---Advertisement---

आयएसएल २०२०: जमशेदपूरला रोखत ईस्ट बंगालने उघडले खाते

On: गुरूवार, डिसेंबर 10, 2020 10:03 PM
---Advertisement---

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी (10 डिसेंबर) कोलकाताच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालची पहिला विजय तसेच पहिल्या गोलचीही प्रतिक्षा कायम राहिली. जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पदार्पणाच्या मोसमात त्यांचे किमान गुणांचे खाते तरी अखेर चौथ्या सामन्यात उघडले.

तीन पराभवांची मालिका खंडित केली असली, तरी इंग्लंडच्या रॉबी फाऊलर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाची एकूण निराशा कायम राहिली. 25व्या मिनिटापासून एक खेळाडू कमी झाल्यानंतरही एक गुण मिळणे हीच त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली. ईस्ट बंगालचा भारतीय खेळाडू युजीन्सन लिंगडोह याला चार मिनिटांच्या अंतराने दोन वेळा यलो कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे ईस्ट बंगालला दहा खेळाडूंनिशी खेळणे भाग पडले.

ईस्ट बंगालची ही 4 सामन्यांतील पहिलीच बरोबरी असून त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले होते. 11 संघामध्ये शेवटचे स्थान कायम राहिले असले तरी बरोबरीच्या एका गुणासह खाते उघडण्याचे समाधान त्यांना मिळाले.

जमशेदपूरने 5 सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून एक विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 6 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा (4 सामन्यांतून 5) व हैदराबाद एफसी (3 सामन्यांतून 5) यांना मागे टाकत दोन क्रमांक प्रगती केली. जमशेदपूरचा आता पाचवा क्रमांक आहे.

मुंबई सिटी एफसी (5 सामन्यांतून 12 गुण) आघाडीवर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा (5 सामन्यांतून 9) दुसरा, तर एटीके मोहन बागानचा (4 सामन्यांतून 9) तिसरा क्रमांक आहे. चौथ्या क्रमांकावरील बंगळुरू एफसीचे 4 सामन्यांत 6 गुण आहेत. यात बंगळुरूचा गोलफरक 1 (5-4) जमशेदपूरच्या 0 (6-6) तुलनेत सरस आहे.

पुढे 25व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा एक खेळाडू कमी झाला. मध्य फळीतील युजीन्सन लिंगडोह याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. 21व्या मिनिटाला लिंगडोहने जमशेदपूरचा बचावपटू लालडीनलियाना रेंथलेई याला पाडले होते. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी त्याला यलो कार्ड दाखवले होते. त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी मध्यरक्षक अलेक्झांड्रे लीमा याला पाडले. त्यामुळे त्याच्यावर यलो कार्डची कारवाई दुसऱ्यांदा झाली. त्यावेळी ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांना नाराजी लपवता आली नाही.

भरपाई वेळेत जमशेदपूरच्या बचाव फळीतील लालडीनलियाना रेंथलेई याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. 58व्या मिनिटास त्याच्यावर धसमुसळ्या खेळामुळे यलो कार्डची कारवाई झाली होती, तेव्हा त्याने नारायण दासला पाडले होते. त्यानंतर त्याने जॅक्स मॅघोमाला नियमबाह्य पद्धतीने रोखले.

सामन्यातील पहिला कॉर्नर तिसऱ्या मिनिटाला जेेशेदपूरला मिळाला. मध्य फळीतील महंमद मोबाशीर याने घेतलेल्या कॉर्नरवर गोलक्षेत्रात आलेला चेंडू ईस्ट बंगालच्या बचावपटूमुळे बाहेर गेला. त्यामुळे पुन्हा मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने घेतला, जो ईस्ट बंगालचा मध्यरक्षक महंमद रफीकने बाहेर घालवला. परत मिळालेल्या कॉर्नरवर मॉनरॉयने खराब फटका मारला.

पुढच्याच मिनिटाला मिळालेला कॉर्नर मॉनरॉयने नीट घेतला, पण ईस्ट बंगालचा मध्यरक्षक सेहनाज सिंगने हेडिंगकरवी तो गोलक्षेत्रापासून दूर घालवला.

सहाव्या मिनिटाला जमशेदपूरचा स्ट्रायकर विल्यम लालनुनफेला याने बचावपटू पीटर हार्टली याला पास दिला. त्यावेळी मार्किंग नसल्यामुळे स्ट्रायकर अनिकेत जाधव याच्या दिशेने चेंडू मारण्यात आला. त्याचवेळी ईस्ट बंगालचा गोलरक्षक शंकर रॉय पुढे सरसावला. त्यामुळे दडपण येऊन अनिकेतला फटक्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला.

त्यानंतर 11व्या मिनिटाला ईस्ट बंगालला मिळालेली फ्री किक अँथनी पिल्कींग्टन याने घेतली, पण त्याने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू जमशेदपूरच्या हार्टलीने हेडिंगद्वारे बाजूला घालवला.

तसेच 29व्या मिनिटाला लीमाने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून मोबाशीरला क्रॉस पास दिला. त्यावेळी रेंथलेईने साथ दिली. त्याने गोलक्षेत्रातील वॅल्सकीसला पास दिला. वॅल्सकीसने मारलेला चेंडू थोडक्यात नेटवरून गेला.

पूर्वार्ध संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना पिल्कींग्टन याने प्रयत्न केला, पण पुरेशा ताकदीअभावी चेंडू मारल्यामुळे जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश चेंडू आरामात अडवू शकला.

दुसऱ्या सत्रात 52व्या मिनिटाला मॉनरॉय याने उजवीकडून कॉर्नरवर मारलेला चेंडू ईस्ट बंगालचा गोलरक्षक शंकर रॉय याने बचाव पळीतील सहकाऱ्याच्या साथीत रोखला. 62व्या मिनिटाला रेंथलेईने उजवीकडून आगेकूच केली, पण त्याला फिनिशिंग करता आले नाही.

तसेच 71व्या मिनिटाला जॅकीचंद सिंग आणि रेंथलेई यांनी उजवीकडून चांगली चाल रचली, पण रेंथलेईने जास्त ताकद लावून चेंडू मारल्यामुळे ही चाल वाया गेली. 86व्या मिनिटाला नारायण दासने डावीकडून घेतलेला कॉर्नर नेरीयूस वॅल्सकीसने हेडिंगद्वारे थोपवला. त्यानंतर महंमद ईर्शादने चेंडूवर ताबा मिळवत ईस्च बंगालसाठी संधी निर्माण केली. त्याने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू स्कॉट नेव्हीलने हेडिंगवर नेटच्या दिशेने मारला, पण त्यात अचूकता नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---