यांत ओडिशाचा बचाव कमकुवत झाला. त्यांना चार गोल पत्करावे लागले. पहिल्या सामन्यात त्यांच्याविरुद्ध जमशेदपूर एफसीचा एक खेळाडू बहुतांश काळ कमी होता.

गोम्बाऊ यांनी सांगितले की, आम्हाला अपेक्षित निकाल मिळाला नाही. पहिल्या लढतीत पासिंगमध्ये काही चूका झाल्या असतील. दुसऱ्या सामन्यात मात्र आम्ही वर्चस्व राखले, पण छोट्या चुकांमुळे आम्हाला गोल पत्करावे लागले. संघ चांगला खेळ करतो आहे असे वाटते. आम्ही शून्य गुण मिळविण्याइतके खराब नाही. उद्या संघ चांगला खेळेल असा विश्वास वाटतो.

आतापर्यंत दोन्ही सामन्यांत ओडिशा एफसीने शेवटच्या दहा मिनिटांत निर्णायक गोल पत्करलेला आहे. गोम्बाऊ यांच्या संघाला याच संदर्भात सक्रीय राहावे लागेल. त्यातच कार्लोस डेल्गाडोची गैरहजेरी प्रतिकुल ठरेल. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले.

कोस्टा ओदीशा एफसीला कमी लेखण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की, गेल्या मोसमात दिल्ली डायनॅमोज नावाने हा संघ खुप चांगला खेळला. त्यांनी बऱ्याच संधी सुद्धा निर्माण केल्या. आम्हाला त्यांच्या क्षमतेविषयी आदर ठेवावाच लागेल. लढत सोपी नाही हे मला ठाऊक आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मी शंभर टक्के आनंदी नाही. आम्हाला अजूनही कसून सराव करावा लागेल. चांगले खेळावे लागेल. माझे खेळाडू रोज कसून सराव करतात. संघभावनेने खेळण्याचा आनंद त्यांना मिळतो.

मुंबईला बचावपटू मॅटो ग्रजिच याची गैरहजेरी जाणवू शकेल. त्यामुळे प्रशिक्षकांना सर्वस्वी भारतीय खेळाडूंची बचाव फळी खेळवावी लागेल. त्या फळीने चेन्नईयीन एफसीविरुद्ध एकही गोल पत्करला नव्हता. पाऊलो मॅचादो सुरवातीपासून खेळण्याइतपत तंदुरुस्त होण्याची त्यांना आशा असेल. स्ट्रायकर मोडोऊ सौगौ दुखापतीमधून सावरत असून त्याच्या सहभागाविषयी शंका आहे.

मुंबई सिटी घरच्या मैदानावरील मोहीम विजयाने सुरु करणार की ओडिशा एफसी मोसमातील गुणांचे खाते उघडणार ही उत्सुकता असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---