गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी पहिल्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. या निकालामुळे नॉर्थईस्टची अपराजित मालिका कायम राहिली आहे. सहभागी संघांमध्ये बेंगळुरू एफसी आणि हैदराबाद एफसी हे इतर दोन संघ अपराजित आहेत. वास्को येथील टिळक मैदानावरील लढतीत दोन्ही संघ अथक प्रयत्न करूनही अखेरपर्यंत निर्णायक गोल करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.
नॉर्थईस्टने याबरोबरच गुणतक्त्यात दुसरे स्थान गाठले. सहा सामन्यांत दोन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले. एटीके मोहन बागानचे 5 सामन्यांतून 10 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक 3 असा समान आहे. नॉर्थईस्टचा गोलफरक 3 (8-5), तर एटीकेएमबीचा 3 (6-3) असा आहे. यात नॉर्थईस्टचे गोल दोन जास्त आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर गेले.
मुंबई सिटी एफसी 12 गुणांसह आघाडीवर असून चौथ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 5 सामन्यांतून 8 गुण आहेत.
चेन्नईयीनचे आठवे स्थान कायम राहिले. 5 सामन्यांत त्यांना दुसरी बरोबरी पत्करावी लागली असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण झाले.
पहिल्याच मिनिटाला चेन्नईयीनने आक्रमण केले. लालियनजुला छांगटे याने डावीकडून आगेकूच करीत मारलेला फटका नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याने डावीकडे झेपावत अडवला. सहाव्या मिनिटाला चेन्नईयीनला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक एडवीन वन्सपॉल याने घेतला, पण त्याला त्यावर फिनिशींग होऊ शकले नाही. 12व्या मिनिटाला बेंजामीन लँबोट याने इद्रीस स्यीला याला पास दिला. इद्रीस धावत असतानाच चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने पुढे सरसावत चेंडू थोपवला, पण चेंडू बाहेर गेला. त्यामुळे थ्रो-इन देण्यात आले, ज्यावर काही विशेष घडले नाही. 27व्या मिनिटाला डायलन फॉक्स व निंथोईंगाबा मितेई यांचा प्रयत्न कैथने फोल ठरवला. 55व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा फॉरवर्ड सुहैर वाडाक्केपिडीका याने डावीकडून आगेकूच केली. त्यावेळी आघाडी फळीतील इद्रीस स्यीला यानेही घोडदौड केली. पास मिळताच इद्रीसने प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने अचूक बचाव केला.
60व्या मिनिटाला चेन्नईयीनचा मध्यरक्षक फातखुलो फातखुलोएव याने उजवीकडून मुसंडी मारली. त्याने दिलेल्या स्ट्रायकर पासवर जेकब सिल्व्हेस्टर याने प्रयत्न केला. उजव्या बाजूला आलेला चेंडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक गुरमीत याने चपळाईने थोपवला. त्यानंतर चेंडू जेरी लालरीनझुला याच्या दिशेने गेला, पण जेरीचा फटका क्रॉसबारवरून गेला.
निर्धारीत वेळ संपण्यास चार मिनिटे बाकी असताना छांगटेने डावीकडून आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू बेंजामीन लँबोटने डोक्याने अडवला, पण गोलक्षेत्रात थोई सिंग आणि अनिरुध थापा या चेन्नईयीनच्या दोन बदली खेळाडूंनी प्रयत्न केले. यातील थोईने चेंडू मारला, पण तो स्वैर होता. वास्तविक त्यावेळी थापाला सरस संधी होती.
89व्या मिनिटाला रोछार्झेला याने डावीकडे चेंडू मिळताच आगेकूच केली, पण त्याला फिनिशींग करता आले नाही.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: अँग्युलोच्या गोलमुळे ओदिशाला हरवून गोव्याची आगेकूच
– आयएसएल २०२०: जमशेदपूरला रोखत ईस्ट बंगालने उघडले खाते
– आयएसएल २०२०: मुंबई सिटीची चेन्नईयनविरुद्ध पिछाडीवरून बाजी