---Advertisement---

आयएसएल २०२०-२१: ईस्ट बंगालची हैदराबादविरुद्ध आज लढत

On: शुक्रवार, फेब्रुवारी 12, 2021 1:21 PM
---Advertisement---

गोवा: सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत एससी ईस्ट बंगालची शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर हैदराबाद एफसीविरुद्ध लढत होईल.

ईस्ट बंगालचे हिरो आयएसएलमधील पदार्पण अडखळत झाले. बहुतांश मोसमात त्यांना तळात राहावे लागले. यानंतरही त्यांच्या सर्व आशा संपुष्टात आलेल्या नाहीत. चौथ्या क्रमांकावरील हैदराबादला हरविले तर ते प्रतिस्पर्ध्याविरुद्धची पिछाडी चार गुणांपर्यंत कमी करू शकतील. त्यांचे तीन सामने बाकी असतील. त्यादृष्टिने या लढतीसह चार सामने त्यांच्यासाठी अंतिम फेरीइतके महत्त्वाचे आहेत.

ईस्ट बंगालने 16 सामन्यांतून 16 गुण मिळविले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड, हैदराबाद आणि एफसी गोवा या तीन संघांच्या संधीला धक्का बसावा म्हणून त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. या तिन्ही संघांची 16 सामन्यांतून 23 गुण अशी समान कामगिरी आहे. ईस्ट बंगालसाठी मोहिम संपलेली नाही. एटीके मोहन बागान, नॉर्थईस्ट आणि तळातील ओदीशा हे त्यांचे त्यानंतरचे तीन प्रतिस्पर्धी आहेत.

सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांच्यासाठी शुक्रवारची लढत सर्वांत खडतर कसोटी असेल. त्यांनी सांगितले की, इतर बहुतांश क्लबपेक्षा मी हैदराबादला वरचे स्थान देतो. गेल्या दोन मोसमांच्या तुलनेत त्यांचा संघ सरस आहे. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. हा सामना खडतर असेल. ते आमच्यापेक्षा काही गुणांनी पुढे आहेत. त्यामुळे त्यांना प्रयत्न करून स्थान राखण्यासाठी जास्त वाव आहे.

या सामन्यातून काही कमाई करायची असेल तर ईस्ट बंगालला आक्रमणाच्या निर्णायक टप्प्यात सर्वोत्तम क्षमता पणास लावावी लागेल. मैदानी खेळातून सर्वांत कमी सात गोल त्यांचे आहेत. त्यांचा तारणहार ठरलेल्या ब्राईट एनोबाखरे याची कामगिरी चमकदार प्रारंभानंतर ढेपाळली आहे. सामन्याचा निकाल दुसऱ्या सत्रात लागण्याची जास्त शक्यता आहे. याचे कारण हैदराबादने 75 टक्के गोल उत्तरार्धात केले आहेत, तर ईस्ट बंगलला 21 पैकी 14 गोल दुसऱ्या सत्रात पत्करावे लागले आहेत.

जमशेदपूरविरुद्धचा सामना ईस्ट बंगालसाठी सर्वोत्तम ठरला. संपूर्ण संघाने चांगला खेळ केला. जवळपास तेच अकरा खेळाडू घेऊन सुरुवात करण्यास पसंती असल्याचे ग्रँट यांनी सांगितले, पण ते सर्वोत्तम अकरा खेळाडू आहेत का याची त्यांना खात्री नाही. ते म्हणाले की, आम्ही फार चांगला खेळ केला. आम्हाला तोच संघ खेळवण्यास आवडेल, पण दुखापती किंवा इतर काही प्रश्न आहेत का हे नंतर कळेल.

दुसरीकडे हैदराबादचे प्रशिक्षक मॅन्युएल मार्क्वेझ यांना विजय मिळाल्यास ते बाद फेरीच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल याची कल्पना आहे. त्यांनी क्लबबरोबरील करार नुकताच वाढवला आहे. त्यांचा संघ आठ सामन्यांत अपराजित आहे. चांगला फॉर्म कायम राखण्यास ते आतूर असतील.

मार्क्वेझ यांनी सांगितले की, हा सामना अवघड आहे. त्यांनी बरेच खेळाडू बदलले आहेत असे वाटते, पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. आम्ही सर्व सामने जिंकले तर पहिल्या चार जणांत राहू. साखळीचा अंतिम टप्पा नजिक आला आहे. एका वेळी एका सामन्याचा विचार करून आम्हाला गुण जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून बेंगळुरू पराभूत

आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---