गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एटीके मोहन बागानने ओडिशा एफसीला 1-0 असे हरवून सलग तिसरा विजय नोंदवला. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर फिजीचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णा याने भरपाई वेळेत केलेला गोल निर्णायक ठरला.
टिरीने रचलेल्या चालीवर झिंगनने हेडिंगद्वारे चेंडू कृष्णाच्या दिशेने मारला. कृष्णाने मग हेडिंगवरच ओदीशाचा गोलरक्षक कमलजीत सिंग याला चकविले.
अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीकेएमबीने सलग तिसऱ्या विजयासह सर्वाधिक नऊ गुण मिळवून आघाडी वाढवली. विशेष म्हणजे एटीकेएमबीविरुद्ध अद्याप एकही गोल झालेला नाही. यात गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला टिरी, संदेश झिंगन, प्रीतम कोटल, प्रबीर दास, शुभाशिष बोस यांनी दिलेली साथ बहुमोल ठरली.
मुंबई सिटी एफस 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि हैदराबाद एफसी यांचे प्रत्येकी पाच गुण आहेत. ओदीशाला तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीच्या एक गुणासह एक गुण आणि शेवटून दुसरे दहावे स्थान कायम राहिले.
पुढे 17व्या मिनिटाला ओदीशाला कॉर्नर मिळाला होता. दिएगो मॉरीसिओने मारलेला चेंडू डावीकडे नंदकुमारच्या दिशेने गेला, पण त्याला फिनिशिंग करता आले नाही. २३व्या मिनिटाला एटीकेएमबीला मिळालेली फ्री किक मध्यरक्षक कार्ल मॅक ह्यूजने घेतली, पण त्याने मारलेला चेंडू ओदीशाचा बचावपटू गौरव बोरा याने ब्लॉक केला.
त्यानंतर 24व्या मिनिटाला एटीकेएमबीकडून बचाव फळीतील टिरीने आगेकूच केली. त्याने कृष्णाच्या दिशेने चेंडू मारला. कृष्णाने ओडिशाचा बचावपटू स्टीव्हन टेलरला चकवित फटका मारला, पण चेंडू नेटवरून गेला.
पहिल्या सत्राच्या अंतिम टप्प्यात दोन्ही संघांची संधी थोडक्यात हुकली. 34व्या मिनिटाला ओडिशाला कॉर्नर मिळाला. मार्सेलिनियोने घेतलेल्या कॉर्नरवर जेकबने केलेले हेडिंग स्वैर होते.
त्याचसोबत 43व्या मिनिटाला ओडिशाला फ्री किक मिळाली. मार्सेलिनियोने चेंडू मारल्यानंतर बचाव फळीतील स्टीव्हन टेलरने हेडिंगवर चाल पुढे नेण्याचा प्रयत्न फसला. 45व्या मिनिटाला एटीकेएमबीची संधी हुकली. रॉय कृष्णाने उडी घेत हेडिंग केले, पण ते क्रॉसबारवरून गेले.
दुसऱ्या सत्रात 59व्या मिनिटाला ओडिशाच्या नंदकुमार शेखरने प्रयत्न केला, पण चेंडू थोडक्यात क्रॉसबारवरून गेला. 64व्या मिनिटाला रॉय कृष्णाच्या पासवर मध्य फळीतील जयेश राणेने फटका मारला, पण ओडिशाचा गोलरक्षक कमलजीत सिंग याने अचूक बचाव केला.
परंतु 65व्या मिनिटाला ओडिशाला मिळालेली फ्री किक वाया गेली. मार्सेलिनियोने मारलेला चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीवरच आदळला. अंतिम टप्प्यात 73व्या मिनिटाला नंदकुमारने डावीकडून आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासनंतर बचाव फळीतील तरुण खेळाडू शुभम सारंगी चेंडूवर नियंत्रण मिळवू शकला नाही.
त्यानंतर 81व्या मिनिटाला एटीकेएमबीला मिळालेली फ्री किक मध्य फळीतील जेव्हियर हर्नांडेझ याने घेतली, पण त्याने मारलेला चेंडू ओडिशाच्या बचाव फळीने ब्लॉक केला. पुढच्याच मिनिटाला कृष्णाने उजवीकडून मुसंडी मारली, पण टेलरने चेंडू ब्लॉक करीत या चालीचे फिनिशींग होऊ दिले नाही.
तसेच 84व्या मिनिटाला ओडिशाने आणखी एक प्रयत्न केला. कोल अलेक्झांडर याचा फटका अरींदम भट्टाचार्यने अडविला. पुढील मिनिटाला एटीकेएमबीचा बदली मध्यरक्षक ब्रॅडन इनमन याचा प्रयत्न ओदीशाचा गोलरक्षक कमलजीत सिंगने अपयशी ठरवला.