---Advertisement---

आयएसएल २०२०: सुपर संडेमधील चेन्नईयन-ब्लास्टर्स सामना गोलशून्य अनिर्णित

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 10:06 PM
---Advertisement---

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सुपर संडेमधील दुसरा सामना नीरस ठरला. त्यात गतउपविजेता चेन्नईयन एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यातील सामना गोलशून्य अनिर्णित झाला. दोन्ही संघांना अखेरपर्यंत निर्णायक चाली रचता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

क्साबा लॅसझ्लो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नईयनची ही दोन सामन्यांतील पहिली बरोबरी असून एका विजयासह त्यांचे चार गुण झाले. त्यांनी गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि हैदराबाद एफसी यांचेही प्रत्येकी चार गुण आहेत. एटीके मोहन बागान सर्वाधिक सहा गुणांसह आघाडीवर आहे.

ब्लास्टर्सची तीन सामन्यांनंतर विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. दोन बरोबरी व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचा सातवा क्रमांक आहे.

पाच मिनिटांच्या भरपाई वेळेत ब्लास्टर्सचा मध्यरक्षक सर्जिओ सिदोंचा याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. ब्लास्टर्सचा पाच बदली खेळाडूंचा कोटा त्याआधीच संपला होता. त्यामुळे एक खेळाडू कमी झाला होता. त्यावेळी दोन मिनिटांचा खेळ बाकी होता, पण त्यांच्या सुदैवाने चेन्नईयनला फायदा उठविता आला नाही.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. 74व्या मिनिटाला चेन्नईयनचा मध्यरक्षक लालीयनझुला छांगटे याने याने उजवीकडून मुसंडी मारत मध्य फळीतील सहकारी रॅफेल क्रिव्हेलारो याला पास दिला. क्रिव्हेलारो चेंडूवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात असतानाच ब्लास्टर्सचा मध्यरक्षक सर्जिओ सिदोंचा याने त्याला पाडले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी सिदोंचाला यलो कार्ड आणि चेन्नईयीनला पेनल्टी किक बहाल केली. ती घेण्यासाठी सिल्वेस्टर पुढे सरसावला. त्याच्या फटक्याचा अचूक अंदाज घेत ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स डावीकडे झेपावला आणि त्याने पेनल्टी अडवली.

सामन्याची सुरवात धसमुसळ्या खेळाने झाली. चेन्नईयनचा स्लोव्हाकियन स्ट्रायकर जॅकुब सिल्वेस्टर याला उजव्या बाजूला ब्लास्टर्सचा बचावपटू निशू कुमार याने पाडले. पुढच्याच मिनिटाला चेन्नईयनला फ्री किक मिळाली, जी मध्यरक्षक रॅफेल क्रिव्हेलारो याने घेतली. त्याने नेटच्या समोर चेंडू मारला, पण ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बीनो गोम्स याने पुढे सरसावत अचूक बचाव केला.

सातव्या मिनिटाला चेन्नईयनने आणखी एक चाल रचली. मध्य फळीतील लालियनझुला छांगटे याने लांबून पास मिळताच आगेकूच करीत फटका मारला. गोम्सने तो थोपविला, पण चेंडू अनिरुध थापा याच्या दिशेने गेला. थापाला मात्र फिनिशींग करता आले नाही.

दहाव्या मिनिटाला सिल्वेस्टरच्या पासवर छांगटेने प्रयत्न केला, पण गोम्सने ही चाल फोल ठरवली. 18व्या मिनिटाला क्रिव्हेलारो याची चाल ब्लास्टर्सच्या बचाव फळीतील बाकारी कोने याने अपयशी ठरवली.

ब्लास्टर्सकडून पहिला उल्लेखनीय प्रयत्न 29व्या मिनिटाला झाला. गोलक्षेत्रालगत सर्जिओ सिदोंचा याच्याकडून पास मिळाल्यावर रोहित कुमारने प्रयत्न केला, पण चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याने झेपावत चेंडू बाहेर घालवला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी चेन्नईयनच्या बचाव फळीतील रेगन सिंगला मध्य क्षेत्रात आघाडी फळीतील इस्माईल गोन्साल्वीस याच्याकडून पास मिळाला. रेगनने प्रयत्न केला, पण निशू कुमार याने हेडिंगवर बचाव करीत चेंडू आपला गोलरक्षक गोम्स याच्याकडे सोपविला.

चेंडूवरील ताब्यात चेन्नईयनने वर्चस्व कायम ठेवले. 61व्या मिनिटाला क्रिव्हेलारोने डावीकडून प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू ब्लास्टर्सकडून बाहेर गेला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर क्रिव्हेलारोने घेतला, पण या चालीचे फिनिशींग होऊ शकले नाही. 71व्या मिनिटाला अनिरुध थापाचा प्रयत्न अपयशी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---