---Advertisement---

आयएसएल २०२०: कोलकाता संघांकडून बाला देवीला महिला डर्बीची अपेक्षा

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 5:03 PM
---Advertisement---

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेतील (आयएसएल) पहिल्यावहिल्या कोलकाता डर्बीची उत्कंठा शिगेला पोचली असताना नामवंत महिला फुटबॉलपटू बाला देवी हिने महिलांसाठीही अशी डर्बी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भारतीय फुटबॉलमध्ये शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) होणाऱ्या या लढतीची चर्चा रंगली आहे. गेल्या काही काळातील ही सर्वांत महत्त्वाची कोलकाता डर्बी मानली जात आहे. भारतीय फुटबॉलमधील या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या लढतीने सर्वाधिक महत्त्वाच्या व्यासपीठावर स्थान मिळविले आहे.

भारतात सगळीकडे फुटबॉलप्रेमी आतूर झाले असताना स्कॉटलंडमध्ये खेळणाऱ्या बाला देवी हिलाही वेध लागले आहेत. ती अशा खास लढतीची कल्पना रंगवते आहे. एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल महिला डर्बीसाठी सुद्धा एके दिवशी अशीच निष्ठा प्रदर्शित करतील असे तिला वाटते.

बाला देवी अलिकडे रेंजर्स एफसी आणि सेल्टिक एफसी या लढतीत सहभागी झाली, ज्यास ओल्ड फर्म डर्बी असे संबोधले जाते. जागतिक फुटबॉलमधील ही एक सर्वाधिक जुनी डर्बी मानली जाते. हे दोन क्लब महिला संघ सुद्धा स्थापन करतील आणि भारतात आणखी एक प्रतिष्ठेच्या डर्बीची पर्वणी देतील असा तिचा विश्वास आहे.

बाला देवी हिने रेंजर्स एफसीबरोबर करार केला. परदेशात व्यावसायिक फुटबॉल करार केलेली ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली. जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये बाला देवी वाटचाल करते आहे. रेंजर्ससारख्या जगप्रसिद्ध क्लबकडून खेळत असल्यामुळे मिळणाऱ्या स्टारपदाची तिला हळूहळू सवय होत आहे. सुपरमार्केटमध्ये गेल्यावर लोक आपल्याला ओळखतात हे सांगताना तिला आनंद वाटतो. ती म्हणते की, पुढील सामन्यासाठी लोक मला नेहमीच शुभेच्छा देतात. आयब्रॉक्स स्टेडियमवर माझे छायाचित्रही लावण्यात आले आहे. येथे फुटबॉलविषयी लोकांना अपार आदर वाटतो. प्रत्येक सत्रात पूर्ण 45 मिनिटे ते उभे राहून सामना बघतात. त्यावरून त्यांचे संघांवर किती प्रेम आहे आणि ते खेळाडूंना किती प्रेरीत करतात हे दिसून येते.

स्कॉटलंडमध्ये एक फुटबॉलपटू म्हणून बाला देवी प्रगती करीत आहे. त्याचवेळी भारतीय फुटबॉलला आत्मसात करता येतील असे बहुमोल धडेही ती गिरवते आहे. स्कॉटलंडमधील महिला लिगमध्ये व्यापक बदल झाले आहेत. अशावेळी बाला देवीने तेथे प्रवेश केला आहे. 2018 मध्ये महिला फुटबॉलशी संबंधित घटकांनी पुढे पाऊल टाकण्याचे एकमताने ठरविले. त्यानंतर नव्या संघांची स्थापना करण्यात आली. रेंजर्सने महिला फुटबॉलसाठीची गुंतवणूक तिप्पट केली, तर सेल्टिकने महिला संघ पूर्णपणे व्यावसायिक बनवण्याचा निर्णय घेतला.

अल्प कालावधीत स्कॉटीश महिला प्रिमीयर लिगने वेगवान वाटचाल केली. त्यामुळे बीबीसी स्कॉटलंडने यंदाच्या वर्षापासून निवडक सामन्यांचे प्रक्षेपण सुरु केले.

भारतात असे नक्कीच घडू शकेल असा ठाम विश्वास बाला देवीला वाटतो. तिने सांगितले की, मणीपूरमध्ये अनेक खेळाडू घडतात, कारण तेथे बरेच सामने होतात, जे सर्व वयोगटांचे असतात. इतर राज्यांमध्ये मात्र असे घडत नाही. मुलींना वर्षभर सामने खेळायला मिळतील अशी पद्धत निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे अधिकाधिक महिला खेळाडू पुढे येतील. त्यासाठी सर्व क्लबने महिला संघ तयार करून ते खेळवावेत. खेळाडू स्वतःच्याच पातळीवर सराव करू शकत नाहीत, तर त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधांची गरज असते.

ओल्ड फर्म डर्बीमुळे किती उत्कंठा निर्माण झाली याचा प्रत्यक्ष अनुभव बाला देवी घेऊ शकली. महिलांच्या कोलकाता डर्बीमुळे अशीच जादू घडेल आणि मुलींमध्ये फुटबॉल लोकप्रिय होण्यास चालना मिळेल असा ठाम विश्वास तिला वाटतो.

कोलकाता डर्बीच्या भव्यतेशी बाला देवी अपरिचीत नाही. कोलकाता येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात 2005-06 मध्ये प्रशिक्षण घेत असताना तिला कोलकता डर्बीचे काही सामने पाहण्याची संधी मिळाली. या आठवणींना ती उजाळा देते. ग्लासगोला रवाना होण्यापूर्वी बाला देवीने सॉल्ट लेक स्टेडियमवरील याआधीची कोलकाता डर्बी आवर्जून पाहिली होती.

कोलकात्याचे दोन मातब्बर क्लब महिला संघ सहज स्थापन करु शकतात. तेथील खेळाडूंना नैसर्गिक गुणवत्तेचे वरदान मिळाले आहे, असे बाला देवी सांगते. ती पुढे म्हणते की, मी 2002 मध्ये ज्युनीयर पातळीवर खेळायला सुरवात केली तेव्हा बंगालच्या संघांविरुद्ध आमची अंतिम लढत व्हायची. बंगालच्या मुली फार कौशल्याने खेळतात आणि त्या काळात राष्ट्रीय संघात बंगालमधील मुली बऱ्याच होत्या. आता मात्र केवळ एक किंवा दोघीच असतात. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल यांनी रेंजर्स आणि सेल्टिक यांचा कित्ता गिरवला आणि महिला संघ घडविले तर ते बंगालच नव्हे तर भारतीय फुटबॉलसाठीही लाभदायक ठरेल. रेंजर्स आणि सेल्टिक यांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हे साकारले. कोलकात्याचे आपले दोन संघ सुद्धा आजपासून हे तेवढ्याच कालावधीत करु शकतात.

वाचा –

आयएसएल २०२०: अनेक डर्बींंचे साक्षीदार ठरलेले रॉबी फाऊलर आता कोलकाता डर्बीसाठी सज्ज

ऍडमच्या पेनल्टीवरील गोलमुळे मुंबईचा गोव्याला पराभवाचा धक्का

दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कारकिर्दीवर एक नजर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---