---Advertisement---

आयएसएल २०२०: हैदराबाद विरुद्ध बंगळुरू येणार आमने सामने

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 4:04 PM
---Advertisement---

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी (२९ नोव्हेंबर) हैदराबाद एफसी विरुद्ध बंगळुरू एफसी संघात लढत होत आहे.

हैदराबादचा आतापर्यंत एकच सामना झाला आहे, पण तो जिंकून त्यांनी गतमोसमातील अपयशी कामगिरीवर मात करण्याच्या दिशेने भक्कम सुरुवात केली. गेल्या मोसमात ते दोनच सामने जिंकू शकले होते. याशिवाय क्लीन शीट राखणे ही सुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाब ठरली आहे.

हैदराबादने पहिल्या सामन्यात ओडिशावर 1-0 अशी मात केली. आता फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर बंगळुरू एफसीविरुद्ध खेळात सुधारणा करावी लागेल, याची प्रशिक्षक मॅन्युएल मार्केझ यांना जाणीव आहे.

मार्केझ म्हणाले की, विजयाने सुरुवात करणे महत्त्वाचे असते. बंगळुरूचा संघ चांगला आहे. जेतेपदाची आकांक्षा बाळगलेल्या संघाविरुद्ध आम्ही खेळू. त्यामुळे ही लढत अवघड असेल.

ओडिशाविरुद्ध लिस्टन कुलासो याने दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे मुळचा गोव्याचा हा खेळाडू स्टार्टिंग लाईन-अपमध्ये घेण्याचे संकेत मार्क्वेझ यांनी दिले. त्यांनी सांगितले की, आधीच्या सामन्यात जो खेळ केला तो पाहता लिस्टनला स्टार्ट मिळेल. तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

बंगळुरूला आधीच्या लढतीत एफसी गोवाविरुद्ध 2-2 अशी निराशाजनक बरोबरी पत्करावी लागली. अशावेळी दोन गोलांची आघाडी दवडलेला आपला संघ तातडीने प्रतिसाद देईल आणि खेळ उंचावेल अशी अपेक्षा प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांना असेल. ते म्हणाले की, हैदराबादविरुद्ध आमची वेगळी योजना असेल. या मोसमात सर्वच खेळाडू महत्त्वाचे आहेत याची मला खात्री आहे.

सहा दिवसांच्या कालावधीच्या पूर्वतयारीसाठी पुरेपूर वापर केल्याचेही कुआद्रात यांनी नमूद केले. हैदराबादच्या जोओ व्हिक्टर आणि ओडेई ओनैन्दीया या बचावपटूंसह गोलरक्षक सुब्रत पॉल यांच्यामुळे बंगळुरूसाठी गोल नोंदवणे अवघड ठरेल. पॉलने आयएसएलमध्ये तब्बल 27 क्लीन शीट राखल्या आहेत. हैदराबादविरुद्ध बंगळुरूचे गोल नोंदविण्याचे रेकॉर्ड तेवढे चांगले नाही. दोन सामन्यांत त्यांना दोनच गोल करता आले आहेत.

कुआद्रात यांनी सांगितले की, ओडिशाविरुद्ध विजय मिळवितानाचा हैदराबादचा खेळ आम्ही पाहिला. त्यांच्या संघात अनेक सकारात्मक बाजू आहेत हे नाकारता येणार नाही. मला अवघड लढतीची अपेक्षा आहे. बरेच जिंकण्यासारखे आणि फार थोडे गमावण्यासारखे असलेल्या संघाविरुद्ध आम्ही खेळणार असू. त्यामुळे सामना उत्कंठावर्धक ठरेल.

माजी विजेत्यांसमोर खेळाडूंच्या दुखापतींचे कोणतेही प्रश्न नाहीत. हैदराबादला मात्र फ्रान्सिस्को सॅन्डाझा याच्याशिवाय खेळावे लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---