---Advertisement---

आयएसल: रॉबिनच्या गोलमुळे हैदराबादने बेंगळुरूला रोखले

On: रविवार, डिसेंबर 1, 2019 5:00 PM
---Advertisement---

हैदराबाद। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात गतविजेत्या बेंगळुरू एफसीला शुक्रवारी हैदराबाद एफसीविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलमुळे दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेऊनही, तसेच 34 मिनिटे प्रतिस्पर्ध्याचा एक खेळाडू कमी होऊनही बेंगळूरूचा विजय भरपाई वेळेेेत बदली खेेेळाडू रॉबिन सिंगच्या गोलमुळे हुकला. बेंगळुरूविरुद्ध यंदा प्रथमच मैदानी गोल झाला, जो एकूण दुसराच गोल आहे.

स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्याबेंगळुरूने सहा सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून दोन विजयासह त्यांचे 10 गुण झाले. एटीके आणि जमशेदपूर एफसी यांचेही प्रत्येकी दहा गुण आहेत. यात गोलफरकानुसार एटीके 7 (10-3) पहिल्या, बेंगळुरू 4 (6-2) दुसऱ्या, तर जमशेदपूर 2 (7-5) तिसऱ्या स्थानावर आहे. फिल ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादने सहा सामन्यांत प्रथमच बरोबरी साधली असून एक विजय आणि चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे चार गुण झाले. त्यांचे अखेरचे दहावे स्थान कायम राहिले.

जी. एम. सी. बालयोगी स्टेडियमवर बेंगळुरूने सनसनाटी सुरवात केली. स्थानिक प्रेक्षक स्थिरावण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी बेंगळुरूने खाते उघडले. कमलजीत सिंगच्या ढिलाईनंतरही चेंडू लालदान्माविया राल्टे याच्यापाशी गेला. त्याने सहकाऱ्याला पास देताना चूक केली. हा चेंडू आपल्या मार्गात येताच छेत्रीने चपळाईच्या जोडीला कौशल्य प्रदर्शित केले. त्याने कमलजीतला थेट आव्हान देत चकविले.

हैदराबादचा एक खेळाडू 56व्या मिनिटाला कमी झाला. उदांता सिंगला रोखण्याच्या प्रयत्नात साहील पन्वरने त्याला कीक मारली. त्यामुळे पंच एल. अजित मेतेई यांनी पन्वरला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.

त्यानंतर उर्वरीत 34 मिनिटांच्या खेळात बेंगळुरूला आघाडी वाढविण्यापासून रोखण्यात हैदराबादने यश मिळविले. मग भरपाई वेळेत यजमान संघाने एक गुण खेचून आणला. चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला मार्केो स्टॅन्कोविच याने उजवीकडे आशिष रायला लांब पास दिला. रायचा प्रयत्न बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू थोपविल, पण तोच रॉबिनने रिबाऊंडवर चपळाईने लक्ष्य साधले.

खाते उघडल्यानंतर चार मिनिटांनी बेंगळुरूने आणखी एक चाल रचली. निशू कुमारला उजवीकडे पास मिळताच त्याने आशिक कुरुनीयानकडे चेंडू सोपविला. त्यातून रॅफेल आगुस्टोला डावीकडे पास मिळाला. त्याने उजव्या पायाने मारलेला फटका मात्र नेटच्या बाहेरील बाजूला लागला.

आठव्या मिनिटाला आगुस्टोने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्याकडून उजवीकडे पास मिळताच उदांता सिंगने घोडदौड केली, पण हैदराबादचा बचावपटू साहील पन्वरने त्याचा फटका अडविला.

तेराव्या मिनिटाला हरमनज्योत खाब्राने उजवीकडून मुसंडी मारली. त्याने नेटच्या दिशेने मारलेला फटका पन्वरने हाताने अडविला. त्यानंतरही पंच एल. अजित मेतेई यांनी पेनल्टी नाकारली. परिणामी बेंगळुरूच्या खेळाडूंना धक्का बसला. त्यांना केवळ कॉर्नर मिळाला, ज्यावर काही घडू शकले नाही.

दुसऱ्या सत्रात हैदराबादने काही चाली रचल्या. 64व्या मिनिटाला बचावपटू महंमद यासीरच्या फटक्यात ताकद नव्हती.72व्या मिनिटाला निखील पुजारीने पेनल्टी क्षेत्रात अल्बर्ट सेरॅनला अप्रतिम पास दिला. त्यातून यासीरला संधी मिळाली. त्याने आशिष रायला पास दिला, पण रायचा फटका नेटवरून बाहेर गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---