---Advertisement---

आयएसएल २०२०: नॉर्थईस्टची बंगालवर २-० ने मात; ओढवली पराभवाच्या हॅट्रिकची नामुष्की

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 10:08 PM
---Advertisement---

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी (५ डिसेंबर) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने कोलकाताच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालला 2-0 असा पराभवाचा धक्का दिला. आयएसएल पदार्पण करणाऱ्या ईस्ट बंगालला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इंग्लंडच्या रॉबी फाऊलर यांच्या संघावर पराभवाच्या हॅट्रिकची नामुष्की ओढवली.

वास्को येथील टिळक मैदानावर सुरचंद्र सिंगच्या स्वयंगोलमुळे ईस्ट बंगाल पूर्वार्धात पिछाडीवर पडला होता. मग भरपाई वेळेत नॉर्थईस्टचा बदली खेळाडू रोछार्झेला याने अप्रतिम गोल केला.

जेरार्ड न्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या नॉर्थईस्टचा हा चार सामन्यांतील दुसरा विजय असून दोन बरोबरींसह त्यांचे आठ गुण झाले. अपराजित मालिका कायम राखत या संघाने गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. एटीके मोहन बागान सलग तीन विजय मिळवून नऊ गुणांसह आघाडीवर आहे.

दुसरीकडे ईस्ट बंगालला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. याशिवाय त्यांना अद्याप एकही गोल करता आलेला नाही. दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध सात गोल झाले आहेत. आतापर्यंत गोलचेही खाते उघडू न शकलेला ईस्ट बंगाल हा एकमेव संघ आहे.

भरपाई वेळेत बदली खेळाडूंनी नॉर्थईस्टची आघाडी वाढवली. स्ट्रायकर सुहैर वडाक्केपीडीका याच्या क्रॉसवर रोछार्झेलाने लक्ष्य साधले. ही चाल उजवीकडून रचण्यात आली. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला ईस्ट बंगालला हा धक्का बसला.

सकारात्मक सुरवात केलेल्या नॉर्थईस्टचे खाते सुदैवाने उघडले. त्यांचा स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याने उजवीकडून हेडिंग करत आघाडी फळीतील सहकारी क्वेसी अप्पीया याच्या दिशेने चेंडू मारला. क्वेसीने ईस्ट बंगालचा बचावपटू महंमद ईर्शाद याला चकवले आणि क्रॉस शॉट मारला. त्यावेळी चेंडू सुरचंद्रच्या गुडघ्याला लागून नेटमध्ये गेला. सुरवातीला स्यीला याच्या अंगाला लागून चेंडू गेल्याचे वाटत होते. मात्र स्वयंगोल झाल्याचे लवकरच स्पष्ट झाले.

नॉर्थईस्टने पहिल्याच मिनिटापासून आक्रमण केले. निंथोईनगाम्बा मितेईने उजवीकडून आगेकूच करीत मारलेला क्रॉस शॉट ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार याने अडवला.

दुसऱ्याच मिनिटाला नॉर्थईस्टचा बचावपटू आशुतोष मेहता याने प्रतिस्पर्धी मध्यरक्षक जऍक्स मॅघोमा याला रोखण्यासाठी धसमुसळा खेळ केला. त्यामुळे रेफरी संतोष कुमार यांनी त्याला यलो कार्ड दाखवले. त्याचवेळी ईस्ट बंगालला फ्री किक देण्यात आली. त्यावर बचावपटू स्कॉट नेव्हीलने हेडिंग केलेला चेंडू मात्र नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याच्या हातात गेला.

पहिल्या सत्रात नवव्या मिनिटाला क्वेसीच्या पासवर उजवीकडे मितेईने आगेकूच केली. त्याच्या क्रॉस पासवर स्यीला हेडिंगद्वारे फिनिशींग करू शकला नाही. दोन मिनिटांनी ईस्ट बंगालचा मध्यरक्षक अँथनी पिल्कींग्टन याने डावीकडून आगेकूच केली, पण या चालीचे फिनिशींग होऊ शकले नाही.

पुढे 13व्या मिनिटाला मॅघोमाने छातीवर चेंडू नियंत्रित करीत आगेकूच केली, पण नॉर्थईस्टचा मध्यरक्षक लालेंगमावीया याने त्याला पाडले. त्यामुळे ईस्ट बंगालला फ्री किक मिळाली. अँथनी पिल्कींग्टन याने ती घेतली, पण चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला लागून बाहेर गेला. त्यामुळे मिळालेल्या कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.

तसेच 38 व्या मिनिटाला ईस्ट बंगालने प्रयत्न केला. बचावपटू नारायण दास याने रचलेल्या चालीवर नॉर्थईस्टचा बचावपटू बेंजामीन लँबोटने हेडिंगवर बचाव केला.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी मॅघोमाने नॉर्थईस्टच्या गोलक्षेत्रात प्रवेश केला होता, पण बेंजामीनने त्याची चाल फोल ठरवित चेंडूवर ताबा मिळविला. 56व्या मिनिटाला प्रोवात लाक्राने स्यीला यास दिर्घ पास दिला, पण मजुमदारने वेळीच अंदाज घेत बचाव केला. त्यानंतर 57व्या मिनिटाला मितेईच्या अचूक पासवर क्वेसीने केलेला प्रयत्नही मजुमदारने अपयशी ठरवला.

त्यानंतर 61व्या मिनिटाला पिल्कींग्टनची आगेकूच प्रतिस्पर्धी गोलरक्षक गुरमीतने रोखली. 68व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा बदली बचावपटू अभिषेक आंबेकर याने डावीकडून मुसंडी मारली, पण बेंजामीनच्या हेडिंगमुळे ही चाल व्यर्थ ठरली.

फाऊलर यांच्या संघाला निर्णायक चाल रचू न देण्यात नॉर्थईस्टच्या बचाव फळीची कामगिरी मोलाची ठरली. याशिवाय गोलरक्षक गुरमीतनेही चमक दाखवली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---