गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी तब्बल 11 गोल झालेल्या लढतीत ओदीशा एफसीने एससी ईस्ट बंगालला 6-5 असे हरविले. स्वयंगोलमुळे मध्यंतरास 1-2 अशी पिछाडी असूनही ओदीशाने बाजी मारत मोसमाचा शेवट विजयाने केला. मोसमात दुसऱ्यांदाच ओदीशाने निर्णायक विजय नोंदविला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास ईस्ट बंगालकडे 2-1 अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात तब्बल आठ गोल झाले. यात ओदीशाने तीन मिनिटांच्या अंतराने दोन आणि मग चार मिनिटांच्या अंतराने तीन असे पाच गोल करीत विजय खेचून आणला. 3-3 अशा बरोबरीनंतर ओदीशाने पारडे फिरविले.
ईस्ट बंगालचे खाते 24व्या मिनिटाला मध्य फळीतील इंग्लंडच्या 32 वर्षीय अँथनी पिल्कींग्टन याने उघडले. ओदीशाला 33व्या मिनिटाला मध्य फळीतील मिझोरामच्या 20 वर्षीय एस. लालह्रेझुला याने बरोबरी साधून दिली. त्यानंतर चार मिनिटांत ओदीशाचा गोलरक्षक रवी कुमार याच्याकडून स्वयंगोल झाला. दुसऱ्या सत्रात ईस्ट बंगालकडून मध्य फळीतील इंग्लंडच्या 28 वर्षीय ऍरॉन जोशुआ होलोवे याने दोन व आघाडी फळीतील मिझोरामचा 30 वर्षीय बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ याने एक गोल केला.
ओदीशाकडून मध्य फळीतील मिझोरामच्या 21 वर्षीय पॉल रॅमफँगझुवा व मध्य फळीतील मिझोरामच्या 23 वर्षीय जेरी माहमिंगथांगा यांनी प्रत्येकी दोन, तर आघाडी फळीतील ब्राझीलचा 29 वर्षीय दिएगो मॉरीसिओ याने एक गोल केला.
ओदीशाचा 20 सामन्यांत हा दुसराच विजय असून सहा बरोबरी व 12 पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण झाले. गुणतक्त्यात त्यांचे अखेरचे 11वे स्थान कायम राहिले.
ईस्ट बंगालचे नववे स्थान कायम राहिले. 20 सामन्यांत त्यांना नववा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व आठ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत ईस्ट बंगालने जिंकली. 24व्या मिनिटाला मध्य फळीतील वाहेंगबाम लुवांग याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने पास दिल्यानंतर पिल्कींग्टनने गोलक्षेत्रात प्रवेश केला आणि सफाईदार फिनिशींग केले.
ओदीशाने नऊ मिनिटांत बरोबरी साधली. 33व्या मिनिटाला ओदीशाचा स्ट्रायकर दिएगो मॉरीसिओ याने डावीकडून आगेकूच केली. त्याने गोलक्षेत्रात क्रॉसशॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण ईस्ट बंगालचा बचावपटू सार्थक गोलुई याने चेंडू ब्लॉक करून बाहेर घालविला. त्यामुळे ओदीशाला कॉर्नर मिळाला, जो मध्य फळीतील ब्रॅड इनमन याने घेतला. ईस्ट बंगालच्या खेळाडूंच्या भिंतीमधील मध्यरक्षक जॅक्स मॅघोमा याच्या अंगाला लागून चेंडू लालह्रेझुला याच्या दिशेने गेला. लालह्रेझुलाने चपळाईने फटका मारला. त्यावेळी ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या हाताला लागून चेंडू नेटमध्ये गेला.
चार मिनिटांनी ओदीशाकडून स्वयंगोल झाला. मॅघोमाने उजवीकडून गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्याने नेटच्या दिशेने क्रॉसशॉट मारला. ईस्ट बंगालचा मध्यरक्षक ऍरॉन जोशुआ होलोवे याने किक मारून प्रयत्न केला, पण ओदीशाचा स्ट्रायकर मॅन्युएल ओन्वू याने बचावाचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका चुकून गोलरक्षक रवीच्या उजवीकडे गेला. चेंडू रवीच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
ओदीशाने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच बरोबरी साधली. 49व्या मिनिटाला उजवीकडून थ्रो-ईनवर बचावपटू जॉर्ज डिसुझा याने चेंडू फेकला, जो इनमन याने पॉल याच्या दिशेने वळविला. पॉलने मग अचूक टायमिंगसह फिनिशींग केले.
त्यानंतर दोन मिनिटांत ओदीशाने आघाडी घेतली. 51व्या मिनिटाला मिळालेली फ्री किक बचावपटू जेकब ट्रॅट याने घेतली. त्याने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी ईस्ट बंगालचा मध्यरक्षक सुरचंद्र सिंग आणि ओन्वू यांच्यात चुरस झाली. त्यात तोल जाऊन सुरचंद्र पडला. त्यामुळे ओन्वूने चेंडूवर ताबा मिळवून जेरीसाठी संधी निर्माण केली. जेरीने ईस्ट बंगालचा बचावपटू डॅनिएल फॉक्स याला चकवून हेडिंगवर फिनिशींग केले.
ईस्ट बंगालने 60व्या मिनिटाला बरोबरी साधली. होलोवे याने डावीकडून मुसंडी मारत हा गोल केला.
ओदीशाने सहा मिनिटांत आघाडी घेतली. मध्यरक्षक विनीत राय याने आगेकूच केली, पण त्याने मारलेला चेंडू ईस्ट बंगालचा बचावपटू राणा घरामी याने थोपविला. हा चेंडू आपल्या दिशेने येताच पॉलने फटका मारला. त्यावेळी चेंडू मॅघोमाच्या अंगाला लागून नेटच्या दिशेने गेला. उजवीकडून आलेला चेंडू अडविणे ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या आवाक्याबाहेरचे ठरले.
पुढच्याच मिनिटाला ओदीशाने पाचवा गोल केला. इनमन याने मॉरीसिओला पास दिला. मग या चालीचे फिनिशींग जेरीने केले.
सामन्याच्या 69व्या मिनिटाला फॉक्सने माहमिंगथांगा याला डावीकडे पाडले. त्यामुळे ओदीशाला फ्री किक मिळाली. त्यावर मॉरीसिओने मैदानालगत फटका मारला. पिल्कींग्टनने प्रयत्न केला, पण तो चेंडू अडवू शकला नाही. ओदीशाकडे सहाव्या गोलसह 6-3 अशी आघाडी जमली.
सामन्याच्या 74व्या मिनिटाला ईस्ट बंगालने चौथ्या गोलसह पिछाडी कमी केली. डावीकडून ब्राईट एनोबाखरे याने ही चाल रचली. त्याने पिल्कींग्टनला पास दिला. त्याने हवेतून मारलेल्या चेंडूवर जेजे लालपेखलुआ याने हेडिंग केले.
भरपाई वेळेत होलोवे याने वैयक्तिक दुसरा व संघाचा पाचवा गोल केला. त्यामुळे पराभवाचे अंतर कमी झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सला हरवित नॉर्थईस्ट युनायटेडची बाद फेरीत धडक
आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून जमशेदपूरची विजयी सांगता
आयएसएल २०२०-२१ : बिपीनच्या हॅट््ट्रीकमुळे मुंबई सिटीकडून ओदीशाचा धुव्वा