गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी पहिल्या सामन्यात एफसी गोवा संघाने बेंगळुरू एफसीवर 2-1 अशी मात केली. या विजयासह गोव्याने तिसरा क्रमांक गाठत बाद फेरीच्या दिशेने घोडदौड कायम ठेवली. सामन्यातील तिन्ही गोल पहिल्या सत्रात झाले.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. गोव्याने धडाकेबाज सुरुवात केली. तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत त्यांनी पकड घेतली. आघाडी फळीतील स्पेनचा 37 वर्षीय इगोर अँग्युलोने 20व्या मिनिटाला खाते उघडले, तर मध्य फळीतील मेघालयच्या 25 वर्षीय रेडीम ट्लांग याने 23व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. बेंगळुरूकडून मध्य फळीतील मणीपूरच्या 20 वर्षीय सुरेश वांगजाम याने 33व्या मिनिटाला खाते उघडले.
या विजयासह गोव्याने गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले. 19 सामन्यांतील हा त्यांचा सातवा विजय असून नऊ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांचे प्रत्येकी 27 गुण आहेत. या दोन्ही संघांचा एक सामना कमी झाला आहे. गोवा आणि हैदराबाद यांचा गोलफरक 8 असा समान असला तरी गोव्याचे गोल 31, तर हैदराबादचे 25 व नॉर्थईस्टचे 27 आहेत.
बेंगळुरूच्या आशा संपुष्टात आल्या. 19 सामन्यांत त्यांना सातवा पराभव पत्करावा लागला. पाच विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 22 गुण व सातवे स्थान कायम राहिले.
गोव्याने जोरदार प्रारंभ केला. 20व्या मिनिटाला बेंगळुरूचा मध्यरक्षक एरीक पार्टालू याला चकवून गोव्याचा मध्यरक्षक ग्लेन मार्टिन्स याने चेंडूवर ताबा मिळविला. अँग्युलोने मग अचूक टायमिंग साधत फटका मारला आणि बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकविले.
तीन मिनिटांनी गोव्याचा बचावपटू सेरीटॉन फर्नांडीस याने उजवीकडून चाल रचली. त्याने गोलक्षेत्रात क्रॉसशऑट मारला. त्यावेळी चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डोक्याला लागून मध्यरक्षक रोमारीओ जेसुराज याच्या दिशेने गेला. डावीकडे सहा यार्ड क्षेत्रात रोमारीओने रेडीमसाठी संधी निर्माण केली. रेडीमने ताकदवान फटक्यासह फिनिशींग केले.
बेंगळुरूने दहा मिनिटांत बरोबरी साधली. डावीकडून सुरेशने आगेकूच केली. त्याने सेरीटॉनला प्रतिकाराची संधीही दिली नाही. मग अचूक फटक्यावर त्याने चेंडू नेटमध्ये घालविला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : बदली खेळाडूंमुळे जमशेदपूरचा मुंबईला पराभवाचा धक्का
आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम
आयएसएल २०२०-२१ : मॅचादोच्या भरपाई वेळेतील पेनल्टी गोलने नॉर्थईस्टला तारले