गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी(25 एप्रिल) जमशेदपूर एफसीने माजी विजेत्या बेंगळुरू एफसीला 3-2 असे हरविले. याबरोबरच जमशेदपूरने मोसमाची सांगता विजयाने केली. बेंगळुरूसाठी कर्णधार सुनील छेत्री याचा शंभरावा गोल वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
या दोन्ही संघांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या होत्या. गुणतक्त्यात पाठोपाठच्या स्थानावर असलेल्या संघांमधील ही लढत होती. त्यामुळे चुरस अपेक्षित होती. यात बेंगळुरूने नव्या खेळाडूंना संधी देऊनही दुसऱ्या झुंजार कामगिरीचे प्रदर्शन केले, मात्र त्यांना पहिल्या सत्रातील तीन गोलांची पिछाडी भरून काढता आली नाही.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. जमशेदपूरने पहिल्या सत्रात तीन गोलांची भक्कम आघाडी घेतली होती. 16व्या मिनिटाला बचाव फळीतील नायजेरीयाचा 26 वर्षीय स्टीफन इझे, 34व्या मिनिटाला मध्य फळीतील मणीपूरचा 27 वर्षीय सैमीनलेन डुंगल व 41व्या मिनिटाला आघाडी फळीतील स्पेनचा 30 वर्षीय डेव्हिड ग्रँडे यांनी गोल केले. बेंगळुरूकडून दुसऱ्या सत्रात बचाव फळीतील स्पेनचा 32 वर्षीय खेळाडू फ्रान्सिस्को गोंझालेझ आणि भारताचा 36 वर्षीय कर्णधार सुनील छेत्री यांनी गोल केले.
इंग्लंडच्या ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरचा 20 सामन्यांत हा सातवा विजय असून सहा बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.
बेंगळुरूला 20 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. 5 विजय व 7 बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 22 गुण व सातवे स्थान कायम राहिले.
जमशेदपूरने सर्वप्रथम खाते उघडले. हा गोल फ्री किकवर झाला. मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने उजवीकडे गोलक्षेत्रालगत मिळालेली फ्री किक घेतली. त्याने पलिकडील बाजूला असलेल्या स्टीफनच्या दिशेने चेंडू मारला. स्टीफनने उंचीचा फायदा उठवित हेडिंग केले आणि बेंगळुरूचा गोलरक्षक लालथुआमाविया राल्टे याला चकविले.
34व्या मिनिटाला आघाडी फळीतील फारुख चौधरी याने बेंगळुरूच्या पेनल्टी क्षेत्रालगत चेंडूवर ताबा मिळविला. त्याने स्थितीचा अंदाज घेतला आणि उजवीकडील डुंगल याच्या दिशेने चेंडू मारला. डुंगलने प्रतिस्पर्धी बचावपटू अजित कुमार याला अजिबात संधी न देता उजवीकडून मुसंडी मारली. त्याने अचूक टायमिंगसह फटका मारत लक्ष्य साधले.
पहिल्या सत्रात चार मिनिटे बाकी असताना जमशेदपूरला उजवीकडे मिळालेली फ्री किक मॉनरॉय यानेच घेतली. त्याने गोलक्षेत्रात चेंडू मारताच डेव्हिडने हेडिंगवर फिनिशींग केले.
बेंगळुरूने दुसऱ्या सत्रात प्रतिकार केला. 62व्या मिनिटाला बदली खेळाडू पराग श्रीवास याने थ्रो-ईन केले. त्यावर गोंझालेझने चपळाईने हेडिंग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकविले.
त्यानंतर नऊ मिनिटांनी बेंगळुरूचा दुसरा गोल झाला. मध्यरक्षक सुरेश वांगजाम याने उजवीकडून ही चाल रचली. त्याने हरमनज्योत खाब्राला पास दिला. खाब्राने डावीकडून मुसंडी मारत पास देताच छेत्रीने प्रतिस्पर्धी बचावपटू स्टीफन इझे याला हुलकावणी देत हेडिंगवर फिनिशींग केले