गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने शुक्रवारी आपली घोडदौड कायम राखली. एससी ईस्ट बंगालवर 1-0 असा विजय मिळवित मुंबई सिटीने आघाडी आणखी भक्कम केली. मुर्तडा फॉल याने पूर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. बचाव फळीतील सेनेगलचा 33 वर्षीय खेळाडू मुर्तडा फॉल याने पूर्वार्धात मुंबई सिटीचे खाते उघडले होते. ही आघाडी मुंबई सिटीने कायम राखली. मुंबई सिटीविरुद्ध आतापर्यंत चारच गोल झाले आहेत. त्यांनी आठव्यांदा क्लीन शीट राखली आहे. सलामीला नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्यानंतर हा संघ अपराजित आहे.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटीचा 12 सामन्यांतील नववा विजय नोंदविला असून दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 29 गुण झाले. त्यांनी आघाडी पाच गुणांनी वाढविली.
एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 12 सामन्यांतून सात विजयांसह 24 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवा 12 सामन्यांतून पाच विजयांसह 19 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीचे 12 सामन्यांतून चार विजयांसह 17 गुण आहेत.
ईस्ट बंगालला 13 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. दोन विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण व शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले. या पराभवामुळे ईस्ट बंगालची सात सामन्यांची अपराजित मालिका संपुष्टात आली.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने जिंकली. सेट-पीसवर हा गोल झाला. मध्य फळीतील सी गोडार्ड याने घेतलेल्या कॉर्नरवर चेंडू बॉक्समध्ये आला. त्यावर हेडिंगद्वारे मुर्तडाने शानदार फिनिशींग केले. मुर्तडाला मार्कच न करण्याची चूक ईस्ट बंगालला भोवली. त्यामुळे त्यांचा गोलरक्षक देबजीत मजुमदार यालाही साथ मिळू शकली नाही.
मुंबई सिटीने दमदार सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला गोडार्डने मध्य क्षेत्रात उजवीकडे चेंडूवर ताबा मिळवून आगेकूच केली. त्याने बॉक्सलगत दिलेल्या पासवर नियंत्रण मिळवित केलेला प्रयत्न थोडक्यात हुकला.
नवव्या मिनिटाला ईस्ट बंगालने प्रयत्न केला. मॅट्टी स्टेनमन याने मध्य फळीतील सहकारी सुरचंद्र सिंग याला डावीकडे पास दिला. सुरचंद्रच्या क्रॉस शॉटवर मुर्तडाला चकवून हरमनप्रीत सिंगने प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती.
12व्या मिनिटाला मुंबईने आणखी एक प्रयत्न केला. मध्य फळीतील विघ्नेश दक्षिणामुर्तीने डावीकडून मारलेला क्रॉस शॉट ईस्ट बंगालचा बचावपटू नारायण दासला नीट अडविता आला नाही. त्यामुळे ऍडमला संधी मिळाली, पण डॅनिएल फॉक्सने प्रतिकार केला. त्यानंतरही मुंबईचा मध्यरक्षक रॉलीन बोर्जेसला संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका थेट मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याच्याकडे गेला.
दुसऱ्या सत्रात ईस्ट बंगालची सुरुवात सरस झाली. स्टेनमनने बॉक्सजवर चेंडूवर ताबा मिळवित उजवीकडे मध्यरक्षक अँथनी पिल्कींग्टन याला पास दिला. पिल्कींग्टने डावीकडे वळत पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला आणि नेटच्या दिशेने फटका मारला, पण त्याचा एकही सहकारी योग्य ठिकाणी नसल्यामुळे ही संधी वाया गेली.
ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांनी 64व्या मिनिटाला मध्य फळीतील स्टेनमन याच्याऐवजी आघाडी फळीत ब्राईन एनोबाखरे याला मैदानावर पाचारण केले. 85व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा बचावपटू स्कॉट नेव्हीलने गोव्याचा बदली बचावपटू मंदार राव देसाई याला दाद लागू न देता फटका मारला, पण अमरींदरने झेप टाकत चेंडू अडविला.
तीन मिनिटे बाकी असताना ईस्ट बंगालचा बदली मध्यरक्षक ऍरॉन जोशुआ होलोवे याने रचलेल्या चालीवर हरमनप्रीतने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
भरपाई वेळेत एनोबाखरे याने डावीकडून मुसंडी मारत ऍरॉनच्या दिशेने चेंडू मारला. ऍरॉनने उडी घेत हेडिंग केले, पण तो फिनिशींग करू शकला नाही.